आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विश्लेषण:शिवसेना सरकारच्या शिकारीला निघाला हिंदुत्ववादी वाघ

सुरत7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इतिहास साक्षी आहे - छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे एकेकाळी सुरतवर चालून गेले होते. आता सुरतमधून शिवसेनेच्या सरकारवर आक्रमण केले जात आहे. राणी कैकेयी जसे कोपभवनात जाऊन बसल्या होत्या, त्याचप्रमाणे शिवसेनेचे ५५ पैकी ३५ आमदार सुरतमधील एका हॉटेलमध्ये बसले आहेत. महाराष्ट्र सरकार संकटात आहे. राजकारणात हे काही नवीन नाही. भारतीय राजकारणात विदूषकांची कधीही कमतरता नव्हती. चौधरी चरणसिंह हे राम आहेत आणि आपण त्यांचे हनुमान आहोत, असे म्हणणारे राजनारायण यांनी थोड्याच दिवसांनंतर त्याच चरणसिंह यांचा “चेअरसिंह’ असा उल्लेख करत त्यांची खिल्ली उडवली होती. विदेशी घड्याळांसह विमानतळावर पकडले गेल्यानंतर ओमप्रकाश चौटाला यांना पुत्र मानण्यास नकार देणारे चौधरी देवीलाल यांनी आपल्या नातवाला महम हत्याकांडातून वाचवण्यासाठी अख्ख्या व्ही. पी. सिंह सरकारला वेठीस धरले होते. आता एकनाथ शिंदे म्हणताहेत, “आम्हीच बाळासाहेबांचे खरे वारसदार आहोत, उद्धव ठाकरे आहेत कोण?’ यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.

चुकीच्या तत्त्वांसोबत केलेली तडजोड त्या समाधीप्रमाणे असते, ज्यात आयुष्य व्यर्थ ठरते. महाराष्ट्रातील आघाडी सरकारची स्थापनाच मुळी अनैसर्गिक आहे. अस्तित्व टिकवण्यासाठी आयुष्यभर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी शिवसेनेला संघर्ष करावा लागला. मात्र सत्तेसाठी त्याच राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करावी लागत असेल तर शिवसेनेचे स्वत:चे असे काही राहत नाही. तथापि, भाजपसोबत राहून मुख्यमंत्रिपद मिळवणे उद्धव यांच्यासाठी अवघड होते, म्हणून पक्षाचे संपूर्ण अस्तित्वच पणाला लावण्यात शहाणपण नव्हते. एका अर्थाने याला राजकीय आत्महत्या म्हणता येईल. बाबरी पाडण्यात भाजपचा हात नाही, ते जमावाचे कृत्य आहे, असे जेव्हा अटलजी आणि अडवाणी म्हणत होते त्या वेळी बाळासाहेब एकमेव होते ज्यांनी असे म्हटले होते, की बाबरी पाडण्यात एक जरी शिवसैनिक सामील असेल तर त्या पुण्यकर्माचा मला गर्व आहे. आघाडी धर्माच्या अडचणीमुळे त्याच बाळासाहेबांचा पक्ष जर हनुमान चालिसा पठण करणाऱ्यांना कारागृहात डांबत असेल तर हा आपल्याच मुळांवर घाव घालण्याचा राजकीय प्रकार म्हणावा लागेल. आज ३५ आमदारांना सुरतला नेऊन एकनाथ शिंदेही हेच सांगत आहेत.

हिंदुत्व ही त्यांची एकमेव अट आहे, ज्यामुळे शिवसेनेचे उरलेसुरले श्वास सुरू आहेत. हिंदुत्ववादी पक्ष भाजपच्या सोबत जाणे ही पण त्यांची एक अट आहे. शिंदे हेही सांगत आहेत की मी जे केले ते भाजपच्या डावपेचांना बळी पडून नव्हे तर शिवसेनेच्या मूळ अस्तित्वाला वाचवण्यासाठी करत आहे. हे समजून घेणेही गरजेचे आहे की, एकनाथ शिंदे हे जमिनीवर राहून काम करणारे शिवसेनेतील एकमेव नेते आहेत आणि बाळासाहेबांनंतर शिवसेनेचे मोठे नेते धर्मवीर आनंद दिघे यांचे सच्चे अनुयायीही आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहताना त्यांना कधीतरी अपमानित झाल्याची जाणीव होणार होतीच आणि ती झाली. तसेही हिंदुत्वाच्या मार्गावर चालणे म्हणजे वाघावर स्वार होण्यासारखे आहे. खाली उतरताच वाघ तुम्हाला खाऊन टाकतो. म्हणूनच आता हे अनैसर्गिक आघाडीचे सरकार वाचणे अवघड आहे. एक-दोन दिवसांत शिंदे मुख्यमंत्री होतील आणि भाजप त्यांना बाहेरून पठिंबा देईल किंवा शिवसेना-भाजप युतीचे सरकार तरी अस्तित्वात येईल. हे दोन्ही पर्याय शक्य नाही झाले तर निवडणूक निश्चित आहे.

बातम्या आणखी आहेत...