आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शारदा पीठ कॉरिडॉर’ बनवण्याचा प्रस्ताव पीओके असेम्ब्लीमध्ये मंजूर:पीओकेच्या शारदा पीठामध्ये 75 वर्षांनंतर तीर्थाच्या आशा पल्लवित

हारुण रशीद | श्रीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानव्याप्त काश्मीरच्या (पीओके) असेम्ब्लीच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला आहे. आतापर्यंत भारतविरोधी व अतिरेक्यांच्या समर्थनात प्रस्ताव पारित करणाऱ्या पीओके असेम्ब्लीने शारदा माता पीठात तीर्थासाठी भारतातून येणाऱ्या भक्तांसाठी कॉरिडॉर बनवण्याचा प्रस्ताव पारित केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर हे घडले. ते म्हणाले होते, कर्तारपूर कॉरिडॉरच्या धर्तीवर शारदा माता पीठासाठीही कॉरिडॉर व्हायला हवे.

दरम्यान, सेव्ह शारदा समितीने (एसएससी) पीओके असेम्ब्लीच्या प्रस्तावाचे स्वागत करत सांगितले, ७५ वर्षांनंतर शारदा माता पीठात जाऊन तीर्थाच्या आशा पल्लवित झाल्या. यासाठी अनेक वर्षे केलेला संघर्ष आता फळाला आला आहे. यापूर्वी एसएससीने २००६ मध्ये केंद्र सरकार व पाकिस्तान सरकारला शारदा माता पीठासाठी कॉरिडॉर करण्याबाबत पत्र पाठवले होते. दुसरीकडे पीडीपीच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी शारदा माता कॉरिडॉर बनवण्याबाबतच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

३७ इतर धार्मिक स्थळांसाठी मार्ग खुला होईल
पीओकमध्येे हिंदू व शिखांची ३७ धार्मिक स्थळे आहेत. येथे भक्तांना परवानगी देण्याची मागणी होत आहे. नुकतेच एलआेसी जवळ टिटवालमध्ये शारदा माता यात्रा मंदिर व लगतचा गुरुद्वारा भक्तांसाठी खुला करण्यात आला आहे. १९४७ मध्ये पाकिस्तानी आदिवासींच्या हल्ल्यात मंदिर व गुरुद्वाऱ्याची नासधूस झाली होती.

पीओकच्या प्रस्तावावर पाकिस्तान नाराज
पीओके असेम्ब्लीच्या प्रस्तावावर पाकिस्तानाने आक्षेप घेतला आहे. भारतातील माजी पाक राजदूत अब्दुल बासित म्हणतात, शारदा माता पीठ कॉरिडॉर होणे शक्य नाही. कर्तापूर कॉरिडॉर अांतरराष्ट्रीय सीमेवर, तर शारदा पीठ एलओसीवर आहे. एसएससीचे प्रमुख रवींद्र पंडिता यांनी बासित यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

शारदा कॉरिडॉर ४० किमी लांबीचा असेल
प्रस्तावित शारदा माता पीठासाठी कॉरिडॉर सुमारे ४० किलोमीटर लांबीचा असेल. तो एलओसीवर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातून सुरू होईल. शारदा पीठाकडे जाण्यासाठी भक्तांना नारद, सरस्वती व नारिल सरोवर पार करावे लागेल. सध्या पीओकेमध्ये नीलम नदीकिनारी असलेल्या शारदा पीठ मंदिराची दुरवस्था झाली आहे.