आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार सोमवारी कोसळले. मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याआधीच आपल्या समर्थक आमदारांसोबत सभागृहातून बहिर्गमन केले. त्यानंतर ते राजभवनात गेले आणि नायब राज्यपाल तमिलीसाई सुंदरराजन यांच्याकडे राजीनामा सादर केला. आपल्याच आमदारांच्या बंडखोरीमुळे काँग्रेसचे सरकार कोसळण्याची ही ११ महिन्यांतील दुसरी वेळ आहे.
पुद्दुचेरीत एक महिन्याच्या आत काँग्रेसच्या पाच आणि सहकारी पक्ष द्रमुकच्या एका आमदाराने राजीनामा दिला. त्यामुळे काँग्रेसचे आघाडी सरकार अल्पमतात आले होते. सरकारला बहुमतासाठी १४ आमदार आवश्यक असताना त्यांच्याकडे फक्त ११ आमदारच राहिले होते. एनआर काँग्रेसचे प्रमुख आणि विरोधी आघाडीचे नेतृत्व करत असलेले माजी मुख्यमंत्री एन. रंगासामी यांनी म्हटले आहे की, ‘आमची सध्या तरी सरकार स्थापन करण्याचा दावा करण्याची कुठलीही योजना नाही.’ विरोधी आघाडीत भाजपच्या तीन नामनियुक्त सदस्यांसह १४ आमदार आहेत.
किरण बेदी आणि केंद्राने कट केला : मुख्यमंत्री नारायणसामी
विधानसभा अधिवेशनात नारायणसामी म्हणाले, ‘माजी नायब राज्यपाल किरण बेदी आणि केंद्राने विरोधी पक्षांशी हातमिळवणी करून सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. आमचे आमदार सोबत राहिले असते तर सरकार पाच वर्षे चालले असते.’ ते म्हणाले, ‘विधानसभा अध्यक्षांनी नामनियुक्त आमदारांना सभागृहात मतदानाचा अधिकार देऊन आमचे सरकार पाडले. ही लोकशाहीची हत्या आहे.’
११ महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशचे सरकार असेच पडले होते
गतवर्षी मार्चमध्ये मध्य प्रदेशात काँग्रेसचे कमलनाथ यांचे सरकार असेच पडले होते. त्या वेळी ज्योतिरादित्य शिंदे समर्थक आमदारांनी बंड केले. त्यामुळे कमलनाथ यांना राजीनामा द्यावा लागला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.