आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबच्या फरीदकोटमध्ये डेरा प्रेमी प्रदीप सिंह यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 3 शूटर्सच्या मुसक्या आवळल्या आहेत. या हल्लेखोरांनी डेराप्रेमीवर तब्बल 60 गोळ्यांचा भडीमार केला होता. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, यामागे पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISIचे कारस्थान आहे. ISIने रिंदाच्या माध्यमातून डेरा प्रेमीची हत्या घडवून आणली. दुसरीकडे, हत्येची जबाबदारी गोल्डी बरारने घेतली होती. काही दिवसांपूर्वीच रिंदा व गोल्डीने हातमिळवणी केली होती.
दिल्ली पोलिसांनी सर्वच आरोपींना चकमकीनंतर पटियालाच्या बख्शीवाला गावातून अटक केली. यापैकी 2 शूटर रोहतक व एक भिवानीचा रहिवासी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पकडण्यात आलेले दोन्ही शूटर्स अल्पवयीन असून, एकाचे नाव जतिंदर जीतू असे आहे.
पंजाब-हरियाणाचे 2 मॉड्यूल
डेराप्रेमीच्या हत्येसाठी हरियाणा व पंजाब मॉड्यूल यूज करण्यात आले होते. यातील 4 नेमबाज हरियाणा व 2 पंजाबचे होते. दिल्ली पोलिसांनी जतिंदर जीतूला अटक केली आहे. जीतू हरियाणाच्या रोहतकमधील कलानौरचा आहे. उर्वरित दोघे रोहतक व भिवानीचे आहेत. त्यांचे वय 16 वर्षांचे आहे. या हरियाणा मॉड्यूलचा 1 व पंजाबचे 2 शूटर अजून फरार आहे.
गँगस्टर म्हणाला - बेअदबीमुळे हत्या
सोशल मीडिया पोस्टमध्ये गोल्डी बरार नावाने दावा करण्यात आला होता की, त्यांना बेअदबी प्रकरणात न्याय मिळाला नाही. यामुळे असे करावे लागले. या पोस्टमध्ये गनमॅन जखमी झाल्यावर त्याने नाराजीही व्यक्त केली. तसेच बेअदबीच्या आरोपींना सुरक्षा देण्यावरही सवाल उपस्थित केला. पण ही पोस्ट बरारने केली की अन्य कुणी हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
कुटुंबाचा अंत्यसंस्कार करण्यास नकार
दुसरीकडे, कुटुंबाने प्रदीप सिंह यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे पोलिसांची पंचाईत झाली आहे. ते सातत्याने कुटुंबीय व डेरा समितीची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण पीडित कुटुंबीयांमध्ये पंजाब सरकार व पोलिस प्रशासनाविरोधात मोठा रोष निर्माण झाला आहे.
मृतदेहासोबत निदर्शने करण्याचा इशारा
प्रदीप सिंह यांच्या कुटुंबाने न्याय मिळेपर्यंत अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. न्याय मिळाला नाही तर प्रदीपचे पार्थिव चौकात ठेवून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. डेऱ्याचे समर्थक हरचरण सिंग यांनी डेरा आपल्या अनुयायांसोबत असून, स्थानिक समितीही पीडितांच्या पाठिशी आहे, असे स्पष्ट केले आहे.
शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबाला सुपूर्द
पंजाब पोलिसांनी फरीदकोट वैद्यकीय महाविद्यालयात प्रदीप सिंह यांचे शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सोपवला आहे. त्यानंतर कुटुंबाने मृतदेह एका स्थानिक शवगृहात ठेवला. तसेच न्याय मिळेपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याची ठाम भूमिका घेतली आहे.
काँग्रेस म्हणाली - पंजाबसाठी धोक्याची घंटा
पंजाब काँग्रेस अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वरिंग यांनी या प्रकरणी राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, आप सरकारने जबाबदारीपासून पळ काढला आहे. लोकांनी शस्त्र हातात घेऊन खूनसत्र सुरू केले आहे. ही पंजाबसाठी धोक्याची घंटा आहे. हिंसा कोणत्याही समस्येवरील उपाय नाही. भाजप व शिअदच्या नेत्यांनीही ही स्थिती राज्यासाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे.
दुकान उघडताना गोळीबार
श्रीगुरु ग्रंथ साहिब यांच्या अवमाननेप्रकरणी आरोपी डेराप्रेमी प्रदीप सिंग यांची गुरुवारी फरीदकोटमध्ये हत्या करण्यात आली. प्रदीप त्यावेळी आपले दुकान उघडत होते. 2 दुचाकींवरून आलेल्या 5 हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात गनमॅनसह 3 जण जखमी झाले. जखमींत अन्य एका दुकानदाराचाही समावेश आहे.
बेअदबी केव्हा घडली?
प्रदीपने 2015 मध्ये बरगाडी गावातील गुरुद्वारा साहिमधून श्रीगुरु ग्रंथ साहिबची चोरी करून त्याची पाने फाडून टाकली होती. त्यावर शिख समुदायाने मोठा आक्रोष व्यक्त केला होता. त्यानंतर गुन्हा दाखल करुन प्रदीपला तुरुंगात पाठवण्यात आले. सध्या तो जामिनावर बाहेर आला होता. जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे प्रदीपला पोलिस सुरक्षाही मिळाली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.