आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंजाबच्या राजकीय फेरबदलांमुळे केंद्रीय विरोधी पक्षांकडून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजस्थान व छत्तीसगडमध्येही पंजाबसारख्या हालचाली हाेत आहेत. काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे की, राहुल गांधींवर जबाबदारी टाळणे व निर्णय घेण्यात संकोच करण्याचे आरोप होत राहिलेले आहेत. यामुळे कॅप्टन अमरिंदरसिंग यांना हटवल्यानंतर राहुल आणखी मोठे निर्णय घेऊ शकतात. काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवरही हे बदल होतील. यामुळे विरोधी पक्षांची एकजूट करण्याच्या धोरणालाही बळ मिळेल. या हालचालींमागे कॅप्टन यांचेही निवडणूक सल्लागार राहिलेल्या प्रशांत किशोर यांची महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा आहे. पंजाबमध्ये केलेले बदल २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीचाच एक भाग आहेत. आता पुढे काँग्रेसच्या केंद्रीय भूमिकेला बळ देण्यासाठी राहुल गांधी संसदेत विराेधी पक्षनेतेपदाची धुरा हाती घेऊ शकतात. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे विरोधकांची महाआघाडी उभारण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. ‘मोदी विरुद्ध राहुल’ याच मुद्द्यावर देशाचे राजकारण मर्यादित न होऊ देण्याचीही रणनीती आखण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा करणे, तृणमूलच्या मुखपत्रात ममता बॅनर्जींनाच खरा पर्याय म्हणून सादर करणे ही विरोधकांची नवी राजकीय खेळी असल्याचे सांगितले जाते.
विरोधकांच्या एकीसाठी काम करत असलेल्या रणनीतिकारांनुसार आगामी काळात अनेक नेत्यांना राष्ट्रीय पर्याय म्हणून सादर केले जाईल, म्हणजे भाजपला ‘मोदी विरुद्ध राहुल’चे कार्ड खेळता येणार नाही. त्याची सुरुवात ममतांपासून झाली आहे. इतर पक्षांसोबत समन्वयासाठी शरद पवारांकडे यूपीएचे औपचारिक पद देण्याची तयारी सुरू आहे. त्यांना संयोजक करायचे की कार्यवाहक अध्यक्ष, यावर मंथन सुरू आहे. पवारांकडे यूपीएसह तृणमूल काँग्रेस, बीजेडी, वायएसआर काँग्रेस, तेलंगण राष्ट्र समितीसारख्या बिगरभाजप पक्षांशी ताळमेळ साधण्याची जबाबदारी असेल.
काँग्रेसमध्येही बिगरगांधी नेत्याला मोठी जबाबदारी देणे याच व्यापक रणनीतीचा एक हिस्सा आहे. सूत्रांनुसार, कमलनाथ व गुलाम नबी आझाद यांना पुढे आणले जाईल. कमलनाथ राजकीय हालचालींचे प्रभारी असतील. गुलाम नबी आझाद इतर पक्षांशी समन्वय साधतील. सूत्रांनुसार, सोनिया गांधींनी कमलनाथ यांना या नव्या भूमिकेबाबत माहिती दिली आहे. कमलनाथ यांना कार्यवाहक पदाचे अधिकार दिले जातील, जेणेकरून त्यांना निर्णय घेता येईल. प्रशांत किशोर यांच्यावर २०२४ पर्यंत प्रचार रणनीतीची जबाबदारी असेल. त्यांनी पक्षप्रवेश करावा की, पडद्यामागून सूत्रे हलवावी, याबाबत मात्र संभ्रमावस्था आहे. त्यांचीच टीम निवडणुकीचे मुद्दे ठरवेल. याची चुणूक त्यांनी मोदींच्या वाढदिवशी बेरोजगार दिन साजरा करून दाखवली. राष्ट्रवाद, राममंदिरासारख्या भावनात्मक मुद्द्यांवर राजकीय ध्रुवीकरण टाळण्यासाठी निवडणुकीचे मुद्दे पेट्रोल-डिझेल दर, बेरोजगारी, शेतकऱ्यांची दूरावस्था व कोरोनाच्या मुकाबल्यातील अपयशाच्या दिशेने विणले जात आहेत.
सूत्रांनुसार, पंतप्रधानपदासाठी पर्याय म्हणून अनेक प्रादेशिक नेत्यांची नावे समोर आणली जातील. अखेरीस ‘मोदींशी कोण लढेल, मोदींशी देश लढेल’ आणि ‘नो व्होट टू बीजेपी’ या दोन घोषणांवर मिशन-२०२४ केंद्रित केले जाईल. रणनीतीची पटकथा आगामी विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान पूर्ण केली जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.