आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरात विधानसभा निवडणुकीला अवघ्या काही महिन्यांचा अवधी शिल्लक असताना काँग्रेसने येथील आपल्या प्रचार मोहिमेला चांगलाच वेग दिला आहे. त्यानुसार काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवारी गुजरात दौऱ्यावर पोहोचले. त्यांनी आदिवासीबहुल दाहोदमध्ये आदिवासी सत्याग्रह रॅलीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तिखट टीका केली. ते म्हणाले -मोदी ज्या गुजरात मॉडेलची भाषा करतात, त्या मॉडेलमध्ये 2 प्रकारचे भारत आहेत. एक श्रीमंतांचा व दुसरा सर्वसामान्य नागरिकांचा.
या कार्यक्रमाच्या समारोपावेळी 'काँग्रेस पार्टी रे काँग्रेस पार्टी' नामक थीम सॉन्ग वाजवण्यात आले. त्यावर राहुल गांधी आमदार चंद्रिकाबेन बारिया यांच्यासोबत थिरकले.
काँग्रेसला 2 भारत नकोत
राहुल गांधी म्हणाले -"ही प्रचारसभा नव्हे तर सत्याग्रहाची सुरुवात आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यांनी गुजरातमध्ये जे काम केले, ते आज संपूर्ण देशात केले जात आहे. त्याला गुजरात मॉडेल म्हटले जाते. या मॉडेलमुळे आज देशात 2 भारत तयार झालेत. एक श्रीमंतांचा, ज्यांच्याकडे सत्ता, धन व अहंकार आहे. तर दुसरा सर्वसामान्य जनतेचा."
ते पुढे म्हणाले -"या मॉडेलची चाचणी गुजरातमध्ये घेण्यात आली. त्यानंतर ते संपूर्ण भारतात राबवण्यात आले. पण, काँग्रेसला हे दोन भारत नको आहेत. आम्हाला सर्वांना समान अधिकार व सुखसुविधा देणारा एकसमान भारत हवा आहे."
आज 2-3 जण जनतेला पळवत आहेत
राहुल गांधी म्हणाले -"जगात केवळ गुजरातमध्ये आंदोलन करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. मी जिग्नेश मेवाणींना ओळखतो. सरकारने त्यांना 10 वर्षे तुरुंगात डांबले तरी काहीच फरक पडणार नाही. आम्हाला जनतेचा आवाज ऐकणारे जनता मॉडेल गुजरातमध्ये आणावयाचे आहे. सध्या केवळ 2-3 जण देशातील जनतेला पळवत आहेत. जनता हे मुकाट्याने सहन करत आहे. तुम्हाला ही वस्तुस्थिती माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला संघर्ष करावा लागेल. आगामी निवडणुकीनंतर गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार आले तर ते आदिवासींचा आवाज असेल. येथे आदिवासी आमदार असेल. त्यामुळे तो सांगेल तेच सरकार करेल."
रॅली दाहोदच्या ऐतिहासिक नवजीवन आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती.
टीव्हीवर एकच चेहरा दिसतो
राहुल यांनी यावेळी कोरोनाचा दाखला देत पुन्हा मोदींवर हल्ला चढवला. ते म्हणाले -"पंतप्रधान म्हणत होते थाळ्या वाजवा. पण, त्यानंतरही लाखो लोकांचा बळी गेला. टीव्हीवर केवळ एकच चेहरा दिसतो. तो म्हणजे नरेंद्र मोदींचा. या सरकारने सरकारी शाळा बंद करुन त्यांचे खासगीकरण केले."
आदिवासी काँग्रेसची पारंपरिक व्होट बँक
गुजरातमध्ये एससी-एसटी व आदिवासी समाजाचा जवळपास 40 जागांवर प्रभाव आहे. आदिवासी काँग्रेसची पारंपरिक व्होट बँक आहे. त्यामुळे राहुल गांधींची आदिवासी सत्याग्रह रॅली अत्यंत महत्वाची आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने काँग्रेसला जोरदार धक्का देत त्यांचे 5 हून अधिक आदिवासी आमदाराना आपल्या बाजूने वळवले होते. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे आदिवासी नेते व आमदार अश्विन कोतवाल यांनीही भाजपत प्रवेश केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.