आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय मंत्री किरण रिजिजू सैनिकांसोबतच्या एका भेटीचे छायाचित्र शेयर करून वादात सापडलेत. काँग्रेसने त्यांचा हा फोटो 3 वर्ष जुना असल्याचा दावा केला आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी व्ही श्रीनिवास यांनी रिजीजू यांचे दोन्ही फोटो एकत्र ट्विट करत रिजीजू यांना कात्रीत पकडले आहे. 2019 च्या फोटोचा वापर करून 2022 मध्ये सुरक्षेची ग्वाही दिली जात आहे. अद्भूत घोटाळा आहे, असे ते आपल्या ट्विटमध्ये म्हणालेत.
केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी शनिवारी सैनिकांसोबतचे एक छायाचित्र ट्विट करत तवांग पूर्णतः सुरक्षित असल्याचा दावा केला होता. काँग्रेसने त्यांचे हे छायाचित्र 3 वर्ष जुने असल्याचा आरोप केला आहे.
केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी शनिवारी सैनिकांसोबतच्या भेटीचे एक छायाचित्र ट्विट केले. त्यात त्यांनी तवांग पूर्णतः सुरक्षित असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, अरुणाचल प्रदेशच्या तवांगमधील यांगत्से क्षेत्र भारतीय लष्कराच्या बहाद्दर जवानांच्या मुबलक तैनातीमुळे आता पूर्णतः सुरक्षित आहे.
राहुल गांधींच्या चीनसंबंधीच्या विधानावर वाद
अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये 9 डिसेंबर रोजी भारत-चीनच्या सैनिकांत झालेल्या चकमकीवरून राजकीय चिखलफेक सुरू झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी या प्रकरणी चीनचे सीमेलगतचे बांधकाम भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा आरोप केला. ते एका ट्विटमध्ये म्हणाले - चीन डोकलामच्या जामफेरी रिजपर्यंत बांधकाम करत आहे. यामुळे सिलीगुडी कॉरिडोरला धोका उत्पन्न होत आहे. सिलीगुडी नॉर्थ ईस्टचे प्रवेशद्वार आहे. हे आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी चिंताजनक आहे. त्यामुळे मोदीजी, चीनवर केव्हा चर्चा होणार?
दुसरीकडे, भाजप अध्यक्ष जे नड्डा यांनी राहुल यांचे विधान सैनिकांचे खच्चीकरण करणारे असल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधींचे विधान सैनिकांचे मनोधैर्य कमकूवत करणारे आहे. त्याचा निषेध करावा तेवढे कमी आहे. भारतीय सेना शौर्य व पराक्रमाचे प्रतीक आहे. देशावर संकट येते तेव्हा भारतीय सेना प्राणपणाने देशाची सुरक्षा करते.
राहुल गांधींच्या तोंडी चीन-पाकची भाषा - नड्डा
नड्डा असेही म्हणाले की, "चीनच्या साम्यवादी पक्षाने काँग्रेससोबत एक करार केल्याचे आम्हाला माहिती आहे. राजीव गांधी फाउंडेशनलाही चिनी दुतावासाने केलेल्या आर्थिक मदतीची आम्हाला माहिती आहे. कदाचित यामुळेच राहुल गांधी वारंवार चीन व पाकची भाषा बोलतात."
ते म्हणाले - "भारतीय लष्कर डोकलाममध्ये होते तेव्हा राहुल गांधींनी शांतपणे चिनी दुतावासातील अधिकाऱ्यांची भेट घतेली होती. त्यांनी सर्जिकल स्ट्राइक व पुलवामा हल्ल्यावरही सवाल उपस्थित केले होते. यावरून ते भारताची भाषा बोलत नसल्याचे स्पष्ट होते. मी अशा विधानांचा निषेध करतो. यातून राहुल यांची देशाप्रती असणारी मानसिकता उजेडात येते."
दुसरीकडे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनीही काँग्रेसवर सैन्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, आम्ही विरोधकांच्या नेत्यांच्या हेतूवर केव्हाच प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही. आम्ही केवळ धोरणात्मक मुद्यांवर चर्चा केली. दुसरीकडे, कायदे मंत्री किरण रिजीजू तवांगच्या यांगत्से भागात पोहोचलेत. येथेच भारतीय जवानांची चिनी लष्करासोबत हिंसक चकमक झाली होती. त्यांनी भारतीय जवानांशी चर्चा करून स्थितीचा आढावा घेतला.
आता क्रमवारपणे ही 6 विधाने वाचा...
1. मल्लिकार्जुन खरगे मोदींना म्हणाले - चीनवर चर्चा केव्हा?
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे शनिवारी एक बातमी ट्विट केली. ते म्हणाले - चीन डोकलामपासून जामफेरी रिजपर्यंत सातत्याने बांधकाम करत आहे. हा भाग भारताच्या सिलीगुडी कॉरिडोरपासून अत्यंत जवळ आहे. त्यामुळे हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी चिंतेचा विषय आहे.
त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत विचारले की, अखेरीस चीनवर चर्चा केव्हा होईल? तत्पूर्वी त्यांनी मोदी सरकारने आपल्या लाल डोळ्यांवर चिनी चश्मा लावल्याची तिखट टीका केली होती.
2. राजनाथ म्हणाले - लष्कराने जादू केली
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शनिवारी सकाळी संसदेत म्हणाले -मी संसदेत जे म्हणालो त्याहून वेगळे बोलणार नाही. गलवान असो वा तवांग, आपल्या सशस्त्र दलांनी आपला पराक्रम व शौर्य सिद्ध केले आहे. लष्कराने आपल्या धाडसामुळे सीमेवर करिश्मा केला आहे. आम्ही केव्हाही विरोधी पक्षनेत्यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही. आम्ही केवळ धोरणात्मक मुद्यावर चर्चा केली.
3. राहुल म्हणाले - चीनची भारतीय सैनिकांना मारहाण
भारत जोडो यात्रेला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी शुक्रवारी जयपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी चीनच्या मुद्यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना सल्ला दिला. ते म्हणाले की, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी आपली विचारसरणी व समज मोठी केली पाहिजे. चीन युद्धाची तयारी करत आहे. पण सरकार याकडे डोळेझाक करत वस्तुस्थिती लपवण्याचा प्रयत्न करत आहे. चीन युद्धाची तयार करत आहे. याऊलट आपले सरकार झोपले आहे.
भारताचे सरकार रणनितीकपणे काम करत नाही. ते इव्हेंट बेसवर काम करते. जिओ पॉलिटिक्सच्या मुद्यावर इव्हेंट कामी येत नाहीत. तिथे ताकद कामास येते, असे राहुल म्हणाले. राहुल पुढे बोलताना म्हणाले की, चीनच्या मुद्यावर कुणीही प्रश्न विचारत नाही. चीनने भारताचा 2 हजार चौरस किलोमीटर भूभाग गिळंकृत केला आहे. भारताचे 20 जवान शहीद केलेत. ते आपल्या जवानांना अरुणाचल प्रदेशातही मारहाण करत आहेत.
4. राहुल गांधींच्या विधानाने रक्त उसळते - सिरसा
भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी राहुल यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले -राहुल यांचे विधान पाहून माझे रक्त उसळत आहे. अशी देशविरोधी विधाने केल्याप्रकरणी सोनिया व प्रियंका गांधी यांनी राहुल गांधी यांना मारले पाहिजे. असे केल्यास त्यांना देशाप्रती एकनिष्ठ राहण्याची समज येईल.
गत 9 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग क्षेत्रात भारत-चिनी सैनिकांत चकमक झाली होती. त्यानंतर विरोधकांनी केंद्रावर तिखट हल्ला चढवला आहे. 2 दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी या प्रकरणी केंद्रावर टीका केली होती. चिनी सैनिक भारतीय जवानांना मारहाण करत आहेत. तर भारत सरकार त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी रोखत आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.
5. राज्यवर्धन सिंह म्हणाले - राहुलचे विधान लज्जास्पद
भाजप खासदार राज्यवर्धन सिंह राठोड म्हाले की, राहुल गांधींचे आजोबा चीनच्या एवढे जवळ गेले होते की, त्यांना पुढे काय होणार आहे हे माहिती होते. पण त्यांनी झोपेचे सोंग घेतले. या झोपेतच त्यांनी भारताचे 37 हजार चौरस किमी भाग गमावला. तत्पूर्वी, भाजप नेते युधवीर सेठी यांनी महबूबा मुफ्तींचे विधान लज्जास्पद असल्याचा दावा करत त्या चीनच्या एजंट आहेत की प्रवक्त्या? असा सवाल केला होता.
6. मुफ्ती म्हणाल्या - सैनिकांना प्रत्युत्तर देण्यापासून रोखले जात आहे
तवांगमधील हिंसक चकमकीनंतर महबूबा मुफ्ती यांनी बुधवारी केंद्रावर टीकेची झोड उठवली होती. त्या म्हणाल्या - केंद्र सरकार जवानांना पलटवार करण्याची परवानगी देत नाही. सैनिकांना प्रत्युत्तर देण्यापासून रोखले जात आहे. भाजपच्या निवेदनानुसार, चीनने लडाख व अरुणाचलमधील आपल्या भूभागावर ताबा मिळवला आहे. पण भाजपने काहीच केले नाही. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आपल्या सैनिकांना मारहाण होत आहे. त्यानंतरही त्यांना प्रत्युत्तर देण्यापासून रोखणे अत्यंत खेदजनक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.