आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात इंधन दरवाढ सुरू आहे. रोजच पेट्रोल-डिझेलची दरवाढ होताना पाहायला मिळत आहे. याच मुद्याला धरत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर खोचक टीका केली आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे देशात महागाईचा भडका उडाला आहे. या दरवाढीने वाहनचालकांचे आर्थिक गणित कसे कोलमडले याची आकडेवारी राहुल गांधी यांनी जारी केली, ही 'प्रधानमंत्री जनधन लूट योजना' आहे अशी टीका राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली आहे.
वाढत्या इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस देशभरात मोदी सरकारविरोधात आंदोलन करताना पाहायला मिळत आहे. या दरवाढीवरुन राहुल गांधी यांनी निशाणा साधला. राहुल गांधी यांनी केंद्रात भाजपचे सरकार येण्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलचा वाहनधारकांना येणारा खर्च आणि आताचा खर्च याची आकडेवारीच सादर केली आहे.
राहुल गांधी यांनी एक ट्विट केले असून, यात त्यांनी आकडेवारी जारी केली आहे. यात 26 मे 2014 मध्ये जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा भाव 108.05 डॉलर इतका होता. 4 एप्रिल 2022 रोजी कच्च्या तेलाचा भाव 99.42 डॉलर इतका आहे. ही आकडेवारी पाहता त्यांनी विविध वाहनांना पूर्ण टाकी इंधन भरणासाठी किती खर्च येईल याची आकडेवारी देखील सादर केली आहे.
मे 2014 साली स्कुटर किंवा दुचाकीची टाकी पूर्ण भरण्यासाठी 714 रुपये मोजावे लागायचे. आज 4 एप्रिल 2022 साली पूर्ण टाकी भरण्यासाठी 1038 रुपये लागतात. त्याचा अर्थ असा की, अवघ्या आठ वर्षात नागरिकांना 324 रुपये अधिकचे मोजावे लागले. याशिवाय 2014 मध्ये कारची टाकी पूर्ण भरण्यासाठी 2856 रुपये खर्च होता तो आता थेट 4152 रुपये इतका वाढला आहे. इंधन महागाईमुळे वाहनधारकाला 1296 रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे.
शेतकऱ्यांना देखील महागाईचा मोठा फटका
वाढत्या महागाईचा शेतकऱ्यांना देखील फटका बसला आहे. राहुल गांधी यांनी जारी केलेल्या आकडेवारीतून हे दिसून आले आहे. मे 2014 मध्ये ट्रॅक्टरची इंधन टाकी फूल भरण्यासाठी 2749 रुपयांचा खर्च यायचा. आज 4 एप्रिल 2022 मध्ये ट्रॅक्टरसाठी 4563 रुपये इतका खर्च येत आहे. यात शेतकऱ्यांना अधिकचे 1814 रुपये इंधनासाठी जादा मोजावे लागत आहे.
मालवाहतूकदार आणि उद्योजकांना देखील फटका
इंधन महागाईचा मोठा आर्थिक फटका मालवाहतूकदार आणि उद्योजकांना देखील बसला आहे. मोठ्या ट्रकसाठी 2014 मध्ये इंधन भरण्यासाठी 11456 रुपये मोजावे लागत होते. मात्र आज 4 एप्रिल 2022 रोजी हा खर्च 19014 रुपयांपर्यंत वाढला आहे. यात तब्बल 7558 रुपयांची वाढ झाली आहे.
दिवसेंदिवस होणारी इंधनवाढ यावरुन राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. इंधन महागाईवर शांत बसलेल्या केंद्र सरकारची ही 'प्रधानमंत्री जन धन लूट योजना' आहे अशा खोचक शब्दांत राहुल गांधी यांनी टीका केली आहे.
आज 12व्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ
कच्च्या तेलाची किंमत प्रतिबॅरल 100 डॉलरच्या जवळ आली असली, तरी भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याचा ट्रेंड कायम आहे. दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 40-40 पैशांनी वाढ झाली आहे. यासह दिल्लीत आज पेट्रोलचा दर 103.81 रुपये प्रति लिटर झाला आहे. त्याचवेळी डिझेलचा दर 95.07 रुपये प्रति लिटर झाला आहे. गेल्या 14 दिवसांत आज 12 व्यांदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. 22 मार्चपासून दरवाढीची प्रक्रिया सुरू झाली. या दरम्यान, 24 मार्च आणि 1 एप्रिल या दोनच दिवसांसाठी किमती वाढल्या नाहीत.
दुसरीकडे वाढत्या महागाईवरुन विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईत पेट्रोल 118.81 रुपये तर डिझेल 103.04 रुपयांना विकले जात आहे. तर, पुणे शहारात 118.29 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेल 101.01 रुपयांवर पोहोचला आहे.
देशातील प्रमुख शहरांसह महाराष्ट्रातील शहरांचा भाव
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.