आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनसे प्रमुख राज ठाकरेंनी शनिवारी रत्नागिरीतील सभेतून कोकणातील प्रकल्पांवरून उद्धव ठाकरेंवर तिरकस निशाणा साधला. यावेळी पवारांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना खोचक चिमटेही त्यांनी काढली.
महापौर बंगला विचारून ढापला का?
पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष आज बारसूला येऊन गेले. लोकांची जी भावना आहे ती आमची भावना आहे असे ते म्हणाले. मग मुंबईचा महापौर बंगला काय लोकांना विचारुन ढापला का? अशा शब्दांत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला.
जमीन कशाला हवी हे विचारा
सगळ्या कोकणवासियांना माझी ही विनंती आहे की तुमची जमीन घ्यायला कुणी आला तर त्याला विचारा की तुला कशाला ही जमीन हवी आहे? हीच जमीन तुम्हाला उद्या पैसे देईल. आत्तापर्यंत जे व्यापारी लोकप्रतिनिधी निवडून देत आलात ना? त्यांना जरा घरी बसवा असेही राज ठाकरे म्हणाले. तुमच्या पायाखालची जमीन गेली की तुमचं अस्तित्व काय? कोण तुम्ही? तुम्ही या देशाचे नागरिक आहात म्हणजे काय आहात? या जमिनीचा तुकडा तुमच्या नावावर आहे, त्यावर तुम्ही उभे आहात. जमीन म्हणजे काय? भुगोल. मोगलांचं राज्य आलं, ब्रिटिशांचं राज्य आलं, युद्ध झाले. यांनी तिथे आक्रमण केलं, या सगळ्यांकडे इतिहास म्हणून पाहिले तर इतिहास भुगोलाशिवाय नाही असे राज ठाकरे म्हणाले.
बारसूनंतर संताप झाला
पायाखालची जमीन काढून कोणत्यातरी व्यापाऱ्यांना विकताय, आपण कोणासाठी जमीन सोडतोय, काय करतोय याचं भान आपल्याला नाही असे राज म्हणाले. नाणार, बारसू प्रकरणानंतर मला संताप झाला होता. मला एकदा येऊन कोकणवासियांशी बोलायचंच होतं. माझ्या कोकणातील तरुण तरुणींना रोजगार हवाय. ज्या गोष्टी कोकणात आहेत, त्यात एक केरळसारखं राज्य चालू आहे. आपण काय घेऊन बसलोय. हे प्रकल्प कधी केरळात नाही जात. गोव्यात नाही जात असेही राज ठाकरे म्हणाले.
पवारांना खरंच राजीनामा द्यायचा होता
शरद पवारांना खरंच राजीनामा द्यायचा होता. पण अजित पवार त्या दिवशी जसे वागले ते पाहून त्यांनी राजीनामा मागे घेतला असावा असे मला वाटते असे राज ठाकरे म्हणाले. अजित पवार त्या दिवशी जसे वागत होते, ते पाहून पवारांनी त्यांचा निर्णय बदलला असावा. पवारांनी राजीनामा दिला त्या दिवशी अजित पवारांचे ए तू गप्प बस, ए तू शांत बस, कार्यकर्त्यांच्या हातातला माईक घे, असे सुरू होते. हे पाहून पवारांना वाटले असेल की हा आताच असे वागतो, उद्या मी राजीनामा दिल्यावर उद्या मलाही म्हणेल गप्प बस. त्या भितीपोटी त्यांनी राजीनामा मागे घेतला असावा असे राज ठाकरे म्हणाले.
तेच ते लोकप्रतनिधी निवडून दिल्याने प्रश्न प्रलंबित
आज कोकणात आलोय. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पण ते प्रलंबित राहण्यामागील कारणे ही तुम्ही आहात. कारण तुम्ही त्याच त्या व्यापारी लोकप्रतिनिधींना निवडून देत आहात. तीच माणसं पुन्हा निवडून येत आहेत. राज्य सरकारमध्ये त्यांना किंमत नाही असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
16 वर्षांतही महामार्ग पूर्ण का नाही
मुंबई-गोवा महामार्गाचं काम 2007 मध्ये सुरु झालं. पण अजूनही पूर्ण झालेलं नाही. काय करताय तुमचे आमदार, खासदार, काय करताय तुमचे लोकप्रतिनिधी? कारण त्याच त्याच लोकांना तुम्ही निवडून देत आहात. त्यांना फरकच पडत नाही. काम केलं काय किंवा नाही केलं काय, ही माणसं निवडून देणारच आहेत असे ते म्हणतात. खड्ड्यांतून जाणारे तुम्ही.
फडणवीसांना फोन केला, ते म्हणाले गडकरींना बोला
मी या रस्त्यावरुन गेल्यानंतर फडणवीसांना फोन केला. ते म्हणाले, तुम्ही नितीन गडकरी यांच्याशी बोलून घेता का. मग मी गडकरींना फोन केला. ते म्हणाले, कंत्राटदार पळून गेले. पळून गेले? ज्यांना आजपर्यंत निवडून दिले त्यांनी एकदा तरी विचारलं का, का पळून गेले? कारण यांना फक्त मतदानाशीच संबंध आहे.
तुम्हाला गृहित धरलंय
अन् समृद्धी महामार्ग पाहा, चार वर्षांत सुरूही झाला. पण कोकणातले रस्ते 16 वर्षांतही होत नाही मी नेहमी सांगत आलोय की तुम्हाला गृहीत धरलेलं आहे. मतदानाच्या दिवशी जीवंत राहा, म्हणजे झालं, बाकी तुम्हाला मोजतं कोण? अशा शब्दांत राज ठाकरेंनी राजकीय इच्छाशक्तीवर टीका केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.