आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले आहे. मात्र, हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात ठाकरे सरकार आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, अशा धमक्यांचे पत्र शिवसेना भवनामध्ये आम्हाला रोजच येत असतात. मात्र, महाराष्ट्राच्या कोणत्याही नेत्याला कोणीही हात लावू शकत नाही, असे संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रातील नेत्यांचे संरक्षण करण्यासाठी ठाकरे सरकार सक्षम आहे. तरीही कुणाला हवी असल्यास ते केंद्राची सुरक्षा मागवू शकतात. मात्र, उगीचच नौटंकी करू नये. अशा धमक्यांचे पत्र आम्हाला रोजच येतात, असे राऊत म्हणाले.
राणा दाम्पत्याने दिल्लीतच काय, चंद्रावरही हनुमान चालिसा म्हणावी!
14 मेरोजी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. त्याचदिवशी दिल्लीत राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा पठनाचे आयोजन केले आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, राणा दाम्पत्याने दिल्लीतच काय न्यूयाॅर्क, दुबई अगदी चंद्रावरही हनुमान चालिसा म्हणावे. आमचे त्यावर काहीच म्हणणे नाही, असा टोला राऊतांनी लगावला.
...तर देशात श्रीलंकेहून भयानक स्थिती
आर्थिक आणीबाणीमुळे श्रीलंकेत हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. नागरिक मंत्र्यांचे, राष्ट्राध्यक्षांचे घर जाळत आहे. नेत्यांना देश सोडून पळावे लागत आहे. भारतातदेखील महागाईबाबत आता गंभीर समस्या निर्माण होत आहे. जीवनावश्यक वस्तुंचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. तरीही केंद्र सरकार या मुद्दयांकडे प्राथमिकतेने लक्ष देत असल्याचे दिसत नाही. केंद्राने महागाई रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना न केल्यास देशात श्रीलंकेहून गंभीर स्थिती निर्माण होईल. तेव्हा निर्माण होणाऱ्या अराजकाला केंद्र सरकारच जबाबदार असेल, असा इशारा राऊत यांनी दिला.
तसेच, श्रीलंकेतही महागाईपासून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी धार्मिक, जातीय दंगे भडकवले गेले. मात्र, आता त्या देशात काय स्थिती आहे हे पहावे व आता तरी सुधारणा करावी, असे राऊत म्हणाले.
जितेंद्र नवलानींना फरार करण्यामागे अदृश्य शक्तींचा हात
ईडीच्या नावाने खंडणी वसुल केल्याचा आरोप असलेल्या जितेंद्र नवलानीविरोधात आज एसीबीने लुक आऊट नोटीस जारी केली आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, व्यवसायिक नवलानी देशाबाहेर पळून गेल्याचे समजते आहे. त्याला फरार करण्यामागे नक्कीच कोणत्या तरी शक्तीचा हात आहे. हे पूर्ण रॅकेट समोर येणे गरजेचे आहे, असे राऊत म्हणाले.
लटके निष्ठावंत शिवसैनिक होते
शिवसेनेचे अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाबद्दल संजय राऊत यांनी शोक व्यक्त केला. राऊत म्हणाले, रमेश लटके हे निष्ठावंत शिवसैनिक होते. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात ते नेहमी अग्रस्थानी असायचे. त्यांच्या जाण्याने निश्चितच एक पोकळी निर्माण झाली आहे, असे राऊत म्हणाले. तसेच, त्यांचे पार्थिव सध्या दुबईत आहे. उद्या संध्याकाळपर्यंत किंवा परवा ते मुंबईत येईल. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.