आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंचे CM ठाकरेंना खरमरीत पत्र:म्हणाले -सहनशीलतेचा अंत पाहू नका; सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही आलेला नाही!

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी भोंग्यावरून राज्य सरकारला सुनावले आहे. राज्य सरकारला माझे एकच सांगणे आहे; आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत- जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही! असे म्हणत राज ठाकरे भोंग्याच्या मुद्यावरून आक्रमक झाल्याचे पाहायले मिळत आहे.

राज ठाकरेंच्या पत्रात नेमके काय?

सर्व देशबांधवांना मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखे वागत आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि विविध राज्यातील उच्च न्यायालये यांनी दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी महाराष्ट्र सैनिकांनी 4 मे रोजी भोंगे उतरवा आंदोलन सुरू करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल 28 हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजारोंना तडीपार केले आणि अनेकांना तुरुंगात डांबले. कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी!

गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलिस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडलाय की; मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? आमचा संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलिस असे काही शोधत आहेत, जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले रझाकार आहेत! अर्थात, महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत.

राज्य सरकारला माझे एकच सांगणे आहे; आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही! असे म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशाराच दिला आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रदिनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेतली होती. मशिदींवरील भोंग्यांचा आवाज हाच त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दा होता. भोंग्यांवरून अजान झालीच तर आम्ही पुन्हा दुप्पट आवाजाने मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू, असा इशारा राज ठाकरे यांनी त्यांवेळी दिला होता. जोपर्यंत सर्व मशिदींवरील अनधिकृत भोंगे कायमचे उतरत नाही व ही सामाजिक समस्या कायमची संपत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे देखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.

शिवसेना - मनसे आमने सामने

अयोध्या दौऱ्यावरून शिवसेना आणि मनसे आमने सामने आल्याचे पाहायला मिळते आहे. राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर आता त्यावर चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांना त्यांचा अयोध्या दौरा यशस्वी करायचा असून प्रवक्ते वगळता इतर कोणीही आपल्या अयोध्या दौऱ्याबाबत माध्यमांशी बोलू नये अशी स्पष्ट ताकीद मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांनी दिली आहे. तर दुसरीकडे भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी उत्तर भारतीयांची माफीशिवाय राज ठाकरे यांना प्रवेश नाही, अशी भूमिका घेतली आहे. सिंह यांच्या समर्थकांनी राज ठाकरेंविरोधात रॅली काढून जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे राज ठाकरे हे उत्तर प्रदेशात गेल्यास त्यांचा भाजप खासदारासोबत संघर्ष होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज 5 जूनला अयोध्येला जाणार आहेत म्हणून मनसैनिक मोठ्या प्रमाणावर तयारीला लागले आहेत. मनसेकडून मुंबईत 'अयोध्या चलो'चे पोस्टर लावण्यात आले आहेत.

शिवसेनेकडून अयोध्योत बॅनरबाजी करण्यात आली होती. यावर असली आ रहे है नकली से सावधान अस मजकूर होता. हे बॅनर अयोध्या प्रशासनाने काढले असून यामुळे राज ठाकरेंच्या दौऱ्याला भाजपचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. तर आजच शहनवाज हुसेन यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या भाजप खासदारांची भेट घेतली आहे. यात त्यांची समजूत काढल्याची माहिती समोर येत आहे.

राज यांनी केले होते विखारी विधान

राज ठाकरे यांनी औरंगाबादेतील सभेत बोलताना विखारी विधान केले होते. ते म्हणाले की, मशिदीवरील भोंगे उतरवायला हवे. यांना रस्त्यावर नमाज पठण करण्याचा अधिकार कुणी दिला. आवाज आला तर तोंडात बोळा कोंबा, विनंती करून समजतील तर ठिक अन्यथा एकदा होऊनच जाऊद्या अशी चिथावणीही राज ठाकरे यांनी दिली होती.

बातम्या आणखी आहेत...