आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंची पत्रपरिषद:म्हणाले- धार्मिक रंग द्याल तर आम्हीही देऊ; 92% मशिदींत भोंग्यावर अजान नाही, पुन्हा झाली तर पुन्हा आंदोलन

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज सकाळपासून मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे. पुणे, धुळ्यासह अनेक ठिकाणी मनसैनिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड केली जात आहे. यापार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. आमच्या आंदोलनामुळे राज्यात आज 92 टक्के मशिदींमध्ये पहाटेची अजान भोंग्यांवरून झाली नाही, असा दावा राज ठाकरेंनी केला. तसेच, पुन्हा भोंग्यांवरून अजान झालीच तर आम्ही पुन्हा दुप्पट आवाजाने मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

कायद्याचे पालन आम्हीच करायचे का?

भोंग्यांबाबत आम्ही केवळ कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तरीदेखील आमच्यावरच कारवाई का केली जाते, असा सवाल राज ठाकरे यांनी सरकारला केला आहे. भोंग्यांचा मुद्दा हा धार्मिक नाही. आम्ही सामाजिक भूमिकेतून याला विरोध करत आहे. भोंग्यांचा त्रास सर्वांनाच होतो. त्यामुळे केवळ मशिदींवरील अनधिकृत भोंगे नव्हे तर मंदिरांवरीलही अनधिकृत भोंगे काढावेत, असेदेखील राज ठाकरे म्हणाले.

मुंबईत 135 मशिदींकडून नियमांचे उल्लंघन

मुंबईत आज 1440 पैकी 135 मशिदींवर पहाटे 5 वाजेच्या आत भोंग्यांवरून अजान झाली. त्यावर राज्य सरकार कारवाई करणार का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. काल आपली मुंबई पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांच्याशी चर्चा झाली. तेव्हा मशिदींच्या मौलवींशी आपली चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, पहाटे 5 च्या आत अजान होणार नाही, असेदेखील विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले होते. मग, अजान कशी झाली, नियम फक्त आमच्यासाठीच आहेत का, असेही प्रश्न राज ठाकरेंनी केले.

आंदोलन सुरूच राहणार

मनसेतर्फे भोंग्यांविरोधात करण्यात आलेले आंदोलन आजच्या पुरते मर्यादित नव्हते. जोपर्यंत सर्व मशिदींवरील अनधिकृत भोंगे कायमचे उतरत नाही व ही सामाजिक समस्या कायमची संपत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असेदेखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. आमचा प्रार्थनेला विरोध नाही. पण भोंग्यांवरूनच प्रार्थना करण्यासाठी अट्टहास कशासाठी? महाराष्ट्रात हे थांबलेच पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच, राज्यात दंगे व्हावेत अशी आमची अजिबात इच्छा नाही. पण भोंगे उतरायलाच हवेत, असे राज म्हणाले.

...तर आम्ही या मुद्द्याला धार्मिक वळण देऊ!

मशिदींवरील भोंगा हा धार्मिक मुद्दा नाही. वर्षभर, त्यातही दिवसभर मशिदींकडून जी अजान दिली जाते, त्यामुळे जो त्रास होतो, त्यालाच आमचा विरोध आहे. मात्र, या मुद्द्याला कुणी धर्मावरून प्रत्युत्तर देत असेल तर आम्हीही तसेच प्रत्युत्तर देऊ, असेदेखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मशिदींना 365 दिवस परवानगी कशासाठी?
हिंदुच्या धार्मिक सणांना एका आठवड्यासाठी किंवा 15 दिवसांसाठी अशी परवानगी दिली जाते. मग मशिदींनाच भोंग्यांसाठी 365 दिवसांची परवानगी कशासाठी दिली जाते, असा सवाल राज ठाकरेंनी केला. मशिदींना 365 दिवस परवानगी द्यायची असले तर त्यांना रोज परवानगी घेणे बंधनकारक करावे. तेदेखील सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे त्यांनी आश्वासन दिले तरच त्यांना परवानगी द्यावी, असे राज ठाकरे म्हणाले. सुप्रीम कोर्टाने 55 डेसिबलपर्यंत भोंग्यांना परवानगी देण्याचे निर्देश दिले आहेत. म्हणजेच भोंग्यांचा आवाज मिक्सरच्या आवाजापेक्षा अधिक असता कामा नये, याची दक्षता मशिदींनी घ्यावी. मुळात प्रार्थनेसाठी भोंगा हवाच कशाला, आपली प्रार्थना कोणाला ऐकवायची आहे, पोलिसांना काय रोज तुमच्या भोंग्यांचा डेसिबल मोजण्याचाच धंदा आहे का, असे सवाल राज ठाकरे यांनी केले.

मला राज्याबाहेरूनही फोन आले!
भोंग्यांविरोधात मनसेने आज सकाळपासून आंदोलन सुरू केल्यानंतर पोलिसांकडून मनसैनिकांची धरपकड सुरू आहे. त्यानंतर राज्यातील विविध भागातून आमच्या नेत्यांना फोन येत आहेत. मला पोलिसांचे फोन आले. राज्याबाहेरूनही फोन आले. त्यामुळे आज संध्याकाळी 6 वाजता होणारी पत्रकार परिषद मी आताच घेतली. काही मुद्द्यांबाबत आताच सुचना जाणे गरजेचे होते, असे राज ठाकरे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...