आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजस्थानच्या अलवरमध्ये ऑनर किलिंगची थरारक घटना घडली आहे. हरियाणातून एका तरुणाचे अपहरण करून त्याची अलवरच्या जंगलात निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह जयपूरच्या ग्रामीण भागात फेकण्यात आला. हे हत्याकांड बहिणीच्या लव्ह मॅरेजमुळे नाराज झालेल्या भावाने घडवले. हरियाणा पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. गत 30 मार्च रोजी ही घटना घडली.
जयपूर ग्रामीणमध्ये आढळला होता मृतदेह
गत 30 मार्च रोजी जयपूर ग्रामीणच्या भाबरू ठाणे हद्दीतील जयपूर-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील अलवर पूलाखाली एक मृतदेह आढळला होता. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यानंतर मृत तरुण हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यातील खोड गावचा दीपक चौहान (28) असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस पीडित कुटुंबाच्या घरी पोहोचले असता संपूर्ण प्रकरणावरून पडदा दूर झाला. दीपक ऑनर किलिंगचा बळी ठरल्याचे तपासात उघड झाले.
गावातीलच तरुणावर हत्येचा आरोप
दीपक चौहानचा मोठा भाऊ विनय सिंह चौहान लष्करात आहे. विनयने सांगितले की, दीपकने गावातीलच अनु (20) नामक तरुणीशी 27 मार्च रोही हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यात लव्ह मॅरेज केले होते. त्यांचे कुटुंब चौहान व अनुचे कुटुंब तंवर गोत्राचे आहे. या लग्नाला अनुच्या कुटुंबाचा विरोध होता.
विनय यांच्या मते, आपल्या मुलीने कुटुंबाविरोधात जात एका चौहानशी लग्न केल्याचा राग आरोपीच्या कुटुंबाला होता. या लग्नामुळे आपली अब्रु गेल्याचा संतापही त्यांच्या मनात होता.
याचा बदला घेण्यासाठी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी 28 मार्च रोजी सायंकाळी अनुचा भाऊ संजयने काही लोकांच्या मदतीने दीपकचे अपहरण केले. त्याच दिवशी दीपकला घेऊन ते रेवाडीला (हरियाणा) गेले. तिथे त्यांनी दीपकचा मित्र विवेकचेही अपहरण केले.
जंगलात केली बेदम मारहाण
विनय सिंह यांचा आरोप आहे की, ते दीपकला रेवाडीतून भानगड (अलवर) जंगलात घेऊन गेले. येथे त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्याचे डोके फोडण्यात आले व दोन्ही कान कापले गेले. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह जयपूर ग्रामीण भागातील एका पुलाखाली टाकण्यात आला.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपींनी विवेकला रेवाडी सेक्टर 4 येथे सोडले. विवेक सध्या महेंद्रगड (हरियाणा) पोलिसांच्या ताब्यात आहे.
गावात लग्न करण्यावर होता आक्षेप
विनयने सांगितले की, दीपक व अनु जवळपास 10 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. दोघांच्या घरच्यांना त्यांच्या नात्याची माहिती होती. पण एकाच गावातील असल्याने मुलीचे कुटुंबीय लग्नाला तयार नव्हते. एकाच गावात मुलीचे लग्न झाले, तर समाजातील लोक टोमणे मारतील, अपमान करतील, अशी भीती त्यांना वाटत होती.
दीपकच्या हत्येनंतर अनुचे कुटुंबीय आम्हाला धमक्या देत आहेत. ते एवढे दबंग आहे की त्यांनी पोलिस ठाण्यातही आम्हाला मारहाण झाली. अनु पदवीधर आहे. दीपकने पोस्ट ग्रॅज्युएशन केले होते. तो गावातील वॉर्डाचा पंच होता. त्याच्या हत्येमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून, गावात तणावाची स्थिती आहे.
दीपकचे आजोबा साजू सिंह यांनी आपण मारेकऱ्यांना अटेली (हरियाणा) येथून दीपकला नेताना पाहिल्याचे सांगितले. तर दुसरीकडे विनयने सांगितले - दीपक लग्नानंतर रेवाडी येथील पीजीमध्ये अनुसोबत राहिला. अनुला तिथे सोडून तो त्याच्या घरी निघाला असता आरोपींनी त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्यांनी पीजीमध्ये् जाऊन अनुला आपल्या ताब्यात घेतले. तेथूनच अनुच्या कुटुंबीयांनी रेवाडीच्या मॉडेल टाऊन पोलिसांना फोन केला. त्यांची बहीण सापडल्याचे सांगितले. पोलिसांनी अनुला पोलिस ठाण्यात आणण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी अनुला मॉडेल टाऊन पोलिस ठाण्यात सोडले.
अपहरणाचा गुन्हा दाखल
जयपूर ग्रामीणच्या भाब्रू पोलिस ठाण्याचे अधिकारी धरम सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणी कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. आता हरियाणा पोलीस व नातेवाईक घटनास्थळी पोहोचलेत. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात येत आहे.
हरियाणाच्या अटेली पोलिस स्टेशनचे अधिकारी अश्वनी कुमार यांनी सांगितले की, दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अनुचा भाऊ संजय याला अटक करण्यात आली आहे. या घटनेत सहभागी असलेल्या अन्य लोकांचा शोध घेतला जात असून, लवकरच त्यांनाही अटक केली जाईल.
बहिणीचा आत्मदहनाचा इशारा
दीपकची बहीण पायल म्हणाली की, या प्रकरणी सर्वांना अटक झाली पाहिजे. पोलिसांनी आरोपींना लवकर अटक केली नाही तर मी दिल्लीच्या जंतरमंतरवर जाऊन आत्महत्या करेल. अटेली पोलिस स्टेशनचे एसएचओ अश्विनी व आयओ कुलदीप यांनी 2 दिवस आमची तक्रारही नोंदवली नाही. पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास नकार दिला. माझ्या वडिलांनाही मारहाण केली.
पोलिसांच्या निष्काळजीपणाची होणार चौकशी
महेंद्रगड (हरियाणा) एसपी विक्रांत भूषण यांनी सांगितले की, खोड गावातील दीपक चौहान नामक तरुणाचे अपहरण व हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तरुणीच्या भावाला अटक करण्यात आली आहे. त्याला 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कुटुंबीयांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला असून, त्याचा तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलिस अधिकारी दोषी आढळले तर त्यांच्यावर विभागीय कारवाई केली जाईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.