आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजस्थानच्या नागौर जिल्ह्यात एक हृदयविदारक घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीच्या मुला-मुलीचे एकाच दिवशी लग्न होणार होते. पण लग्नाच्या दिवशीच व्यक्तीचे रस्ते अपघातात निधन झाले. दुसरीकडे, लग्नघरी लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. त्यामुळे कुटुंबीयांनी आपले दुःख लपवत कशीतरी मुलाची वरात पाठवली आणि मुलीच्याही वरातीचे स्वागत केले. या दोन्ही मुलांचे लग्न झाले. मृत व्यक्तीच्या पत्नीचे यापूर्वीच निधन झाले होते. प्रथम आई व आता वडिलांना गमावण्याची वेळ आल्यामुळे दोन्ही भावा-बहिणीच्या डोळ्यांतील अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते.
यासंबंधीच्या माहितीनुसार, नागौर जिल्ह्यातील डेगाना तालुक्यातील चांदारूण गावात ही घटना घडली. येथील ओमप्रकाश जांगीड यांचा मुलगा व मुलीचे लग्न एकाच दिवश होते. गत मंगळवारी दोघांच्याही मेहंदीचा कार्यक्रम होता.
सायंकाळी 4 च्या सुमारास ओमप्रकाशचे सासुरवाडीचे लोकही भात घेऊन पोहोचले. हा भात घेऊन लोकांना जेऊ घालण्यात आला. त्यानंतर संगीतरजनीचा कार्यक्रम सुरू झाला. यावेळी ओमप्रकाश टेलरकडे टाकलेले कपडे आणण्यासाठी स्कुटीहून डेगानाला गेले.
ट्रॅक्टरने चिरडले, रुग्णालयात मृत्यू
ओमप्रकाश कपडे घेऊन परत आपल्या घराच्या दिशेने निघाले. पण रस्त्यात गावालगतच्याच सरकारी शाळेसमोर सायंकाळी साडे 7 च्या सुमारास भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांच्या स्कुटीला धडक दिली. त्यात ओमप्रकाश गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्याची माहिती पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच डेगानाचे पोलिस ठाणे प्रभारी यांनी ओमप्रकाश यांना उपचारासाठी स्थानिक सरकारी रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मृतदेह शवागारात, मुला-मुलीला कल्पनाही नाही
ओमप्रकाश यांच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला. त्याची माहिती लग्नासाठी उत्सुक असणाऱ्या घरातील अन्य लोकांना देण्यात आली नाही. मुला-मुलीलाही आपल्या वडिलांना काळाने हिरावल्याची खबरबात नव्हती. त्यांना केवळ त्यांचा छोटासा अपघात झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
मुलाची वरात रवाना, मुलीची वरात आली
बुधवारी ओमप्रकाश यांचा मुलगा दीपकची वरात बुटाटी नागौरसाठी रवाना झाली. तर मुलगी ज्योतीची वरात गावात आली. दोघांचेही लग्न झाले. ज्योतीचे लग्न घरी नव्हे तर मंदिरात करण्यात आले. लग्नाच्या विधीनंतर ज्योतीची पाठवणी करण्यात आली. सायंकाळी 5 च्या सुमारास मुलगी ज्योतीला परत घरी आणण्यात आले. यावेळी दीपकचीही वरात परत आली होती. नव्या सूनेचा गृहप्रवेश झाला होता.
ओमप्रकाशचा मृतदेह पाहून रडारड
मुला-मुलीचे लग्न झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी ओमप्रकाश यांचा मृतदेह घरी आणण्यात आला. पार्थिव घरी पोहोचताच एकच रडारड सुरू झाली. दीपक व ज्योतीला आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्यावर विश्वासच बसला नाही. दोन्ही भाऊ-बहिण एकमेकांना धरून रडत होते. त्यानंतर ओमप्रकाश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
2 वर्षांपूर्वी झाला होता आईचा मृत्यू
कुटुंबीयांनी सांगितले की, दीपक व ज्योतीच्या आईचे 2 वर्षांपूर्वी निधन झाले होते. तेव्हापासून ओमप्रकाशच आपल्या मुलांची देखभाल करत होते. पण मुलांच्या लग्नाच्या दिवशीच काळ त्यांच्यावर घाला घालेल असे कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते.
डेगाना ठाणे प्रभारी अर्जुन लाल यांनी सांगितले की, ट्रॅक्टरच्या धडकेने ओमप्रकाश यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मुला-मुलीचे लग्न होते. बुधवारी दोघांचे लग्न झाल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.