आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ram Mandir Trust Sends Invitation To PM Modi, Possibility Of Laying Foundation On August 3 Or 5

अयोध्येत राममंदिर:'राम काज करिबे को आतुर': ट्रस्टने पंतप्रधान मोदींना पाठवले निमंत्रण, 3 किंवा 5 ऑगस्टला पायाभरणीची शक्यता

अयोध्या2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 128 ऐवजी 161 फूट उंची असेल, घुमटही आता 5 असतील
  • जुन्या मॉडेलमध्ये 3 बदलांना मंजुरी, 60% नकाशा बदलणार

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सुमारे ९ महिन्यांनी ऑगस्टमध्ये अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम सुरू होईल. शिलान्यासासाठी रामभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे. ३ किंवा ५ ऑगस्टला मोदी अयोध्येत येण्याची शक्यता आहे. शनिवारी महंत नृत्यगोपाल दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ट्रस्टच्या बैठकीत मंदिराच्या नकाशातील बदलांना मंजुरी देण्यात आली. आता मंदिरात ३ ऐवजी ५ घुमट असतील. उंची १२८ फुटांऐवजी १६१ फूट असेल. या भव्य मंदिरासाठी संत समाज आणि रामभक्तांच्या मागणीवरून बदल करण्यात आले. बैठकीला मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांच्यासह १२ सदस्य उपस्थित होते.

नव्या मॉडेलमध्ये हे बदल

> मंदिर १२८ ऐवजी आता १६१ फूट. > जुन्या मॉडेलमध्ये तीनच घुमट होते. नव्या मॉडेलमध्ये ५ घुमट.  > परिक्रमा मार्गावर श्री गणेश, महामाया, सीता, हनुमानांसह ५ देवतांची मंदिरे असतील.  > जुने मॉडेल ६० टक्के बदलेल. उंचीसह मंदिराची लांबी व रुंदीही वाढेल. खर्चातही प्रारंभीच्या ८० कोटींच्या अंदाजापेक्षा वाढ होईल.

पायाभरणी : पंचरत्न, चांदीचे नाग-नागीण आणि गंगाजल भरलेला तांब्याचा कलश

पायाभरणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराच्या पायात तांब्याचा कलश स्थापित केला जाईल. या कलशात हिरे, मोती, माणिक, सोने आणि पितळ हे पंचरत्न असतील. सोबत चांदीचे नाग-नागीण, हरळी आणि गंगाजल असेल. कलश स्थापनेनंतर नंदा, भद्रा, जया, रिक्ता आणि पूर्णा नामक पाच विटांची पूजा होईल. पंतप्रधानांच्या हस्ते विधिवत पूजा झाल्यावर या भव्य अशा राममंदिराची पायाभरणी केली जाईल आणि बांधकाम सुरू होईल.

बांधकाम पूर्ण होण्यास तीन वर्षे लागतील

टस्टचे महासचिव चंपत राय यांच्यानुसार, बांधकाम सुरू झाल्यानंतर ३ वर्षांत मंदिर पूर्ण होईल. कोरोना संकट सरल्यावर १० कोटी कुटुंबांकडून दान स्वरूपात रक्कम घेतली जाईल. लार्सन अँड टुब्रो मंदिर उभारेल. सध्या मातीच्या नमुन्यांची तपासणी सुरू आहे.

अजेंडा माहिती नसल्याने नृत्यगोपाल दास नाराज

पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव होता. त्यामुळे अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांनी बैठकीस येण्यास नकार दिला. बैठक व अजेंड्याबाबत माहिती नसल्याचे ते म्हणाले. १६ जुलैला अनौपचारिक बैठकीत अजेंडा ठरला होता. दरम्यान, सदस्यांनी माफी मागितल्यावर दास बैठकीला आले.

बातम्या आणखी आहेत...