आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अयाेध्येत राम मंदिर उभारणीदरम्यान यंदाची रामलीला अतिशय विशेष स्वरूपात साजरी हाेणार आहे. शेकडाे वर्षांच्या परंपरेच्या जपणुकीसाठी नवीन प्रयाेग केले जात आहेत. शरयू नदीच्या किनारी लक्ष्मण किला मंदिरात भव्य रामलीलाची तयारी सुरू आहे. चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध कलावंतांच्या बुलंद आवाजात रामायणातील संवादांची रंगीत तालीम सुरू आहे. या नाट्याचे डीडी नॅशनल व साेशल मीडिया वाहिन्यांवर १७ ते २५ आॅक्टाेबरदरम्यान सायंकाळी ७ वाजेपासून १० वाजेपर्यंत थेट प्रक्षेपण हाेणार आहे. या रामलीलेची रेकाॅर्डिंग करून एक आठवड्यानंतर १४ भाषांत यूट्यूबवर त्याला अपलाेड केले जाणार आहे. राम व सीतेची भूमिका साेनू डागर व कविता जाेशी, तर रावणाची भूमिका शाहबाज खान करतील. भाेजपुरी कलाकार व खासदार मनाेज तिवारी अंगद आणि रविकिशन भरतच्या व्यक्तिरेखेत दिसतील. अयाेध्येच्या रामलीलेत प्रभू श्रीरामांची सासुरवाडी जनकपुरी नेपाळहून राजेशाही वस्त्रे तयार हाेऊन आली आहेत. माता सीतेचे अलंकार अयाेध्येतच तयार झाले आहेत. भगवान श्रीरामांचा धनुष्य कुरूक्षेत्राहून व रावणाच्या अनेक पाेशाखांपैकी एक पाेशाख श्रीलंकेत तयार झाला आहे. या रामलीलेच्या तयारीत असलेले स्थानिक आमदार वेदप्रकाश गुप्ता या नवीन प्रयाेगाविषयी उत्साही दिसून आले. ते म्हणाले, देश-विदेशांतील रामभक्त व लीलाप्रेमी या रामलीलेचा आनंद घेऊ शकतील.
मात्र अयाेध्येतील पारंपरिक रामलीला यंदा नसेल. अयाेध्या शाेध संस्थानचे संचालक डाॅ. वाय.पी. सिंह म्हणाले, पारंपरिक रामलीला अनाेखी आहे. कारण त्यात देशभरातील सुमारे ४०० कलाकार जाेडलेले आहेत. रामकथा उद्यानात रामलीला व्हावी असा प्रयत्न हाेता, परंतु गर्दी लक्षात घेऊन परवानगी मिळाली नाही. अयाेध्येच्या रामलीलेवर श्रीराम जन्मभूमीचे प्रमुख पुजारी सत्येंद्र दास म्हणाले, अयाेध्येत रामलीला कधीही बंद झाली नव्हती असे मानले जाते.
परंतु ४०० वर्षांपासून सुरू असलेल्या रामलीलेच्या प्रारंभाचे श्रेय तुलसीदास यांचे समकालीन मेघा भगत यांना जाते. येथील राजद्वार भवनात हाेणारी रामलीला अतिशय लाेकप्रिय हाेती.
ही रामलीला खुल्या वातावरणात सादर केली जाई. त्यात रामचरित मानस व श्रीरामांबद्दलच्या इतर महाकाव्यांतील चाैपाईंचा वापर केला जात असे. संपूर्ण लीलेदरम्यान प्रत्येक दाेहा व चाैपाईं मुखाेद्गत असे. परंतु काही कारणास्तव ही परंपरा खंडित झाली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.