आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझारखंडच्या गुमलात बुधवारी एका संतप्त जमावाने अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोघांना जिवंत जाळले. यातील एकाचा मृत्यू झाला असून, दुसरा गंभीर जखमी आहे. गुमला जिल्हा मुख्यालयापासून अघ्या 15 अंतरावरील बसुआ पंचायतीच्या गावात ही घटना घडली.
सुनील उरांव असे मृत तरुणाचे नाव आहे. तर आशिष उरांव हा जखमी तरुण आहे. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर या भागात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी गावात तळ ठोकून अनेकांची चौकशी केली आहे.
दुचाकीवर घेऊन जाऊन गँगरेप
स्थानिकांच्या माहितीनुसार, अल्पवयीन तरुणी आपल्या आईवडिलांसोबत लोहरदगाच्या भंडराला गेली होती. तेथून परत येताना हे तिघेही बसस्थानकावर उभे होते. त्यावेळी गावातीलच एक तरुण शेजारच्या गावातील आपल्या मित्रासह दुचाकीवर तिथे पोहोचला. त्याने कुटुंबाला ते रस्त्यात का उभे असल्याचे विचारले. मुलीच्या वडिलांनी त्यांना बसची वाट पाहत असल्याचे सांगितले. तसेच घरी संपूर्ण सामान उघड्यावर असल्याचेही त्यांना कळवले.
त्यावर घरी लवकरच पोहोचवण्याची माहिती देत दोन्ही तरुण मुलीला आपल्यासोबत घेऊन गेले. सायंकाळी 7 च्या सुमारास आईवडिल घरी पोहोचले तरी मुलगी घरी पोहोचली नव्हती. त्यानंतर त्यांनी तिचा शोध घेतला असता ती शेजारच्या गावात गंभीर स्थितीत आढळली.
मुलीने पालकांना सांगितली आपबिती
मुलीने आपल्या कुटुंबियांना आपल्यावर दोन्ही तरुणांनी बलात्कार केल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबियांनी दोन्ही तरुणांचा शोध घेतला. ते शेजारच्या गावात सापडले. त्यानंतर गावातील महिला व पुरुषांनी दोन्ही तरुणांना पकडून चौकशीसाठी पीडित तरुणीच्या गावात नेले. तिथे मुलीने त्यांच्यापुढे आपल्यावरील अत्याचाराचा पाढा वाचला.
आरोपींना दुचाकीसह जिवंत जाळले
मुलीने आपल्यावरील अत्याचाराची घटना सांगितल्यानंतर ग्रामस्थांनी दोन्ही तरुणांना बेदम मारहाण केली. त्यानंतर दुचाकीसह त्यांच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोन्ही तरुणांना रुग्णालयात पोहोचवण्यात आले. त्यात एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात तणावाची स्थिती असल्यामुळे मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांकडून घटनेची माहिती देण्यास टाळाटाळ
2 जणांना जिवंत जाळण्यात आल्यानंतर गावात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. प्रकरण संवेदनशील असल्यामुळे पोलिस अधिकारी जास्त माहिती देण्यास नकार देत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.