आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हवाई दल प्रमुख आर. के. एस. भदौरिया यांनी पूर्व लडाखमध्ये चीनच्या सीमेवरील तणावाचा उल्लेख करताना म्हटले आहे की, चीनच्या कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यास भारतीय हवाई दल सज्ज आहे. आम्ही सुरक्षेची स्थिती लक्षात घेऊन आवश्यक त्या सर्व भागांत अत्यंत भक्कम तैनाती केली आहे. हवाई दल दिनाआधी (आठ ऑक्टोबर) सोमवारी माध्यमांशी चर्चा करताना त्यांनी हे वक्तव्य केले.
पूर्व लडाखमधील स्थिती आणि या भागात चीनच्या संभाव्य धोक्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर हवाई दल प्रमुख म्हणाले की, ‘सर्वांनी आश्वस्त असावे, कुठल्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी आम्ही भक्कम तैनाती केली आहे. लडाख हा एक लहान भाग आहे.’ चीनच्या हवाई दलाची शक्ती भारताच्या क्षमतांपेक्षा उत्तम असू शकत नाही. अर्थात विरोधकांना कमजोर समजण्याचा प्रश्नच येत नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
पूर्व लडाखच्या सीमेवर मे महिन्यापासूनच भारत आणि चीन यांच्या लष्करात तणावाची स्थिती आहे. हा तणाव संपवण्यासाठी दोन्ही देशांत कूटनीतिक आणि लष्करी स्तरावर अनेक टप्प्यांत चर्चा झाली आहे. दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांत येत्या १२ ऑक्टोबरला चर्चेची आणखी एक फेरी होणार आहे.
‘अटल टनेल’बाबत ग्लोबल टाइम्सची धमकी
भारताने हिमाचल प्रदेशात सामरिक दृष्टिकोनातून उभारलेल्या ‘अटल टनेल’मुळे चीनचा चांगलाच तिळपापड झाला आहे. ‘ग्लोबल टाइम्स’ या चीनच्या सरकारी वृत्तपत्राने म्हटले आहे की, ‘भारत-चीन यांच्यातील युद्धाच्या वेळी चीनचे लष्कर हा बोगदा उद्ध्वस्त करेल. भारताला अटल टनेलमुळे फार फायदा होणार नाही. शांतता काळात या बोगद्यामुळे भारतीय लष्कराला सामग्रीचा पुरवठा करण्यात खूप मदत होईल, पण युद्धाच्या वेळी त्याचा काहीही फायदा होणार नाही. हा बोगदा निकामी करण्याचे अनेक मार्ग चीनकडे आहेत. परस्परांशी शांततापूर्ण संबंध ठेवण्यातच दोन्ही देशांचे हित आहे. भारताने संयम बाळगावा, चिथावणीला बळी पडू नये.’
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.