आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Record 1.15 Lakh New Patients, Now 14 Out Of 10 Patients Infected, Corona Blast In Delhi Chhattisgarh After Maharashtra

देशात संसर्ग नियंत्रणाबाहेर:विक्रमी 1.15 लाख नवे रुग्ण, आता 10 रुग्णांकडून 14 जणांना संसर्ग, महाराष्ट्रानंतर दिल्ली-छत्तीसगडमध्ये कोरोना स्फोट

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात मंगळवारी १.१५ लाख नवे रुग्ण आढळले. हा १४ महिन्यांच्या कोरोनाकाळातील सर्वात मोठा आकडा आहे. आता संसर्गाचा वेग वाढला आहे. १० रुग्ण रोज सरासरी १४ निरोगी लोकांना बाधित करत आहेत. डिसेंबर २०२० मध्ये हे प्रमाण किमान पातळीवर होते. तेव्हा १० रुग्ण सरासरी ८ जणांना बाधित करत होते.

नॅशनल कोविड टास्क फोर्सचे सदस्य प्रो. के.श्रीनाथ रेड्डी म्हणाले, एक रुग्ण किती जणांना बाधित करू शकतो ते आर फॅक्टरद्वारे (रि-प्रॉडक्शन फॅक्टर) कळते. १ एप्रिल २०२० ला आर फॅक्टर २.२१ होता. तो २७ डिसेंबरला घटून ०.८ झाला. ते १ पेक्षा जास्त असल्यास कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरू लागतो. १ पेक्षा कमी असल्यास रोजचे रुग्ण घटत राहतात. आयसीएमआरनुसार, मास्क वापरणे व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून आर फॅक्टर कमी ठेवता येऊ शकतो.

- देशात मंगळवारी ६३० रुग्णांचा मृत्यू झाला. रविवारी पहिल्यांदा १ लाखापेक्षा जास्त रुग्ण सापडले होते. याच दिवशी ७११ मृत्यू झाले होते.

...आता : प्रत्येक रुग्ण सुमारे दीडपट लोकांना बाधित करतोय
आता R फॅक्टर 1.39 आहे. म्हणजे 10 रुग्णांद्वारे 14 जणांना कोरोना हाेतोय. ते 14 रुग्ण 19 जणांना बाधित करत आहेत. पुढे हा दर 27, 37, 52... असा वाढत जातो.

पूर्वी : संसर्ग घटत होता...
R फॅक्टर 0.8 होता. 10 रुग्ण 8 जण बाधित करत होते. यामुळे फैलाव कमीच होता.

एका दिवसात सर्वाधिक ४३ लाख डोस, आयएमएने पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले - आता १८ वर्षांवरील सर्वांचेच लसीकरण करण्यात यावे
- लसीकरणाच्या ८० व्या दिवशी सर्वाधिक ४३ लाख ९६६ डोस देण्यात आले. हा एका दिवसातील उच्चांक आहे. दुसरीकडे, इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधान मोदींना सल्ला दिला. त्यानुसार १८ वर्षांवरील सर्वांनाच लसीकरणाची परवानगी दिली जावी. सार्वजनिक जागी प्रवेशासाठी लसीकरणाचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात यावे.
- सीरम इन्स्टिट्यूटने म्हटले की, कोविशील्डच्या दोन डोसमध्ये अडीच ते ३ महिन्यांचे अंतर ठेवल्यास प्रभाव ९०% पर्यंत वाढतो. मात्र, कोविड-१९ कार्यगटाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र अरोरांनी त्याला नकार दिला आहे. ते म्हणाले, दीड ते दोन महिन्यांचे अंतर हेच सर्वाधिक प्रभावी असेल.

पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनामुळे रुग्ण वाढले : हर्षवर्धन
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले, पंजाबमध्ये ८०% रुग्ण यूके व्हेरियंटचे आहेत. तेथे शेतकरी आंदोलन, भव्य विवाह सोहळे, स्थानिक पालिका निवडणुकांमुळे रुग्णवाढ झाली असू शकते. दुसरीकडे, आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, महाराष्ट्र, पंजाब व छत्तीसगडमध्ये स्थिती चिंताजनक आहे. मंगळवारी रात्री नवी आकडेवारी आली असता दिल्लीने धक्का दिला. तेथे ५१०० नवे रुग्ण आढळले. ५ दिवसांत दुप्पट रुग्णवाढ झाली.

न्यूयॉर्कमध्ये १६ वर्षांपुढील मुलांचे लसीकरण झाले सुरू
अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये आता १६ ते २९ वयोगटातील तरुणांचेही लसीकरण सुरू झाले आहे. गेल्या आठवड्यात वयाची अट ३० वर्षांपर्यंत आणली होती.

बातम्या आणखी आहेत...