आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • England's World Record Of 498 Runs Against The Netherlands, Latest News And Update

वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडचा जागतिक विक्रम:नेदरलँड्सविरोधात रचला 498 धावांचा डोंगर, बटलरचे अवघ्या 47 चेंडूत शतक

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंडच्या क्रिकेट संघाने एकदिवसीय क्रिकेट सामन्यातील स्वतःचाच जुना विक्रम मोडित काढला आहे. साहेबांनी शुक्रवारी 3 फलंदाजाच्या शतकांच्या बळावर नेदरलँड्सपुढे तब्बल 498 धावांचा डोंगर रचला. विशेष म्हणजे इंग्लंडनेच यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरोधात 19 जून 2018 रोजी 6 बाद 481 धावांचा विश्वविक्रम केला होता.

वनडेच्या इतिहासात तिसऱ्यांदा एका डावात 3 फलंदाजांची शतकी खेळी

इंग्लंडकडून फिल सॉल्ट (122), डेव्हिड मलान (125) व जोस बटलर (162) यांनी शतके झळकावली. वनडे क्रिकेटच्या इतिहासात 3 फलंदाजांनी एका डावात शतक ठोकण्याची ही अवघी तिसरी वेळ आहे. यापूर्वी 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिज व भारताविरुद्ध एका डावात प्रत्येकी 3 शतके झळकावली होती.

बटलरचे 47 चेंडूत शतक

जोस बटलरने अवघ्या 47 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. वनडे क्रिकेटमध्ये 7 फलंदाजांनी 8 वेळा याहून वेगवान शतक केले आहे. खुद्द बटलरनेही यापूर्वी 46 चेंडूंमध्ये शतक ठोकले आहे (Vs पाकिस्तान, 2015). एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आहे. डिव्हिलियर्सने 2015 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध अवघ्या 31 चेंडूत शतक झळकावले होते.

बटलरच्या नावे 14 चौकार, 7 षटकार

बटलरने आपल्या खेळीत 70 चेंडूंचा सामना केला. त्यात 14 चौकार व 7 षटकार खेचले. एकदिवसीय क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनच्या नावावर आहे. मॉर्गनने 2019 मध्ये अफगाणिस्तानविरोधात हा पराक्रम केला होता. आतापर्यंत एकूण 9 वेळा एका डावात फलंदाजाने 14 किंवा त्याहून अधिक षटकार मारले आहेत.

नेदरलँडच्या बोईसेवनने 10 षटकांत 108 धावा दिल्या

इंग्लंडच्या फलंदाजांनी नेदरलँडच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली. नेदरलँडच्या 4 गोलंदाजांनी 80 किंवा त्याहून अधिक धावा दिल्या. फिलिप बोईसेविनने 10 षटकात सर्वाधिक 108 धावा दिल्या. त्याला एकही बळी मिळाला नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये फक्त 3 गोलंदाजांनी याहून अधिक धावा दिल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मायकेल लुईसने 2006 मध्ये जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 10 षटकात 113 धावा दिल्या होत्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा देण्याचा हा विश्वविक्रम आहे.

पाकिस्तानच्या वहाब रियाझने 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध 10 षटकात 110 धावा दिल्या होत्या. अफगाणिस्तानच्या राशिद खाननेही 2019 मध्ये मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्ध 9 षटकांत 110 धावा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...