आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के:यंदाही मुलींनीच मारली बाजी, कोकण विभाग अव्वल, एका क्लिकवर पाहा निकाल

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला. 99.27 टक्के मिळवत कोकण विभागाने निकालात बाजी मारली. विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी 1 वाजेपासून पाहता येणार आहे.

असा पाहा निकाल

या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजेपासून निकाल पाहता येतील. सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित गुण या संकेतस्थळांवर उपलब्ध होतील तसेच या माहितीची प्रत (प्रिंटआऊट) घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

अशी करा गुणपडताळणी

परीक्षेचा निकाल ऑनलाइन स्वरूपात जाहीर झाल्यावर ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती हव्या असतील, त्यांनी 20 जूनपासून मंडळाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार ऑनलाईन अर्ज करायचे आहेत, अशी माहिती मंडळाने दिली आहे.

विभागनिहाय निकाल

  • पुणे: 96.96%
  • नागपूर: 97%
  • औरंगाबाद: 96.33%
  • मुंबई: 96.94%
  • कोल्हापूर: 98.50%
  • अमरावती: 96.81%
  • नाशिक: 95.90%
  • लातूर: 97.27%
  • कोकण: 99.27%

यंदाही मुलींचीच बाजी

दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली. यावर्षी 97.96 टक्के मुली पास झाल्या. तर, 96.06 टक्के मुले पास झाले. म्हणजेच परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 1.09 टक्के अधिक मुली पास झाल्या.

16 लाख 36 हजार परीक्षार्थी

यंदा 2021-22 या वर्षाची दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल या दरम्यान घेण्यात आली होती. राज्यभरातील नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून 16 लाख, 36 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये 8 लाख, 89 हजार विद्यार्थी तर 7 लाख, 49 हजार विद्यार्थिनींचा समावेश होता. परीक्षेसाठी राज्यभरात एकूण 22 हजार 911 माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. 5 हजार 50 मुख्य केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती.

औरंगाबाद विभागाचा निकाल 96.33%

औरंगाबाद विभागाचा निकाल 96.33 टक्के लागला. औरंगाबाद विभागातून 1 लाख 77 हजार 327 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1 लाख 70 हजार 831 पास झाले. 6 हजार 500 विद्यार्थी नापास झाले. नापास विद्यार्थ्यांचे प्रमाण 3.67% आहे. जिल्ह्यात औरंगाबादचा निकाल 97.1% आहे. बीड 97.20% प्रथम स्थानी आहे. जालना 95.44%, परभणी 95.37%, हिंगोली 94.77% असा निकाल लागला.

बातम्या आणखी आहेत...