आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चालला आहे. सरकारी रुग्णालयांत बेडही शिल्लक नाहीत. कोरोनाच्या उपचारासाठी विशिष्ट दिशानिर्देश नाहीत. परिणामी खासगी रुग्णालयांनी कोरोनाची तपासणी व उपचारांच्या नावाखाली अक्षरश: लूटमार सुरू केली आहे. ते मनमानी शुल्क वसूल करत आहेत... या शब्दांत आरोग्य प्रकरणांच्या स्थायी संसदीय समितीने शनिवारी आपली नाराजी व्यक्त केली.
भारतात कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून प्रथमच अधिकृत व्यासपीठावरून व्यवस्थेवर इतक्या कठोर शब्दांत ताशेरे ओढण्यात आले आहेत. या समितीचे अध्यक्ष समाजवादी पार्टीचे नेते रामगोपाल यादव हे आहेत. समितीने आपला हा अहवाल राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे सोपवला आहे. त्यात म्हटले आहे की, दरांचे विशिष्ट सक्षम मॉडेल असते तर अनेक कोरोनाग्रस्तांचे जीव वाचले असते.
समितीने महत्त्वाची शिफारस करत म्हटले की, कोरोना युद्धात प्राण गमावणाऱ्या डॉक्टर्सना शहिदाचा दर्जा द्यावा, त्यांच्या कुटुंबीयांना भरपाईही मिळावी.
आरोग्यावर कमी खर्चामुळे अडचणी :
समितीने म्हटले की, तब्बल १.३ अब्ज लोकसंख्येच्या देशात आरोग्यावर अत्यल्प खर्च होतो. यामुळेही काेरोनाला प्रभावी पद्धतीने तांेंड देण्यात अनेक अडचणी आल्या. समिती पुढे म्हटले की, दाेन वर्षांत आरोग्यावर जीडीपीच्या २.५ टक्क्यांपर्यंत खर्चाचे उद्दिष्ट साध्य केले जावे. हे उद्दिष्ट राष्ट्रीय आरोग्य धोरण २०२४ पर्यंतसाठीचे आहे. मात्र ते वर्ष उजाडेपर्यंत आपण जोखीम घेऊ शकत नाही.
देशातील चित्र : बरे झालेल्या रुग्णसंख्येत वाढ
> देशात कोरोना रुग्णांची संख्या ९१ लाखांजवळ पोहोचली आहे. तथापि, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या (४४,९८०) नव्या रुग्णांच्या तुलनेत (४४,४९८) अधिक आहे.
> देशात कोरोना चाचण्यांच्या संख्येने १३ कोटींचा टप्पा पार केला आहे. चाचण्यांमध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत सर्वाधिक १७.७ कोटींपेक्षा अधिक चाचण्या झाल्या आहेत.
> देशात दोन राज्यांमधील परिस्थिती गंभीर झाली अाहे. महाराष्ट्रात ५७६० आणि राजस्थानमध्ये ३००७ नवे रुग्ण आढळले. रुग्णसंख्या वाढीत ही दिवसभरातील सर्वाधिक संख्या आहे.
> छत्तीसगडमध्ये या महिन्यातील २१ दिवसांत २९७ बळी गेले आहेत. त्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात कमी म्हणजे ११६ मृत्यू झाले होते.
दिल्लीत आणखी कडक निर्बंध
दिल्लीत धार्मिक -सामाजिक सोहळ्यासाठी आता केवळ ५० लोकांचीच मर्यादा घालण्यात आली आहे. यापूर्वी मास्क न लावणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास २ -२ हजार रुपयांचा दंड जाहीर करण्यात आला आहे.
मुंबई-दिल्ली उड्डाणे पुन्हा बंद
महाराष्ट्राचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी सांगितले की, मुंबई-दिल्ली विमान, रेल्वेसेवा पुन्हा बंद केली जाण्याची शक्यता आहे. त्याची अधिसूचना लवकरच जारी होऊ शकते. मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.