आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा 10 गड्यांनी दारुन पराभव झाला. या पराभवाचे शल्य टीम इंडियाला प्रदिर्घ काळ सहन करावे लागेल. सेमीफायनलमध्ये भारताची गोलंदाजीच नव्हे तर क्षेत्ररक्षणही तेवढेच गचाळ होते. एकीकडे गोलंदाजांना इंग्लंडच्या फलंदाजांना लगाम लावणे अवघड जात होते. तर दुसरीकडे भारतीय खेळाडूंची फील्डिंगही सरासरीच होती. याचे उदाहरण इंग्लंडच्या डावातील 9 व्या षटकात पहावयास मिळाले.
9 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप शॉट मारला. चेंडू फाइन लेग बाउंड्रीकडे वेगाने गेला. मोहम्मद शमीने हा चेंडू पकडण्यासाठी धाव घेतली. त्याच्या मदतीला भुवनेश्वरही आला.
अन् चेंडू भुवीच्या डोक्यावरून गेला
त्यातच शमीने चेंडू पकडून विकेटकिपरकडे फेकण्याऐवजी चेंडूचा पाठलाग करणाऱ्या भुवीकडे फेकण्याचा प्रयत्न केला. पण शमी त्याच्या फार जवळ आल्याचे त्याच्या लक्षातच आले नाही. चेंडू भुवनेश्वरच्या डोक्यावरून गेला. हा चेंडू पुन्हा हातात येईपर्यंत इंग्लंडच्या सलामीवीरांनी पळून 4 धावा काढल्या होत्या.
पंड्या हतबल, रोहित संतप्त
शमीची ही चूक पाहून हार्दिक पंड्या त्याच्याकडे शांत चेहऱ्याने पाहत होता. तर रोहित शर्मा हातांनी इशारा करत शमीच्या चुकीवर संताप व्यक्त करत होता. सामन्यातील हे दृश्य पाहिल्यानंतर प्रत्येकाने आपल्या डोक्याला हात लावला. दुसरीकडे, आयसीसीने (ICC) इन्स्टाग्रामवर या घटनेचा व्हिडिओ शेकर करत त्याला 'हे काय होते...' असे कॅप्शन दिले.
भारतीय खेळाडूंवर होता दबाव
शमीच्या या चुकीमुळे मैदानावरील भारतीय खेळांडूंवरील दबाव अधोरेखित झाला. बटलर व हेल्सच्या वादळी खेळीमुळे भारतीय संघ अक्षरशः हतबल झाला होता. यामुळेच त्यांच्याकडू अशा चुका झाल्या. बटलरने 80, तर हेल्सने 86 धावा काढून इंग्लंडला 10 गड्यांनी एकहाती विजय मिळवून दिला. एलेक्स हेल्सला त्याच्या धडाकेबाज खेळीसाठी प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.