आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणीही शनिवारी पायउतार झाले. या बदलामागे पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे कारण सांगितले जात आहे. रविवारी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक हाेत आहे. यात नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव नक्की होऊ शकते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही रविवारी अहमदाबादला येण्याची शक्यता आहे. गेल्या सहा महिन्यांत भाजपने तीन राज्यांत चार मुख्यमंत्री बदलले आहेत.
राजीनाम्याआधी रूपाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सरदारधाम भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमात व्हीसीद्वारे उपस्थित होते. यानंतर त्यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे राजीनामा सोपवला. या वेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री नितीन पटेल व केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया होते. पंतप्रधानांचे आभार मानत रूपाणी म्हणाले, गुजरातच्या विकासाचा प्रवास पंतप्रधानांच्या नेतृत्वात नव्या उत्साहाने नव्या नेतृत्वासोबत पुढे सुरू राहावा म्हणून राजीनामा दिला आहे.
१५ दिवसांपूर्वीच लिहिली गेली हाेती पटकथा
दोन वर्षांपासून गुजरातच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेतील शब्द होता ‘रूपाणी जाणार’. स्वत: रूपाणीही वारंवार म्हणत होते की, ‘मी तर अर्ध्या पिचवर फलंदाजीला आलो आहे. मी कसोटी किंवा एकदिवसीय नव्हे तर टी-20 खेळण्यास आलो आहे.’ त्यामुळे मुख्यमंत्री रूपाणी यांचा राजीनामा चकित करणारा नाही. मात्र, तो काही प्रश्न जरूर निर्माण करतो. ते म्हणजे निवडणुकीपूर्वी एक वर्ष आधी नेतृत्व बदलण्याची ही भाजपची कृती आहे की रूपाणी यांच्या नेतृत्वात २०२२ मध्ये निवडणूक जिंकली जाऊ शकत नाही, असा भाजपला विश्वास वाटत आहे? रूपाणींच्या राजीनाम्याची पटकथा १५ दिवस आधीच लिहिली गेली होती. रूपाणी यांनी मुख्यमंत्री म्हणून मागील महिन्यातच ५ वर्षे पूर्ण केली. यानिमित्त जनसंवेदना यात्रा काढली. यात केंद्रीय मंत्र्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात पाठवले गेले. या काळात केंद्रीय मंत्र्यांना जनतेच्या संतापाची जाणीव झाली. सत्ताविरोधी लाटेचा अहवाल पक्षनेत्यांपर्यंत पोहोचला. त्यानंतर प्रमुख नेत्यांनी अंतर्गत सर्वेक्षण केले. यात ‘मिशन १५०’ तर दूरच भाजपला २०१७ मधील आकड्यापर्यंत (९९) पोहोचणेही कठीण होईल, असे दिसले. मागील निवडणूक भाजपने रूपाणींच्या नेतृत्वात लढली होती. तेव्हा पटेल आंदोलन थंडावले होते. ना कोरोना होता ना कोणता मोठा मुद्दा. भाजप जेमतेम ९९ जागांपर्यंत पोहोचला. या वेळी कोरोनामुळे परिस्थिती विपरीत आहे. सत्ता-संघटनेत ओढाताण दिसत आहे. हायकोर्टाने अनेक वेळा सरकारी धोरण निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले. सरकारला २३ निर्णय बदलावे लागलत.
पुढे कोण : पटेल आणि मांडवियांसह अनेक नावे चर्चेत
नवा सीएम कोण : केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया, पुरुषोत्तम रूपाला, उपमुख्यमंत्री नितीन पटेल, राज्याचे मंत्री आर. सी. फाल्दू, प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील, उपाध्यक्ष गोरधन झडफिया, लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांची नावे चर्चेत आहेत.
चौथे सीएम : मार्चमध्ये त्रिवेंद्र रावतांना हटवून तीरथसिंह रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री. जुलैत पुष्करसिंह धामी मुख्यमंत्री. कर्नाटकातही येदियुरप्पा यांना हटवून बोम्मईंना खुर्ची. आसामात निवडणुकीनंतर सोनोवाल यांच्याऐवजी सरमा मुख्यमंत्री.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.