आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहने महागणार?:रशिया-युक्रेन युद्धामुळे उत्पादन खर्च वाढला; वाहन निर्मिती कंपन्यांना धातू व इतर कच्चा मालही मिळेना

व्यापार प्रतिनिधी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही महिन्यांपासून सेमी कंडक्टर चिप आणि इतर घटकांच्या टंचाईचा सामना करणाऱ्या ऑटो इंडस्ट्रीसमोर आता नवे संकट उभे राहिले आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे ऑटो इंडस्ट्रीसाठी महत्त्वाचे असलेले धातू आणि इतर कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे कंपन्यांचा खर्च वाढला आहे. दरम्यान, पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढण्याच्या शक्यतेनेही ऑटो कंपन्यांची झोप उडाली आहे.

इंडस्ट्रीशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे की, ऑटो कंपन्यांचा जवळपास ७५ ते ८५ टक्के महसूल कच्च्या मालावर खर्च होतो. रशिया आणि पूर्व युरोपीयन देश हे ऑटो इंडस्ट्रीजमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही प्रमुख धातूंचे मोठे पुरवठादार आहेत. युद्धामुळे या धातूंचे भाव गगनाला भिडले आहेत. रेडियमच्या किमती मागील तिमाहीच्या सरासरीच्या तुलनेत सध्याच्या तिमाहीत ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. वाहनांत १०-१५ टक्के वाटा असलेले अॅल्युमिनियम या तिमाहीत २०% पेक्षा जास्त महागले. तसेच स्टील, प्लास्टिक व इतर कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत.

कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने कंपन्यांचा नफा २७-३२ टक्क्यांनी कमी होऊन ८-१० टक्क्यांवर आला आहे. अशा वेळी किमती वाढवण्याशिवाय कंपन्यांना पर्याय राहिलेला नाही. मात्र, असे केल्यास मागणीत घट येण्याची भीतीदेखील आहे. टाटा मोटर्सचे प्रवक्ते म्हणाले, बाह्य अडथळ्यांमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ऑटो उद्योगावर सातत्याने परिणाम होत आहे. तथापि, वाढलेल्या खर्चाचा भार ग्राहकांवर कमीत कमी पडावा, हा आमचा प्रयत्न राहील. मात्र, भविष्यात नाइलाजाने किमती वाढवाव्या लागतील.

देशातील सर्वात मोठे मॅन्युफॅक्चरिंग हब चाकणच्या फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल सांगतात, चिप टंचाईने आधीच उत्पादन कमी झाले. आता कच्चा माल २०-२५ टक्के महाग झाल्याने खर्चही वाढत आहे. अशात इंधन, वाहनांच्या किमती वाढल्यास ग्राहकीवर परिणाम होईल.

किमती वाढल्याने वाहनांच्या मागणीवर परिणाम होईल
मार्च महिन्यामध्ये वार्षिक आधारे वाहनांच्या विक्रीत १०-१५ टक्क्यांची घट झाली आहे. मात्र, एप्रिलमध्ये जास्त गंभीर परिणाम दिसतील. एप्रिलमध्ये वाहनांच्या किमतीत २-५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. किमती वाढल्याने व इंधन महागल्याने ग्राहकीवर त्याचा विपरीत परिणाम होईल, असे फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...