आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Russia's Foreign Minister Says Russia Is Ready To Give India What It Wants, Latest News And Update

रशियन परराष्ट्र मंत्री भारतात:रशिया-युक्रेन युद्धात मध्यस्थी करु शकतो भारत, रशियन परराष्ट्र मंत्री म्हणाले -भारत एक महत्वपूर्ण देश, पुतीन यांनी मानले भारताचे आभार; मोदींनाही भेटले

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत दौऱ्यावर आलेल्या रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी तथा आपले भारतीय समकक्ष एस जयशंकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी रशिया-युक्रेन युद्धातील भारताच्या संभाव्य मध्यस्थीचे स्पष्ट संकेत दिले. 'भारत एक महत्वपूर्ण देश आहे. तो रशिया-युक्रेन वादात मध्यस्थी करु शकतो,' असे ते म्हणालेत. राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानल्याचेही ते यावेळी म्हणाले.

तत्पूर्वी, भारत दौऱ्यावर आलेल्या अमेरिकेच्या उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी रशियावरील निर्बंधांची अवहेलना करणाऱ्या देशांना परिणाम भोगण्याचा इशारा दिला होता.

सर्गेई लाव्हरोव्ह यांनी युक्रेन प्रश्नी भारताने घेतलेल्या भूमिकेचे कौतुक करत भारत कुणाच्याही दबावात न येता मार्गक्रमण करत असल्याचे स्पष्ट केले. 'माझ्या मते भारतीय परराष्ट्र धोरणाचे प्रमुख वैशिष्ट्य कुणाच्याही दबावात न येता स्वतःच्या राष्ट्रहितांवर लक्ष्य केंद्रीत करणे आहे. ही गोष्ट आम्हाला मोठा देश, चांगला व प्रामाणिक मित्र तथा भागीदार बनवते', असे ते म्हणाले.

रशियन परराष्ट्र मंत्री पुढे म्हणाले -'भारताची आमच्याकडून जी काही सामग्री खरेदी करण्याची इच्छा आहे, त्याचा आम्ही पुरवठा करु. रशिया-भारतात खूप चांगले संबंध आहेत.'

युक्रेनमध्ये युद्ध नव्हे तर एक विशेष मोहीम

युक्रेनसंबंधी विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना लाव्हरोव्ह यांनी युक्रेनमध्ये युद्ध नव्हे तर एक विशेष मोहीम सुरू असल्याचे स्पष्ट केले. 'तुम्ही त्याला युद्ध म्हणू शकत नाही. ती एक विशेष मोहीम आहे. त्यात युक्रेनच्या लष्कराच्या पायाभूत सोईसुविधांना लक्ष्य केले जात आहे. युक्रेनचे सरकार भविष्यात रशियासाठी धोकादायक ठरणार नाही याची काळजी घेणे एवढेच आमचे उद्दीष्ट आहे,' असे ते म्हणाले.

कोणत्याही दबावाचा आमच्या भागीदारीवर परिणाम होणार नाही

अमेरिकेच्या भारतावरील दबावाचा भारत-रशिया संबंधांव परिणाम होईल काय? असा थेट प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला असता लाव्हरोव्ह यांनी असे काहीच होणार नसल्याचे स्पष्ट केले. 'कोणत्याही दबावाचा आमच्या भागीदारीवर परिणाम होणार नाही. ते (अमेरिका) दुसऱ्या देशांवर स्वतःचे राजकारण थोपण्याचा प्रयत्न करत आहेत,' असे ते म्हणाले.

युक्रेन युद्धात भारत भूमिका बजावू शकतो

'भारत एक महत्वपूर्ण देश आहे. त्यामुळे भारताने आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी एखादी चांगली सूचना केली तर ती आम्हाला मान्य असेल,' असेही लाव्हरोव्ह यावेळी रशिया-युक्रेनमधील भारताच्या संभाव्य मध्यस्थीवर भाष्य करताना म्हणाले.

लाव्हरोव्ह यांचा तिसरा परदेश दौरा

रशियाने गत 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला केल्यानंतर लाव्हरोव्ह यांचा हा तिसरा परदेश दौरा आहे. यापूर्वी मार्चच्या सुरुवातीला आपल्या युक्रेनियन समकक्षांशी संवाद साधण्यासाटी तुर्की व चीनच्या दौऱ्यावर गेले होते.

बातम्या आणखी आहेत...