आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजैविक इंधन वापराला प्रोत्साहन देण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. देशातील ११ राज्ये व केंद्र शासित प्रदेशांतील निवडक पेट्रोल पंपांवर सोमवारपासून २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोलची (ई-२०) किरकोळ विक्री सुरू झाली. पहिल्या टप्प्यात १५ शहरांत ही सुविधा उपलब्ध झाली आहे. दोन वर्षांत देशभरात ई-२० पेट्रोलच्या विक्रीला सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी भारत ऊर्जा सप्ताह-२०२३ मध्ये म्हणाले, २० टक्के इथेनॉल विक्रीला दोन महिन्यांनंतर सुरुवात होणार होती. परंतु नियोजित उद्दिष्टाच्या आधीच ती सुरू झाली आहे. ते म्हणाले, २०१४ मध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण १.५ टक्क्यांवरून १० टक्के केले होते. पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळल्याने ५३,८९४ कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत होते. इथेनॉलच्या वाढत्या वापरामुळे शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ मिळतो. पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी म्हणाले, १५ शहरांत ८४ पेट्रोल पंपांवर २० टक्के इथेनॉल पेट्रोल विक्रीस सुरुवात झाली.पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या २० टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट २०३० मध्ये ठेवले होते. हे उद्दिष्टही आता कमी करून २०२५ असे केले. आता ई-२० मुळे दरवर्षी सुमारे ३० हजार कोटी रुपयांची बचत होण्याची शक्यता आहे.
दिव्य मराठी एक्स्पर्ट - नरेंद्र तनेजा, एनर्जी एक्स्पर्ट
ई-२० पेट्रोलवर गाड्या धावतील, इंजिन अनुकूल असल्यास चांगले मायलेजही मिळेल
ई-२० पेट्रोल कोणकोणत्या वाहनांत वापरले जाईल? देशात बहुतांश वाहनांचे इंजिन बीएस-४ ते बीएस-६ पर्यंतचे आहेत. त्यानुसार २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोलचा वापर सर्व वाहनांमधून करता येईल. बीएस म्हणजे भारत स्टेजच्या इंजिनात ई-२० चा वापर करता येईल. वाहन निर्मात्या कंपन्यांना आधीच ई-२० इंजिन निर्मितीचे आदेश दिले गेले होते. एक एप्रिल २०२३ नंतर सर्व वाहनांसाठी ई-२० इंधन अनुकूल होईल, असे दिसते.
जुन्या वाहनांतही ई-२० पेट्रोल टाकता येऊ शकते?
इंजिन फ्लेेक्स फ्युएल कॉम्पिटेबल (अनुकूल) असल्यास ई-२० तून चांगले मायलेज मिळेल. पॉवरही जास्त असेल. जुन्या इंजिनाच्या वाहनांत ई-२० टाकल्यास कमी मायलेज-कमी पॉवरची शक्यता असेल. जुन्या गाड्यांच्या इंजिनात थोडा बदल करता येऊ शकतो. परंतु हा बदल केवळ इंजिनाच्या कोरेशनला (घर्षण) कमी करण्यासाठी करता येईल. त्याव्यतिरिक्त हॉस पाइपसारखे काही बदल शक्य आहेत.
देशात पहिल्या टप्प्यात ई-२० पेट्रोल कोठे मिळेल?
दिल्ली, बिहार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब, दमण-दीव, दादरा आणि नगर हवेली येथे ई-२० पेट्रोल मिळेल. इथेनॉलचे उत्पादन मूळ रूपात उसाद्वारे केले जाते. अनेक राज्यांत उसाचे मुबलक उत्पादन होते. आता शेतकऱ्यांना उत्पादनाच्या विक्रीसाठी इथेनॉल कंपन्यांचादेखील पर्याय असेल.
ई-२० आल्याने देशात
पेट्रोलचे दर कमी होतील?
ई-२० चे तीन उद्देश आहेत. पहिला- आयात कमी करणे, दुसरे प्रदूषण रोखणे आणि तिसरे ग्रामीण अर्थव्यवस्थेला सावरणे. सध्या पेट्रोलवर सुमारे ५२ टक्के केंद्र व राज्यांचे कर आहेत. इथेनॉलवर सध्या कर कमी आहे. त्यामुळे देशात पेट्रोलच्या दरात घट होण्याची शक्यता कमी दिसते. ई-२० मुळे पेट्रोलचे दर एकदम कोसळतील, असे मानणे चुकीचे ठरेल, असे मला वाटते.
इतर देशांत पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंडिंगची स्थिती काय?
ब्राझील सर्वाधिक ८० टक्क्यांपर्यंत इथेनॉलचे मिश्रण करते. अमेरिकेतही २० ते ३० टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिसळले जाते. या देशांना पेट्रो प्रॉडक्ट्सची आयात करावी लागत नाही. भारताला पेट्रोलियम गरजा भागवण्यासाठी ८५ टक्क्यांपर्यंत आयात करावी लागते. देशात आता पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यास सुरुवात झाली. आता इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे इंजिन पॉवर ५ टक्क्यांनी घटू शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.