आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने संजय राऊत यांच्या मोबाइलवर संदेश पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
संजय राऊत यांच्या मोबाईलवर आलेला धमकीचा संदेश
काही जण ताब्यात
संजय राऊत यांना काल रात्री 9 वाजेच्या सुमारास ही धमकी आल्याची माहिती आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी पोलिसांना माहिती दिली आहे. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याचीही माहिती आहे. तसेच, मुंबई पोलिस आयुक्तांकडेही यासंदर्भात संजय राऊत यांनी तक्रार दिली आहे.
संजय राऊतांना हिंदूविरोधी म्हटले
संजय राऊत यांच्या मोबाईलवर पाठवलेल्या मॅसेजमध्ये राऊतांची एके 47 ने हत्या करण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीच्या मॅसेजमध्ये संजय राऊत यांना हिंदूविरोधी म्हटले आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्याप्रमाणेच दिल्लीत संजय राऊतांची हत्या करू. लॉरेन्सकडून हा संदेश पाठवण्यात आला आहे, असे धमकीत म्हटले आहे.
'सलमान आणि तुम्ही फिक्स'
विशेष म्हणजे याच लॉरेन्स बिश्नोई गँगने अभिनेता सलमान खान यालाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबतचे पत्र सलमानचे वडील सलीम खान यांच्या अंगरक्षकाला प्राप्त झाले आहे. या पत्रात सलमानचा सिद्धु मुसेवाला करु अशी धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी सलमानच्या तक्रारीनुसार आज वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बिश्नोई समाज काळवीटाला पवित्र मानतो, त्यामुळे त्याची शिकार केल्याचा आरोप असलेल्या सलमान खानला मारण्याची धमकी लॉरेन्सने दिली आहे. एका वृत्तवाहिनाली दिलेल्या जाहीर मुलाखतीमध्येही त्याने या धमकीचा पुनरुच्चार करत सलमान खानने माफी न मागितल्यास आपण त्याला धडा शिकवू, असा इशारा दिला होता.
गृहमंत्री फडणवीस आमची चेष्ठा करतात
दरम्यान, आपल्याला आलेल्या धमकीबाबत संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली तसेच शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले. सजंय राऊत म्हणाले, ज्या गँगने सलमान खानला धमकी दिली, त्याच गँगच्या माध्यमातून मला जीवे मारण्याची धमकी दिली गेली. यासंदर्भात काही जणांना पकडले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सरकारवर आम्हाला विश्वास नाही. त्यामुळे मी केवळ पोलिसांना धमकीबाबत माहिती दिली आहे. आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धमकीबाबत तक्रार करतो, तेव्हा ते आमची चेष्ठा करतात. म्हणतात की, हा विरोधकांचा स्टंट आहे. सरकार आमच्या धमकीला गांभीर्याने घेत नाही.
सुरक्षा केवळ गद्दारांना
संजय राऊत म्हणाले की, याआधी ठाण्यातील एका गुंड टोळीच्या म्होरक्यानेही मला धमकी दिली. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एका नातेवाईकही सहभागी असल्याचा आरोप मी केला होता. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा राजकीय स्टंट असल्याचे म्हटले होते. मला आता लॉरेन्स बिश्नोई गँगने दिलेल्या धमकीचा राजकीय इश्यू करायचा नाही. एकीकडे विरोधकांना आलेल्या धमक्या सरकार गांभीर्याने घेत नाही. दुसरीकडे, सर्व सुरक्षा व पोलिस हे गद्दार गट, त्यांचे खासदार, आमदार, पदाधिकारी यांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था ढेपाळली आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.
संशयित मुळचा जालन्यातील
दरम्यान, पत्रकार परिषद घेत मुंबई पोलिसांनी या सर्व प्रकरणाबाबत माहिती दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, संजय राऊत यांना धमका देणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. राहुल तळेकर (वय 23), असे संशयिताचे नाव आहे. तो मुळचा जालन्याचा असून त्याचे पुण्यात हॉटेल आहे. संशयिताची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. आरोपीने संजय राऊतांना फोन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संपर्क होऊ न शकल्याने त्याने दारूच्या नशेत राऊतांना धमकी दिली.
गँगस्टर लॉरेन्सशी संबंध नाही
मुंबई पोलिसांनी सांगितले की, ताब्यात घेतलेल्या संशयिताचे लॉरेन्स बिश्नोई गँगसोबत कोणतेही संबंध नाही. त्याने केवळ युट्युबवर गँगस्टर लॉरेन्सचे काही व्हिडिओ पाहिले होते. ते व्हिडिओ पाहून त्याने मॅसेजमध्ये गँगस्टर लॉरेन्सचे नाव घेतले. पोलिस आणखीक सविस्तर चौकशी करत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.