आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राऊतांच्या अटकेचे संसदेत तीव्र पडसाद:दोन्ही सभागृहांत गदारोळ; राऊतांनी धमक्यांच्या राजकारणाला भीक घातली नाही -काँग्रेस

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अटकेचे सोमवारी संसदेत तीव्र पडसाद उमटले. महागाई, जीएसटी, वाढती बेरोजगारी, कृषी समस्या आदी मुद्यांवरुन सरकारला धारेवर धरणाऱ्या विरोधी पक्षांनी राऊतांच्या अटकेवरुन संसदेत गदारोळ केला. यामुळे कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच लोकसभेचे कामकाज दुपारी 12 व त्यानंतर 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.

विरोधकांनी नरेंद्र मोदी सरकारवर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रविवारी मध्यरात्री शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक केली होती. त्यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रात सर्वत्र शिवसैनिक रस्त्यावर उतरलेत. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या सदस्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत सरकारविरोधात नारेबाजी केली. त्यांतर काँग्रेससह इतर पक्षांची साथ मिळाली. राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी या गदारोळाप्रकरणी सेना खासदार अनिल देसाई यांना समज दिली.

दुसरीकडे, काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेत राऊतांच्या अटकेचा मुद्दा उपस्थित केला. 'संजय राऊत यांनी भाजपच्या घाबरवण्याच्या व धमक्यांच्या राजकारणाला भीक घातली नाही. ते दृढ विश्वास व धाडसी व्यक्ती आहेत. त्यामुळे काँग्रेस त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे,' असे ते म्हणाले.

उल्लेखनीय बाब म्हणजे विरोधकांनी चालू अधिवेशनात महागाई, जीएसटी, वाढती बेरोजगारी, कृषी समस्या आदी मुद्यांवरुन सरकारची कोंडी केली आहे. यामुळे या अधिवेशनात आतापर्यंत कोणतेही विधायक कामकाज झाले नाही. त्यातच राऊतांच्या अटकेमुळे विरोधकांच्या हाती आयते कोलित सापडल्यामुळे अधिवेशनाचा उर्वरित कालावधीही वाया जाण्याची भीती आहे.

पीयूष गोयल म्हणाले -आश्वासनानंतरही विरोधकांचा गदारोळ

सभागृह नेते पीयूष गोयल म्हणाले की, ' विरोधकांनी महागाईवर चर्चा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार लोकसभेत यावर चर्चा होणार आहे. उद्या राज्यसभेत यावर संवाद होईल. विरोधकांनी या दोन्ही चर्चांत सहभागी होण्याचे आश्वासन दिले होते. पण, आता ते स्वतःच गदारोळ करून या चर्चेत अडथळा निर्माण करत आहेत,' असे गोयल म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...