आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काही करून दाखवण्याची इच्छा असल्यास मार्गावरील संकटेही दूर होऊ शकतात. राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील तीन बहिणींनी ही उक्ती सत्यात उतरवली. सरिता तिलोतिया, किरण तिलोतिया व अनिता तिलोतिया या तिघीही शेतकऱ्याच्या कन्या. तिघींनीही एकाच दिवशी पीएचडीची पदवी संपादन केली. जगदीश प्रसाद झाबरमल टिबरेवाला विद्यापीठातून डॉक्टरेटची उपाधी मिळाली आहे.तिन्ही बहिणींनी वेगवेगळ्या विषयात डॉक्टरेट उपाधी मिळवली आहे. सरिता यांनी भूगोल, किरण यांनी रसायनशास्त्र व अनिता यांनी शिक्षण विषयात ही उपाधी घेतली. एकाच वेळी तीन बहिणी डॉक्टरेटने सन्मानित होण्याची ही देशातील दुसरी घटना आहे.
याआधी मध्य प्रदेशातील तीन बहिणींनी एकाच वेळी पीएचडीचा गौरव मिळवला होता. या यशाबद्दल सरिता म्हणाल्या, आमच्या शिक्षणात सर्वाधिक योगदान वडील मंगलचंद तिलोतिया यांचे आहे. त्यांनी आम्हाला नेहमी शिक्षण तसेच जीवनात लौकिक मिळवण्यासाठी प्रेरित केले. आमचा जन्म भलेही ग्रामीण भागात झाला, शिक्षण आम्ही जयपूर, झुंझुनूमध्ये घेतले. जीवनात कधीही पूर्णविराम द्यायचा नसतो. नेहमी पुढे जात राहा. सरिता ४१ वर्षांच्या आहेत. किरण ३७, तर अनिता ३५ वर्षांच्या आहेत.
विवाहानंतरही बहिणींनी शिक्षण सुरूच ठेवले
तिन्ही बहिणी विवाहित आहेत. सरिताचे पती महेश झाझडिया झुंझुनू, किरणचे पती अशोक सुरा जयपूर, तर अनिता यांचे पती डॉ. अमित झाझडिया झुंझुनूतील भडौदा येथे राहतात. सरिता यांनी भूगोलात कृषी विपणनावर संशोधन केले आहे. किरण यांनी रसायनशास्त्रात जल प्रदूषणाचा अभ्यास केला. अनिता यांनी शिक्षण क्षेत्रातील महिला सशक्तीकरणात पीएचडी केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.