आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Seizure Of Thousands Of Properties Of Kashmiri Pandits, Also A Reason For Attacks On Non Muslims

श्रीनगर:काश्मिरी पंडितांच्या हजार मालमत्तांवरचे कब्जे काढले, हेही बिगर मुस्लिमांवर हल्ल्यांचे कारण

श्रीनगर / हारुण रशीद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काश्मीरमधील अतिरेकी बिथरल्याने बिगर मुस्लिमांवरील हल्ल्यांत अचानक वाढ झाली आहे. ते बिथरण्यामागे काश्मिरी पंडितांच्या संपत्तीवरून कब्जा हटवण्याच्या मोहिमेचेही कारण आहे. दहशतवादामुळे खोऱ्यातून पलायन करणाऱ्या पंडितांच्या मालमत्तांवर अवैध ताबा सोडवण्याची मोहीम अलीकडेच सुरू झाली होती. १९९० नंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा घर सोडण्यास भाग पडलेल्या पंडितांच्या जमिनी-घरावरील कब्जा काढला जात आहे. प्रशासनाने सप्टेंबरमध्ये पोर्टल सुरू केले होते. यावर देशात कुठेही वास्तव्य करणारे काश्मिरी पंडित आपल्या संपत्तीवरील कब्जाची तक्रार नोंदवत आहेत. तक्रार मिळाल्यावर प्रशासन संबंधित कब्जा सोडवण्याची कारवाई सुरू करते. प्रशासनाकडे ताब्याच्या हजारो तक्रारी आल्या आहेत. काही तक्रारी अशाही आहेत, ज्यात फसवणुकीने जमीन हडप केल्याचे सांगितले जाते. जम्मू-काश्मीरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, प्रत्येक जिल्ह्यात कब्जे आहेत. सर्वाधिक एक हजार तक्रारी अनंतनागमध्ये आहेत. एक प्रकरणात ५ एकरहून जास्त जमीन बळकावण्यात आली होती. आता ही जमीन सोडवली आहे. बहुतांश प्रकरणांत कब्जा करणारे शेजारीच आहेत. काही प्रकरणांत भूमाफिया सक्रिय आहेत. काश्मिरी पंडित संघर्ष समितीचे पदाधिकारी संदीप म्हणाले, केवळ पंडित घर सोडून गेलेले नाहीत. बरेच शीख आणि मुस्लिमांना पलायन करणे भाग पडले. त्यांची मालमत्ताही परत मिळाली पाहिजे.

अनेक प्रकरणे अशीही, जिथे घरावर कुणाचाच ताबा नाही
श्रीनगरमध्ये ६६० तक्रारी : श्रीनगरचे डीसी मोहंमद एजाज असद म्हणाले, जिल्ह्यात एकूण ६६० तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी ३९० सोडवल्या आहेत. १६ प्रकरणांमध्ये महसुली दस्तऐवजात फेरफार करून अन्य कुणाच्या नावावर जमिनी केल्याचे दिसले.

केस-1 : तक्रारीनंतर जमीन सोडवली, मूळ मालकाला मिळणे शिल्लक
अनंतनागमध्ये एम.एल. धर यांच्या १ एकर जमिनीवर गुलाम रसूल यांनी कब्जा केला होता. धर यांनी पोर्टलवर तक्रार दिली. प्रशासनाने एका आठवड्यात जमीन सोडवली. याच पद्धतीने फूला रैना यांची ३ कॅनॉल जमीन शेजारी मोहंमद इस्माईल पाल यांंनी हडपली होती. तीही सोडवली. आता तिचा ताबा मूळ मालकांकडे द्यायचा आहे.

केस-2 : शेतीसाठी जमीन दिली होती, मात्र उत्पन्नाचा वाटा मिळाला नाही
रोशनलाल कौल यांच्या ६.५ कॅनॉल जमिनीवर मोहंमद शब्बीर चोपनने कब्जा केला होता. अनेक प्रकरणे अशीही आली, जिथे पलायन करणाऱ्या पंडितांनी ओळखीच्या लोकांकडे शेती कसण्यासाठी दिली होती. उत्पन्नाचा एक वाटा त्यांनाही मिळत राहील, असे ठरले होते. मात्र, तसे झाले नाही. अशा प्रकरणांत आता थकीत रक्कमही वसूल होईल.

केस-3 : ५ एकर शेतीच्या कब्जात सफरचंद-नाशपातीची बाग लावली
कुलगामचे एक पंडित म्हणाले- मला वडिलोपार्जित ५ एकर जमीन आहे. तिच्यावर एका कुटुंबाने कब्जा केला आहे. सफरचंद-नाशपातीची बाग लावली. मी पोलिस, अधिकाऱ्यांकडे कब्जा सोडण्यासाठी संपर्क साधला. मात्र, फायदा झाला नाही. आम्ही १० वर्षांपासून केस लढतोय. पोर्टल सुरू झाल्याने आता आशा उंचावल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...