आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहु महाराजांना अभिवादन:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले - शाहु महाराज ज्या वृत्तींविरोधात लढले त्या अजूनही जिवंत

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजर्षी छत्रपती शाहु महाराज हे कोण्या व्यक्तीविरोधात नव्हे तर ब्राह्मणी वृत्तीविरोधात होते. अशा वृत्ती अजूनही जिवंत आहे. आपल्याला त्यांच्याशी लढा द्यायचा आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. शाहु महाराज यांच्या 100 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी आज छत्रपती शाहुंना अभिवादन केले व त्यांच्या विचारांना उजाळा दिला.

शाहु महाराज आणखी काही काळ जगले असते तर...
शाहु महाराजांनी दिनदुबळ्यांना एक आत्मविश्वास दिला. त्यांच्यामधील न्यूनगंड घालवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. त्या काळातही त्यांनी कोल्हापूरमध्ये अनेक भरीव कामे केली. मात्र, त्यालाही काही जणांनी प्रचंड विरोध केला. अशा कुचाळक्या करणाऱ्या वृत्ती महाराष्ट्रात अजूनही आहेत. मात्र, आपल्याला त्यांना मागे सारून राज्याला विकासाच्या मार्गावर न्यायचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, शाहू महाराज केवळ 48 वर्षे जगले तरीदेखील अनेक भरीव कामे केली. ते आणखी काही काळ जगले असते तर कदाचित या देशाचे, राज्याचे चित्र वेगळेच दिसले असते, अशी भावनाही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

शाहु महाराज केवळ बसणारे राजे नव्हते!
शाहु महाराज हे केवळ गादीवर बसून राहणारे राजे नव्हते. तर दिनदुबळ्यांसाठी ते स्वत: मैदानात उतरत असत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. अस्पृश्य वर्गाला माणसासारखे वागवले नाही तर राजकारण काय कामाचे, असे ते विचारत. प्रत्येकाला मनुष्यत्वाचे अधिकार दिल्याशिवाय देशसेवा होणार नाही, हा त्यांचा विचार होता. राजकारणात हा विचार अजूनही तेवढाच महत्त्वाचा असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

प्रबोधनकार ठाकरे- शाहु महाराजांच्या आठवणींना उजाळा
उद्धव ठाकरे यांनी यावेळी आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे व शाहु महाराजांच्या आठवणींनाही उजाळा दिला. प्रबोधनकार ठाकरे जेव्हा पहिल्यांदा शाहु महाराजांना भेटले तेव्हा कोणते पुस्तक लिहिताय असे महाराजांनी आजोबांना विचारले होते. आजोबांनी पुस्तकाचे नाव सांगितल्यानंतर शाहु महाराजांनी संदर्भ ग्रंथदेखील सांगितले होते. तसेच, भिक्षूकशाहीप्रमाणेच राजेशाहीदेखील माणुसकीला मारक असल्याचे सांगितले जाते. स्वत: राजा असूनही असे विचार मांडणाराच खरा लोकोत्तर राजा होतो. त्यामुळेच आजही राज्यातील नागरिकांना हा माणूस आपला वाटतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शाहु महाराजांना अपेक्षित राज्य निर्माण करण्याचा निश्यच
शाहु महाराजांनी ज्याप्रमाणे संस्था उभारल्या, धरणं, वसतिगृहांची कामे केली, त्याच आदर्शानुसार राज्य सरकारदेखील नागरिकांना बळ देण्याचे काम करत आहे. सर्वांना न्याय देईल, सर्वांना विकासाची समान संधी देईल, असे शाहु महाराजांना अपेक्षित राज्य निर्माण करण्याचा निश्चयही यावेळी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...