आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sharad Pawar Delhi Residence Opposition Party Meeting Update; Nationwide Front Against BJP

राजकीय योग:भाजपविरोधात देशव्यापी मोर्चेबांधणी; राजकीय परिस्थितीवर दोन तास विचारमंथन, दिल्लीत 6 जनपथवरून ‘पवार प्ले’

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
शरद पवार यांच्या निवासस्थानी जमलेला प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांचा गोतावळा. सोबत राष्ट्रमंच व बैठकीचे निमंत्रक यशवंत सिन्हा. - Divya Marathi
शरद पवार यांच्या निवासस्थानी जमलेला प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांचा गोतावळा. सोबत राष्ट्रमंच व बैठकीचे निमंत्रक यशवंत सिन्हा.
  • शरद पवार, यशवंत सिन्हा यांच्यासह प्रादेशिक पक्षांच्या नेते, विचारवंतांची बैठक

उत्तर प्रदेश, पंजाबसह पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात देशव्यापी मोर्चेबांधणीची तयारी मंगळवारी सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील ६ जनपथ निवासस्थानी भाजपविरोधातील प्रादेशिक पक्ष, विचारवंत, कायदेतज्ज्ञांची बैठक झाली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत देशातील राजकीय परिस्थिती, बेरोजगारी, घटनात्मक स्वायत्त संस्था मोडकळीस आणण्याचे मोदी सरकारचे धोरण या विषयांवर चर्चा झाली. त्यासोबतच शरद पवार यांनी आपल्या खास “पवार’ शैलीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने चाचपणीत आघाडी घेतली. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आणि राष्ट्रमंच या भाजपविरोधी संघटनेची बैठक या दोन बैठकांच्या निमित्ताने चर्चेच्या केंद्रस्थानी राहून मित्र आणि विरोधक अशा दोन्ही बाजूच्या पक्षांना “संदेश’ देण्यात पवार यशस्वी झाले.

“पवारांच्या निवासस्थानी तिसऱ्या आघाडीची बैठक’ या हेडलाईन्स सोमवारपासून बातम्यांमध्ये झळकवल्यानंतर ही बैठक तिसऱ्या आघाडीसाठी नाही तर फक्त चर्चा करण्यासाठी असल्याची माहिती पक्षातील सुत्रांनी दिली, मात्र तोपर्यंत देशातील राजकीय पटलावर चर्चेत आलेल्या पवार यांनी भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण करण्यात यश मिळविले. “राष्ट्र मंचा’च्या बैठकीनिमित्ताने देशात सत्ता परिवर्तन करण्यासाठी धर्मनिरपेक्ष विचारसरणींनी एकत्र येण्याचा संदेश त्यांनी दिला.

कितीही आघाड्या केल्या तरीही मोदीच नंबर वन राहतील : रामदास आठवले
कितीही मंच,आघाड्या केल्या तरीही नरेंद्र मोदी हेच नंबर वन राहतील,अशा शब्दांत केंद्रीय मंत्री तथा रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी बैठकीची खिल्ली उडवली. मोदींचे नेतृत्व खूप मजबूत आहे. अशा आघाड्यांमुळे काँग्रेसचेच नुकसान होईल,असे ते म्हणाले.

कमलनाथ यांनी पवारांची घेतली स्वतंत्र भेट
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी शरद पवार यांची स्वतंत्र भेट घेतली. पवारांच्या निवासस्थानी झालेल्या राष्ट्रमंचच्या बैठकीनंतर पवार-कमलनाथ यांनी सुमारे अर्धा तास चर्चा केली. दरम्यान, पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी कमलनाथ यांनी भेट घेतल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

ही विरोधी पक्षांची बैठक नाही : शिवसेना
या बैठकीत शिवसेना,तेलगू देसम,बसपा,काँग्रेसचा समावेश नाही त्यामुळे ही बैठक विरोधी पक्षांची नाही अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली तर या मंचाची बैठक नियमित होत असते. कुणीही त्याचे सदस्य होऊ शकतो.भाजपव्यतिरिक्त सर्व पक्ष,इतर क्षेत्रातील लोकांना त्यासाठी खुले निमंत्रण आहे, असे मत पवन वर्मा यांनी व्यक्त केले.

सत्ताबदलासाठी रणनीती, बैठकीबाबत राष्ट्रवादीचे मौन
देशातील सध्याची परिस्थिती आणि २०२४ च्या सत्ताबदलासाठी आवश्यक रणनीती याची चाचपणी यावेळी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. तिसऱ्या आघाडीबाबत यावेळी कोणतीही चर्चा झाली नसली तरी धर्मनिरपेक्ष पक्षांनी भाजपविरोधासाठी एकत्र येण्याची गरज कम्युनिस्ट पक्षाचे नेते बिनॉय विशाम यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. राष्ट्रमंच आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मात्र याबाबत कोणतेही जाहीर विधान करण्यात आले नाही.

बैठकीत सहभागी राजकीय पक्ष
१. राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार, माजिद मेमन, सुप्रिया पवार, वंदना चव्हाण
२. तृणमूल काँग्रेस - यशवंत सिन्हा (निमंत्रक,राष्ट्रमंच)
३. नँशनल कॉन्फरन्स - उमर अब्दुल्ला
४. राष्ट्रीय लोक दल - जयंत चौधरी
५. समाजवादी पार्टी - घनश्याम तिवारी
६. आम आदमी पार्टी - सुशील गुप्ता
७. भाकप - बिनॉय विशम
८. माकप - निलोत्पल बसू

अन्य निमंत्रित
१. ए. पी. शाह, (निवृत्त न्यायमूर्ती)
२. के. सी सिंग (माजी राजदूत)
३. जावेद अख्तर (लेखक)
४. के टी एस तुलसी (ज्येष्ठ विधिज्ञ)
५. एस. वाय. कुरेशी (निवृत्त निवडणूक आयुक्त)
६. रविंदर मनचंदा
७. कॉलिन गोन्साल्विस (ज्येष्ठ वकील व मानवी हक्क कार्यकर्ते)
८.संजय झा (माजी काँग्रेस प्रवक्ते )
९. पवन वर्मा ( विचावंत, माजी जदयू नेते )

१५ पक्षांचा दावा, आले ६ प्रादेशिक पक्ष
राष्ट्रमंचच्या या बैठकीत १५ पक्ष सहभागी होणार असल्याचे सांगितले जात होते.प्रत्यक्षात ६ प्रादेशिक पक्ष आणि भाकप-माकप हे दोन राष्ट्रीय पक्ष सहभागी झाले. यशवंत सिन्हा यांच्या राष्ट्रमंच या अराजकीय व्यासपीठावर ही चर्चा झाली. त्याला राजकीय स्वरुप नव्हते असा दावा उपस्थितांनी केला.

सपा, आप, राष्ट्रीय लोकदल, माकपसह ८ पक्षांची हजेरी
भारतीय जनता पक्षाच्या धर्मवादी राजकारणाला विरोध करण्याच्या उद्देशाने माजी मंत्री यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रमंचाची बैठक शरद पवारांच्या निवासस्थानी मंगळवारी झाली. या बैठकीत यजमान राष्ट्रवादी काँग्रेससह समाजवादी पार्टी, राष्ट्रीय लोकदल,माकप, आपसह भाजपविरोधी ८ राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्याशिवाय माजी अधिकारी, निवृत्त न्यायमूर्ती, कायदेतज्ज्ञ आणि विचारवंतांना निमंत्रित करण्यात आले होते.

पुढील वर्षी राष्ट्रवादीच्या संघटनात्मक निवडणुका
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत आगामी निवडणुका आणि संघटनात्मक ध्येयधोरणे यावर चर्चा झाली. पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत खासदार प्रफुल्ल पटेल, राष्ट्रीय सचिव सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत दाखल झालेले केरळमधील माजी खासदार पी. सी. चाको यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी सहभागी झाले होते. देशातील सध्याचे प्रश्न, पक्ष संघटना आणि भविष्यातील पक्षाची धोरणे याबाबत पवार यांनी राष्ट्रीय कार्यकारणीतील नेत्यांशी चर्चा केली. पी. सी चाको यांच्याकडे दिल्ली राज्याची जबाबदारी यावेळी सोपविण्यात आली.

१० जनपथ वाळीत, ६ जनपथ केंद्रस्थानी
एकेकाळी काँग्रेसशिवाय कोणतीही सेक्युलर आघाडी शक्य नव्हती. त्यामुळे सोनिया गांधींचे १० जनपथ हे निवासस्थान दिल्लीतील राजकीय घडामोडींचे केंद्र असायचे. मात्र उत्तर प्रदेश, बिहारपाठोपाठ पश्चिम बंगाल, तामिळनाडूमधील निवडणुकीत काँग्रेसची वाताहत झाली अन् तृणमूल काँग्रेस, द्रमुकसारखे प्रादेशिक पक्ष बळकट झाल्याने काँग्रेसला या बैठकीचे निमंत्रणच धाडण्यात आले नव्हते. १० जनपथाचे वलय संपल्यानंतर आता ६ जनपथ केंद्रस्थानी आले आहे.

काँग्रेसशिवाय वाटचाल अशक्य, बैठकीतील सूर : गावंडे
काँग्रेसशिवाय राजकीय वाटचाल अशक्य असून भाजपविराेधी पक्ष-संघटनांना एकत्र अाणणे अावश्यक असल्याचा सूर मंगळवारी दिल्लीतील ‘राष्ट्रमंच’च्या बैठकीत उमटला. काँग्रेसच्या सहभागावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि नॅशनल काॅन्फरन्सचे उमर अब्दुल्ला सकारात्मक हाेते, अशी माहिती या बैठकीत सहभागी झालेले अकोला येथील शेतकरी जागर मंचचे संयोजक प्रशांत गावंडे यांनी दिली. राष्ट्रमंचच्या बैठकीत विविध प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेसचे राजकीय महत्त्व मान्य केले. भाजपनंतर काँग्रेसकडेच सर्वाधिक खासदार, अामदार व राज्य अाहेत. त्यामुळे पुढील राजकीय वाट काँग्रेसला वगळून शक्यच नसल्याचे अनेक नेत्यांचे मत हाेते, असे गावंडे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...