आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sharad Pawar On PM Narendra Modi Meeting | Sharad Pawar Press Conference Live News And Updates

पवारांची पत्रपरिषद:राऊतांवरील कारवाई अन्यायकारक! मोदींना कल्पना दिली; मविआला कोणताही धोका नाही, पुढील 15 वर्षे टिकेल -पवारांची स्पष्टोक्ती

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते. दोन्ही पक्षांतील अनेक नेत्यांनी या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढले. तथापि, स्वत: शरद पवार यांनी आपल्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन भेटीमागचे कारण सांगितले.

पंतप्रधान मोदींना एकटा भेटलो नाही...

शरद पवार म्हणाले की, मी पंतप्रधानांना एकटा भेटलो नाही. आमचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल हेही भेटीवेळी उपस्थित होते. त्यांनी पंतप्रधानांसमोर लक्षद्वीपमध्ये नागरिकांचा प्रशासकाविरोधात असलेल्या नाराजीची माहिती दिली. मी फक्त सोबत हरज होतो. यावेळी मीसुद्धा दोन मुद्द्यांवर पंतप्रधानांचं लक्ष वेधलं," असंही पवार म्हणाले.

लक्षद्वीपच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांची भेट

पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्यासह उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल म्हणाले की, लक्षद्वीपमध्ये प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्याकडून तेथे सुरू असलेल्या विकास कामांना स्थानिकांचा विरोध असून गेल्या 15 महिन्यांपासून याबाबत नागरिक निषेध करत आहेत. प्रशासक प्रफुल्ल पटेल यांना हटविण्याची मागणीही केली जातेय. याच मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आम्ही भेटलो. लक्षद्वीपमध्ये प्रशासक प्रफुल पटेल यांची नियुक्ती झाल्यापासून तेथे सुरू असलेल्या गैरकारभाराची माहिती मी वेळोवेळी आमचे अध्यक्ष शरद पवार यांना दिलेली आहे. याच मुद्द्यावर पीएम मोदींशी चर्चा करण्याची विनंती मी शरद पवार यांना केली होती. त्यानुसार आज आमची पंतप्रधानांसोबत भेट झाली. पंतप्रधानांनी आमचं संपूर्ण म्हणणं ऐकून घेतलं आणि ते सकारात्मक पाऊल उचलतील, अशी आम्हाला आशा असल्याचंही खासदार फैजल म्हणाले.

विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या मुद्द्यावरही चर्चा

शरद पवार म्हणाले की, "माझी पंतप्रधान मोदींसाबेत मर्यादित विषयांवर चर्चा झाली. विधान परिषदेच्या प्रलंबित सदस्यांबाबतही त्यांच्याशी चर्चा केली. राज्यपाल कोश्यारींकडे प्रलंबित असलेल्या 12 आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरून बोललो. राज्यपालांनी अद्यापही त्यावर निर्णय घेतलेला नाही."

संजय राऊत यांच्यावरील कारवाईवरही मोदींशी चर्चा

शरद पवार म्हणाले की, याशिवाय माझे राज्यसभेतील सहकारी संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईचाही मुद्दा मांडला. या सर्वांवर पंतप्रधान मोदी निर्णय घेतील अशी मला अपेक्षा आहे, असेही शरद पवार म्हणाले. संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची गरज काय होती? त्यांची मालमत्ता जप्त करणे अयोग्य असल्याचे ते म्हणाले. या दोन्ही मुद्द्यांवर मोदी योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा असल्याचे शरद पवार म्हणाले.

5 वर्षे सत्ता पूर्ण करून पुन्हा सत्तेत येऊ

महाविकास आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहे. फक्त 5 वर्षेच नव्हे, तर पुढील 15 वर्षे हे सरकार टिकणार आहे असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. यासोबतच, महाराष्ट्र सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. या सरकारमध्ये मंत्रिमंडळ किंवा फेरबदलाचा सुद्धा काहीच विचार नाही असे यावेळी बोलताना शरद पवारांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही

पत्रकार परिषदेदरम्यान राज ठाकरे यांनी नुकत्याच केलेल्या विधानावर प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की, मी राज ठाकरे यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. त्यांची भूमिका आधी भाजपविरोधी होती, आता ते बदलले आहेत, असेही ते म्हणाले. दरम्यान, राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत म्हटले होते की, राज्यात जातीय राजकारणाची सुरुवात राष्ट्रवादीच्या जन्मानंतर झाली. पवारांनाच जाती-पातीचं राजकारण हवं आहे, असा आरोपही त्यांनी केला होता.

बातम्या आणखी आहेत...