आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sharad Pawar| President Of India| Sharad Pawar Prashant Kishore And Opposition Meet| Latest News And Updates On Sharad Pawar And President Of India Speculations

राष्ट्रपती की 2024 ची तयारी?:शरद पवार यांना राष्ट्रपती करण्यासाठी प्रशांत किशोर यांची मोर्चेबांधणी? प्रशांत किशोर राहुल गांधी यांच्या भेटीनंतर माध्यमांत चर्चांना उधाण

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणूक सल्लागार प्रशांत किशोर आणि शरद पवार यांनी तीनदा एकमेकांच्या भेटी घेतल्या. यानंतर प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर माध्यमांत चर्चांना ऊत आले आहे. काहींनी तर शरद पवारांना राष्ट्रपती करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले. पण, शरद पवार यांच्या राष्ट्रपती पदासाठी तयारी असल्याच्या वृत्तावर अधिकृत काहीही समोर आलेले नाही. यामध्ये दोन शक्यतांवर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

2024 मध्ये भाजपला आव्हान देण्याची तयारी?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर तीन वेळा भेट घेतली. या भेटीत नेमके काय घडले हे अजुनही स्पष्टपणे समोर आलेले नाही. या भेटी-गाठीनंतर आता मात्र प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. उल्लेखनीय बाब म्हणजे, 2017 नंतर राहुल गांधी आणि प्रशांत किशोर यांची ही पहिलीच भेट होती. या बैठकीत प्रियांका गांधी वाड्रा देखील उपस्थित होत्या. एवढेच नव्हे, तर विविध विरोधी पक्ष आणि भाजप विरोधी नेत्यांनी यात सहभाग नोंदवला. एकंदरीत 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला आव्हान कसे देणार हा मूळ मुद्दा होता. परंतु, त्यात राष्ट्रपती पदावर सुद्धा चर्चा झाल्याचे माध्यमांनी सांगितले आहे.

2022 मध्ये संपणार राष्ट्रपती रामनाथ कोविद यांचा कार्यकाळ
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 2022 मध्ये संपुष्टात येत आहे. यानंतर पुढील राष्ट्रपती कोण होणार याचे गणित सध्या लावले जात आहे. राष्ट्रपती पदासाठी शरद पवार यांचे नाव प्रशांत किशोर यांच्याकडून प्रोजेक्ट केले जात आहे असे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने इतर पक्षांसह बीजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक यांना सोबत घेणे आवश्यक असल्याचे मत किशोर यांनी मांडले. त्यानुसार, किशोर यांनी पटनायक यांच्यासह एम. के. स्टॅलिन यांचीही भेट घेतली आहे.

भेटींचे नेमके कारण काय?
तत्पूर्वी माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनीही पवार आणि किशोर यांच्या भेटीच्या मुद्द्यावर पडदाच टाकण्याचा प्रयत्न केला. शरद पवार नेहमीच राजकीय प्रवाहांवर कुतुहल म्हणून चर्चा करत असतात. त्याच निमित्ताने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या विजयाचे निरीक्षण करण्यासाठी त्यांनी प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केली असे सांगण्यात आले. परंतु, प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीमागचे आणि दिल्लीत झालेल्या भेटींचे रहस्य काय यावर अजुनही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेल्या नाहीत. त्यामुळे, यात पवारांना राष्ट्रपती करण्याची तयारी केली जात आहे की 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आहे हे अद्याप स्पष्ट नाही.

बातम्या आणखी आहेत...