आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान कार्यालयात भेट घेतली. या भेटीनंतर चर्चांना उधाण आले आहे. सुमारे ५० मिनिटे या दोन नेत्यांत चर्चा झाली. पवार यांच्या मते या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही. मात्र केंद्रातील स्वतंत्र सहकार खाते, महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र यावर प्रामुख्याने चर्चा झाल्याचे मानण्यात येत आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन दोन दिवसांवर असताना अचानक या दोन नेत्यांच्या झालेल्या भेटीमुळे राजकीय तर्क-वितर्क लढवले जात आहेत. शुक्रवारी संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि पीयूष गोयल यांनी पवारांची भेट घेतली होती. महाराष्ट्रातील राजकारण, मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक, राज्य विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, शरद पवार राष्ट्रपतिपदाचे उमेदवार असल्याची चर्चा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमागे लागलेल्या केंद्रीय तपास यंत्रणा आदी मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर सहकारातून सहकार्याकडे नेणारी ही भेट असल्याचे सूत्रांचे मत आहे.
पंतप्रधान कार्यालयाने पवार - मोदी यांच्या भेटीचे एक छायाचित्र पोस्ट केले आहे. शरद पवार यांनीही सोशल मीडियावर म्हटले की, आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राष्ट्रीय हिताच्या काही मुद्द्यांवर चर्चा केली. राज्यातील महाविकास आघाडीत धुसफूस सुरू आहे. महाविकास आघाडीचे शिल्पकार असलेले शरद पवार यांनी दिल्लीत गेल्यानंतर अचानक पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत.
पवारांची साेशल मीडियावरील पाेस्ट : आज देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राष्ट्रीय हिताच्या काही मुद्द्यांवर चर्चा केली.- शरद पवार
सहकार हाच भेटीचा विषय : दिल्लीत मोदी-पवार यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या भेटीमागे सहकार क्षेत्रातील परिस्थिती हे मुख्य कारण असल्याचे सांगितले.
बँकिंग नियम, कोविडबाबत चर्चा : नवाब मलिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पवार यांच्या मोदी यांच्या भेटीबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, ‘शरद पवार - नरेंद्र मोदी भेटीवरून अफवा पसरवल्या जात आहेत, त्यात तथ्य नाही. बैठकीत बँकेच्या नियमांसंदर्भात तसेच कोविडच्या परिस्थितीवरही चर्चा केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी गर्दीच्या कार्यक्रमांविषयी राष्ट्रीय धोरण बनवण्याची मागणी केली आहे, याकडेही पवारांनी लक्ष वेधले. तसेच लसपुरवठा सुरळीतपणे करण्याची मागणीही केली.
पवार यांचे पंतप्रधानांना सहापानी पत्र
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, अधिनियमातील तरतुदी ९७ वी घटनादुरुस्ती, राज्य सहकारी संस्था अधिनियम आणि सहकाराची तत्त्वे यात नव्याने करण्यात आलेले बदल विसंगत आहेत. सहकाराच्या सुधारित कायद्यात बऱ्याच तरतुदी आवश्यक आहेत.
१७ जुलै २०२१ : सहकार्य करण्याची ऑफर?
पवार आणि मोदी यांच्यात शनिवारी झालेल्या भेटीत केंद्राचे नवे सहकार खाते हाच प्रमुख विषय होता, असे मानले जात आहे. राज्यातील सहकार खाते मजबूत करण्यात पवार यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या सहकारातील अनुभवाच्या सहकार्याची ऑफर पंतप्रधान मोदी यांनी पवार यांना दिली असल्याची चर्चा आहे.
२० नोव्हेंबर २०१९ : सोबत काम करण्याची ऑफर
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची ही भेट संसदेत झाली होती. भेटीबाबत पवारांनीच माहिती दिली होती. आपण एकत्र येऊन काम केल्यास मला आनंद होईल, असे मोदी मला म्हणाले. त्यावर, आपण एकत्र काम करणे राजकीयदृष्ट्या मला शक्य नाही, असे त्यांना सांगितल्याचे पवार यांनी त्या वेळी म्हटले होते.
नजीकच्या काळातील ‘पॉवर’ भेटी
७ जून : शरद पवार यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर बैठक
८ जून : महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुख मंत्र्यांसह पंतप्रधान मोदींची भेट, मुख्यमंत्री ठाकरे यांची मोदींसोबत ‘वैैयक्तिक’ चर्चा
११ जून - प्रशांत किशोर यांची शरद पवारांसोबत मुंबईतील निवासस्थानी बैठक
१३ जून : महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे सूतोवाच
22 जून - शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी भाजपविरोधी घटकांची बैठक
23 जून : प्रशांत किशोर यांच्यासोबत पवारांची दिल्लीत तिसरी भेट
२९ जून : शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांशी पुन्हा तासभर चर्चा
13 जुलै : काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.