आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sharad Pawar's Presidential Candidate For Next Year's Elections; Indications Received After Prashant Kishor's Rahul Priyanka Gandhi Meeting

मोर्चेबांधणी:पुढील वर्षीच्या निवडणुकीसाठी शरद पवार राष्ट्रपतिपदाचे उमेदवार; प्रशांत किशोर यांच्या राहुल-प्रियंका गांधी भेटीनंतर मिळाले संकेत

नवी दिल्ली, मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पटनायकांची मनधरणी, तर भाजप विरोधकांची स्थिती मजबूत

सन २०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपविरोधी आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उमेदवारी देण्याचे घाटत आहे. निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वाड्रा यांची भेट घेतल्यानंतर याचे संकेत मिळाले आहेत. रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतिपदाची मुदत पुढील वर्षी २०२२ मध्ये संपत आहे.

राहुल आणि प्रियंकासोबतच प्रशांत किशोर यांनी सोनियांशीही ऑनलाइन चर्चा केल्याचे सांगितले जाते. त्या वेळी शरद पवार यांच्या संभाव्य उमेदवारीसाठी गांधी परिवाराशी प्राथमिक स्तरावर बोलणी केल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे. दरम्यान, राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकताच शरद पवार यांनी तत्काळ खुलासा करीत या बातम्या बिनबुडाच्या असल्याचे स्पष्ट केले.

काय आहे व्यूहरचना
सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रशांत किशोर भाजपला घेरण्याच्या तयारीत आहेत. त्याचीच रंगीत तालीम म्हणून सन २०२२ च्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. त्यामुळे शरद पवारांना सर्वसहमतीचे उमेदवार म्हणून मान्यता मिळावी यासाठी प्रशांत किशोर जोरदार लाॅबिंग करीत असल्याचे सांगितले जाते. ही रणनीती यशस्वी ठरल्यास भाजपसमोर आव्हान उभे राहू शकते.

पटनायकांची मनधरणी, तर भाजप विरोधकांची स्थिती मजबूत
दिल्लीतील पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर प्रशांत किशोर यांनी नव्या आघाडीचे वृत्त फेटाळले होते. आगामी लोकसभा निवडणुकीत कोणतीही तिसरी-चौथी आघाडी भाजपला आव्हान देऊ शकत नाही, असे ते म्हणाले होते. मात्र ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनायक यांना आपल्या बाजूने वळवण्यात ते यशस्वी ठरल्यास राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधकांची स्थिती मजबूत होऊ शकते असे मानले जाते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा मुकाबला करण्यासाठी शरद पवार हे तुल्यबळ उमेदवार ठरू शकतात. सन २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडे तुल्यबळ उमेदवार नसल्यास मोदींचा पराभव शक्य नाही, असे मत शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

प्रशांत किशोर-पवार तीन वेळा भेट
प्रशांत किशोर यांनी गेल्या महिन्यात शरद पवारांची तीन वेळा भेट घेतली होती. त्यापैकी दोन बैठका मुंबईत तर एक बैठक दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी झाली होती. त्यानंतर पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी पूर्वाश्रमीचे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या पुढाकाराने भाजप विरोधक १० पक्ष आणि लेखक, विचारवंत,निवृत्त नोकरशहांची बैठक झाली. या बैठकांमागे हेच कारण असल्याचे सांगितले जाते. ‘राष्ट्रपतिपदासाठी माझी उमेदवारी ही तद्दन खोटी बातमी आहे. ३०० खासदार असलेला (भाजप) पक्ष समोर असताना निवडणुकीचा निकाल काय लागेल हे मला माहिती आहे. त्यामुळेच राष्ट्रपतिपदाची निवडणूक मी लढवणार नाही.

.... म्हणून पवार म्हणतात, निकाल मला माहिती आहे
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी लोकसभा-राज्यसभेतील खासदार तसेच विधानसभा-विधान परिषदेतील आमदारांना मतदानाचा अधिकार असतो. लोकसभेत भाजपचे निर्विवाद बहुमत आहेच. राज्यसभेत बहुमत नसले तरीही मतदानावेळी ओडिशा, आंध्र प्रदेशातील खासदार सत्ताधाऱ्यांच्या बाजूने मतदान करताना दिसतात. देशातील ३१ पैकी १७ राज्यांमध्ये भाजप स्वबळावर अथवा सत्तेत वाटेकरी आहे. तर महाराष्ट्र, बंगाल, तामिळनाडू या तीन मोठ्या राज्यांसह १३ राज्यांमध्ये भाजपविरोधक सत्तेवर आहेत. तसेच महाराष्ट्रासह केवळ पाच राज्यांत विधान परिषद अस्तित्वात असून त्यापैकी ३ राज्यांत भाजपचे तर दोन राज्यांत विरोधकांचे बहुमत आहे. या सर्वांची गोळाबेरीज केली असता विरोधकांचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमीच आहे. शिवाय पवार यांचे वय आणि प्रकृती लक्षात घेता ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुकही नाहीत.

बातम्या आणखी आहेत...