आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस नेते शशी थरूर यांनी रविवारी पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्यांच्या यासंबंधीच्या पोस्टवर भाजपने निशाणा साधला. त्यावर थरूर यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला. ते म्हणाले - मुशर्रफ सर्वच देशभक्तांसाठी अभिशाप होते, तर 2003 मध्ये भाजप सरकारने त्यांच्यासोबत शस्त्रसंधी का केली. 2004 मध्ये वाजपेयी-मुशर्रफ यांनी संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी का केली. त्यावेळी मुशर्रफ यांच्याकडे विश्वासार्ह शांतता भागीदार म्हणून पाहिले जात नव्हते का?
थरुर यांनी मुशर्रफ यांच्या निधनावर एक ट्विट केले होते. त्यात ते म्हणाले होते - पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे दुर्धर आजाराने निधन. कधीकाळी भारताचे कट्टर शत्रू असणारे मुशर्रफ 2002 ते 2007 दरम्यान शांततेची खरी ताकद बनले होते. त्यावेळी संयुक्त राष्ट्रात मी त्यांच्याशी वार्षिक चर्चा करत होतो.
तत्पूर्वी, अन्य एका ट्विटद्वारेही ते म्हणाले होते - मी अशा भारतात वाढलो, जिथे मृत्यू झालेल्या व्यक्तीबद्दल चांगले बोलले जाते. मुशर्रफ एक कट्टर शत्रू होते. ते कारगिल युद्धाला जबाबदार होते. पण त्यांनी 2002-2007 दरम्यान भारतासोबत शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले. ते आमचे मित्र नव्हते. पण त्यांनी शांततेत सामरिक फायदा पाहिला. ते मला स्मार्ट, व आकर्षक वाटत होते. त्यांची धोरणात्मक विचारसरणी अतिशय स्पष्ट होती.
केंद्रीय मंत्री म्हणाले - पोस्ट काँग्रेसची विचारसरणी दर्शवणारी
थरूर यांच्या पोस्टवर भाजपने जोरदार टीका केली. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी थरूर यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले - थरुर यांच्या विधानावरून काँग्रेसची विचारसरणी दिसून येते. प्रत्येक आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करून दहशत पसरवणारा, पाठीत खंजीर खुपसणारा व आपल्या सैनिकांवर अत्याचार करणारा पाक जनरल खऱ्या अर्थाने शांततेची शक्ती बनला असे काँग्रेसच्या एका माजी परराष्ट्र राज्यमंत्र्यांना वाटते.
भाजप प्रवक्ता म्हणाला- काँग्रेसचे पाक प्रेम पुन्हा उजेडात
भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, मुशर्रफ कारगिल युद्धाचे मास्टरमाईंड होते. हुकूमशहा होते. त्यांच्यावर घृणास्पद गुन्ह्यांचा आरोप होता. त्यांनी तालिबान व ओसामा यांना भाऊ व नायक मानले होते. तसेच आपल्याच सैनिकांचे मृतदेह परत घेण्यास नकार दिला होता. आता काँग्रेस त्यांचे कौतुक करत आहे! आश्चर्य वाटत आहे. काँग्रेसचे पाक प्रेम पुन्हा चव्हाट्यावर आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.