आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊतांचा टोला:महाराष्ट्राच्या जनतेने आता पैसे जपून खर्च करावेत, तुमच्या चिकन खरेदीकडेही भाजपचे लक्ष, ईडीकडे करतील तक्रार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर पोटनिवडणुकीत मतदारांनी कोणाकडून पैसे घेऊन मतदान करू नये. अन्यथा त्यांची ईडीकडे तक्रार केली जाईल, असा इशारा काही दिवसांपुर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट जनतेलाच दिला होता. त्यावर आज शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत जोरदार टोलेबाजी केले. महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात होणाऱ्या ईडी कारवाईचा संदर्भ देत राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेने आता सावध व्हायला पाहिजे. त्यांनी पैसे जपून खर्च करावेत. त्यांच्या भाजी, चिकनखरेदीकडेही भाजप पदाधिकाऱ्यांचे लक्ष असेल. सलग दोन दिवस चिकन खरेदी केल्यास भाजपचे पदाधिकारी ईडीकडे तक्रार करू शकतात. त्यामुळे तुम्ही अडचणीत याल, असा टोला राऊतांनी हाणला.

आधी भाजपशासित राज्यातील भोंगे उतरवा!
मुंबईतील अजानचे भोंगे बंद करावेत, अशी मागणी भाजपने केली आहे. त्यावर राऊत यांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, देशभरातील भोंगे अजूनही उतरलेले नाहीत. भाजपशासित राज्यांमध्येही भोंगे चालूच आहेत. मी गोवा, उत्तर प्रदेशात गेलो तेथेही मला भोंग्याचा आवाज ऐकू आला. त्यामुळे भाजपने आधी त्यांच्या राज्यातील भोंगे बंद करावेत. मग आम्हाला सूचना कराव्यात, असे राऊत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांसोबत सर्व खासदारांची बैठक
मुख्यमंत्री भेटीसाठी वेळ देत नसल्याने शिवसेनेचे खासदार नाराज असल्याची चर्चा आहे. यावरदेखील राऊत यांनी आज स्पष्टीकरण दिले. यासंदर्भात केवळ शिवसेनाच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व पक्षीय खासदारांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत लवकरच भेट होईल. त्यांची नेमकी नाराजी कशाबाबत आहे, हे समजून घेतले जाईल. महाविकास आघाडीतील प्रत्येक घटकाकडे मुख्यमंत्री लक्ष देतील. इतरांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच, शिवसेनेच्या शिवसंपर्क यात्रेदरम्यानही सेनेच्या आमदारांची नाराजी वर आल्याबाबत या आमदारांचीही लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत भेट घालून दिली जाईल. हे आमदार पक्षावर नाराज नाहीत. तर काही संघटनात्मक त्रुटी आहेत. त्या दूर केल्या जातील, असे राऊत म्हणाले.

मंत्रिमंडळात खांदेपालट हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय
राज्याच्या मंत्रिमंडळात लवकरच खांदेपालट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत निर्णय मुख्यमंत्रीच घेतील. तसेच, मुख्यमंत्र्यांची तब्येत आता उत्तम अजून ते पुन्हा जोमाने कामाला लागले आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच, राज्यातील महामंडळाच्या नियुक्त्या का रखडल्या, कोणामुळे रखडल्या याची चौकशी करण्यासाठी समिती नेमावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...