आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात आज सर्वत्र होळी सण उत्साहात साजरा केला जात आहे. त्यापार्श्वभुमीवर राज्याच्या गृहविभागाने काही नियम जारी केले आहेत. त्यानुसार होळीचे दहन रात्री 10 च्या आत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दहावी बोर्डाची परिक्षा देखील सुरू असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी डिजेबरोबरच मोठ्या आवाजात गाणी वाजवण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणारआहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या या नियमांना भाजपने मात्र विरोध केला आहे. हिंदू सणांना विरोध का? असा सवाल भाजपने महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे. त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज्यात विरोधी पक्ष ज्या पद्धतीने वागत आहे त्याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काही सूचना घ्यायला हव्यात, असा टोला संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे. ते म्हणाले की, संपूर्ण देशात आजही कोरोनाची भीती कायम आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होत आहे. त्यापार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारनेदेखील काही निर्बंधांचे पालन करा, असे आवाहन केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्यासंदर्भात काही नियम, निर्बंध ठेवले असतील तर राज्याच्या आणि लोकांच्या हितासाठी आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
राऊत पुढे म्हणाले की, भाजपने केवळ विरोधासाठी विरोध करू नये. मात्र, लोकांचे जीव धोक्यात घालण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडण्यास ते अद्याप तयार नाहीत. सत्ता येत नसल्याने वैफल्य येऊ शकते, पण ते अशा टोकाला जाऊ नये की आपल्या राज्यात आपल्याच लोकांचे बळी जावेत आणि त्याचेही राजकारण करत सरकारला धारेवर धरता यावे. हे चुकीचे आहे. इतके क्रूर पद्धतीचे, अमानुष राजकारण महाराष्ट्रात यापूर्वी कोणी केले नव्हते आणि करू नये, असे संजय राऊत म्हणाले.
निर्बंध गेले खड्ड्यात!
राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीवर भाजपने नाराजी व्यक्त केली असून, हिंदू सणांना का विरोध केला जात आहे? असा सवाल केला आहे. भाजपचे नेते राम कदम यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'आता पुन्हा त्यांनी होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यावर निर्बंध घातलेत. आहो तुम्ही घाबरत असाल. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आम्हाला कळते स्वतःची कशी काळजी घ्यायची. तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात. आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.