आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसैनिक आक्रमक:उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला, 'गद्दार, गद्दार' अशी घोषणाबाजी करत गाडीची काच फोडली

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसैनिकांनी बंडखोर आमदार उदय सामंत व तानाजी सामंत यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. - Divya Marathi
शिवसैनिकांनी बंडखोर आमदार उदय सामंत व तानाजी सामंत यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला.

राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. पुण्यात ही घटना घडली. शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची काचही फुटली. विशेष म्हणजे, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेसाठी तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील आज पुण्यात आहेत. याचदरम्यान ही घटना घडली.

नेमके काय झाले?

शिवसेनेचे बंडखोर आमदार व माजी मंत्री उदय सामंत हे मंगळवारी दिवसभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दौऱ्यात फिरत होते. रात्री सव्वा नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कात्रज परिसरात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा झाली. तेथून जवळच बंडखोर नेते तानाजी सावंत यांचे निवासस्थान आहे. त्याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार होते. याकरीता तानाजी सावंत व उदय सामंत कात्रज परिसरातून जात असताना त्यांना शिवसैनिकांच्या रोषास सामोरे जावे लागले. शिवसैनिकांनी केलेल्या दगडफेकीत उदय सामंत यांच्या कारची काच फुटली. यामुळे कात्रज परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. 'गद्दारांना माफी नाही', असे म्हणत शिवसैनिकांनी उदय सामंत यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा व्यवस्थेतील पोलिसांनी त्यांची गाडी सुखरूपपणे बाहेर काढत त्यांना पुढे नेले.

संघर्षाला मी घाबरत नाही - सामंत

उदय सामंत एका वृत्त वाहिनिशी बोलताना म्हणाले, 'माझी गाडी फोडण्यात आली आहे. सभेला जाताना लाकडी दांडके आणि हॉकी स्टिक घेऊन कार्यकर्ते कसे काय आले होते. हल्लेखोर लोक शिवसेनेचे नसतील ते दुसरे असतील त्याबाबत तपास झाला पाहिजे. माझी गाडी सिग्नलला थांबलेली असताना माझ्या गाडीवर हल्ला करण्यात आला. मी राजकीय जीवनात संघर्ष केला असून संघर्षाला मी घाबरत नाही. गाडी सिग्नलला थांबलेली असताना हल्ला करणे चुकीचे आहे. माझी नगरसेवक नाना भानगिरे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यानंतर माझ्या सुरक्षा व्यवस्थेचा ताफा जात होता. कात्रज येथे मी सिग्नलला थांबलो असताना काही लोक दुसऱ्या गाडीत आले. त्यांनी मला शिवीगाळ केली आणि गाडी फोडण्याचा प्रयत्न केला. माझ्यावरदेखील हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आम्ही शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. आमच्या सोबतचे 50 आमदार कोणत्याही दहशतीला आणि दबावला बळी पडणार नाही. हा हल्ला नामर्दपणाचे लक्षण आहे. मुख्यमंत्री या प्रकरणावर लक्ष ठेवून असून पोलिसांनी हल्लेखोर कोण होते याबाबत तपास करणे गरजेचे आहे. याबाबत मी पोलिसांकडे तक्रार दाखल करत आहे.'

काहीच माहिती नाही - ठाकरे

उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला होताच पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया विचारली. तेव्हा अशा हल्ल्याबाबत आपल्याला काहीही माहीती नाही, असे सांगत आदित्य ठाकरेंनी अधिक बोलण्यास नकार दिला. तर, अजूनही उद्धव ठाकरेंसोबत असलेले खासदार विनायक राऊत यांनी हा हल्ला शिवसैनिकांनी केला असेल, असे वाटत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्र्यांचा शिंदेंचा ठाकरेंना इशारा

हल्ल्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, भाषणाद्वारे शिवसैनिकांना कुणी भडकावण्याचं, चिथावणी देण्याचं काम करेत असेल तर पोलिस कारवाई करतील. कायदा सुव्यवस्था राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे कुणी कायदा हातात घेतल्यास सरकार कारवाई करण्यास सक्षम आहे.

शिवसैनिकांना फसवल जातंय

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर या हल्ल्याबाबत म्हणाले, आदित्य ठाकरेंकडून सातत्याने बंडखोरांवर जळजळीत टीका होत आहे. अशा तऱ्हेची भाषणे होत राहिली तर शिवसैनिक नियंत्रण गमावतीलच. मात्र, अशा भाषणांमुळे वस्तुस्थिती समोर जात नाहीये. शिवसैनिकांना फसवल जात आहे. त्यामुळे मी लवकरच आमच्यावर होणाऱ्या सर्व आरोपांबाबत सविस्तर भाष्य करणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेलाही सत्य काय, ते कळेल.

पोलिस कारवाई करतील

बंडखोर आमदार व राज्याचे माजी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई म्हणाले, सामंत यांच्यावरील हल्ला हा अतिशय भ्याड प्रकार असून एवढ्या खालच्या पातळीवरचे राजकारण महाराष्ट्राला शोभनीय आहे. हल्ल्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार असून पोलिस दोषींवर नक्कीच कारवाई करतील.

बातम्या आणखी आहेत...