आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी भाबडे, निरागस अन् निष्पाप:भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरून शिवसेनेची टीका; शिंदे गटातील नेत्यांच्या ED चौकशीची करून दिली आठवण

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून विरोधकांवर केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे. 'नितीश कुमार हे 2024 ला आव्हान ठरू शकतील अशी भीती मोदींना आतापासून का वाटावी? मोदींनी एक वार केला की, नितीश तत्काळ त्याच्यावर पलटवार करतात. त्यावर भक्तांची तोंडे बंद होतात. पंतप्रधानांनी आता राजकीय गटाचे टुमणे सुरू केले आहे. पण तो वार त्यांच्यावर उलटला आहे. भ्रष्टाचाऱ्यांवरील कारवाईतून नवा गट उदयास येत आहे, हे त्यांचे म्हणणे खरे मानले तर महाराष्ट्रातील भाजपच्या मांडीवर बसलेला शिंदे गट हेच त्याचे उत्तर आहे. मोदी भाबडे आहेत. निरागस आहेत. निष्पाप आहेत. त्यांना कोणीतरी सत्य माहिती द्यायला हवी,' असे शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून म्हटले आहे.

शिंदे गटाला शिवसेना संबोधणे हा सुद्धा भ्रष्टाचार

'भाजपने महाराष्ट्रात भ्रष्ट मंडळींना बाजूला घेऊन एक गट केला. त्याला आता शिंदे गट म्हणून ओळखले जाते. स्वतः शिंदे व त्यांच्या लोकांवर ईडी चौकशीचे जोखड होते. त्यांच्या बरोबरच्या किमान 10 आमदारांची ईडी चौकशी सुरू होती. म्हणजे भ्रष्टाचार होताच. काहींनी अटकपूर्व जामीन घेतले. या सगळ्यांचा एक राजकीय गट स्थापन करून भाजपने त्यांच्यासोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. पुन्हा आश्चर्य असे की, या गटाचे आमदार सांगतात, आम्ही भ्रष्ट असलो तरी न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागेल. निरागस मोदींनी या सर्व प्रकरणाचा नीट अभ्यास करावा. महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी गटास शिवसेना असे वारंवार संबोधणे हासुद्धा एक भ्रष्टाचारच आहे,' असे शिवसेनेने म्हटले आहे.

अन् भावनाताई 'स्वच्छ' झाल्या

'भाजपचे काही लोक खा. भावना गवळींना तुरुंगात टाकण्याची भाषा करत होते. पण मोदींनी भावनाताईंकडून प्रेमाणे राखी बांधून घेतली आणि ताईंवरचे सर्व आरोप स्वच्छ झाले. संजय राठोड या मंत्र्याची एक क्लिप आजही पुण्याच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये आहे. भाजपच्या रणवाघिणीने ती क्लिप दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींना दाखवायला हवी. म्हणजे आपण किती अंधारात आहोत व आसपासचे सत्य आपल्यापर्यंत कसे पोहोचू दिले जात नाही हे त्यांना समजेल. महाराष्ट्र सरकार बेकायदा व भ्रष्ट आहे. पण मोदी विरोधकांवर बाण सोडत आहेत. ईडी व सीबीआयचा वापर विरोधकांची सरकारे पाडण्यासाठी केला जात आहे,' असेही शिवसेनेने मोदींवर शरसंधान साधताना म्हटले आहे.

नरेंद्र भाईंचे मन अजाण बालकाप्रमाणे

'आपले प्रिय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांचे मन एखाद्या अजाण मुलाप्रमाणे निरागस व निष्पाप आहे. बालकाच्या हाती एखादे खेळणे दिले, तर ते आपल्याच धुंदीत, मजेत खेळत बसते. आजूबाजूला काय चालले आहे, याच्याशी त्याचे कोणतेही देणेघेणे नसते. मोदीही तसेच आहेत. त्यांनी 2 दिवसांपूर्वी एक निरागस व निष्कपट विधान केले. देशातील भ्रष्टाचारांवरील कारवाईमुळे राजकारणात नवे ध्रुवीकरण सुरू झाले आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांना वाचवण्यासाठी काही राजकीय गट एकत्र येत आहेत असे ते म्हणाले. त्यांचे हे विधान गांभीर्याने घ्यावे की एका निरागस बालकाचे बोल म्हणून सोडून द्यावे हा ज्याचा त्याचा प्रश्न; पण बिहारमध्ये नितीश कुमारांनी बंड करून आव्हान देताच मोदी बिथरल्याचे दिसून येते,' असे शिवसेनेने म्हटले आहे.

भ्रष्टाचारांचा गट कोण बनवीत आहे?

मोदी म्हणतात की नितीश, शरद पवार, ममता व आम्ही म्हणजे शिवसेना , तेलंगणाचे के सी राव आदी मंडळी भ्रष्टांना वाचवण्यासाठी एकत्र येत आहेत. पण दुसऱ्याकडे बोट दाखवताना 3 बोटे स्वतःकडे वळलेली असतात, हे त्यांना कोणीतरी सांगायला हवे. सुरूवात त्यांच्या प्रिय प. बंगालपासून करू. ममतांना आव्हान देण्यासाठी भाजपने तृणमूलच्याच सुवेंदु अधिकारींना भाजपत आणले. आता ते भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. मोदी यांच्या मनात सुवेंदुंना बंगालचे मुख्यमंत्री करायचे होते. पण लोकांनी तसे होऊ दिले नाही. हे सुवेंदु शारदा चीट फंड घोटाळ्याचे मास्टरमाइंड आहेत. त्यांची जागा तुरुंगात आहे. अशा गर्जना कालपर्यंत भाजपा करीत होती. हे निरागस मोदींना कुणी सांगितले नाही काय? ममतांचे उजवे हात मुकूल रॉय हे सुद्ध त्याच प्रकरणातील एक आरोपी. नंतर ते थेट मोदी-शहांच्या व्यासपीठावरच बसले. तेव्हा भ्रष्टाचारांचा गट गोण बनवीत आहे?, असा सवाल शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून विचारला आहे.

बिहारमध्ये महाशक्तीचा पराभव

'केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर भाजपच्या पक्षनिधीत भर टाकण्यासाठी व राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी करण्यासाठी सुरू आहे. त्याविरोधात आवाज उठवणे म्हणजे भ्रष्टाचाराचे समर्थन असे आता पंतप्रधान मोदी बोलू लागले आहेत. म्हणजे नितीश कुमार, शरद पवार, ममतांचे बाण योग्य ठिकाणी बसत आहे. नितीश कुमारांबरोबर आज तेजस्वी यादव आहेत. तेजस्वींच्या पक्षाने बिहारमध्ये भाजपपेक्षा जास्त आमदार निवडून आणले. हा मोदी-शहांच्या महाशक्तीचा पराभव आहे. हेच तेजस्वी भाजपसोबत गेले असते तर त्यांचे सर्व गुन्हे माफ व लालू यादवही भाजपचे महात्मा ठरले असते. पण तेजस्वी शिंदे गटाप्रमाणे झुकले नाही. त्यामुळे आता त्यांच्या आमदारांवर कारवायांचे सत्र सुरू झाले आहे. नितीशकुमार 2024 ला आव्हान ठरतील, अशी भीती मोदींना आतापासून का वाटावी?', असे शिवसेनेने विचारले आहे.

बातम्या आणखी आहेत...