आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणांच्या उपचारांची शूटिंग झालीच कशी?:शिवसेना नेत्यांचा लीलावती रुग्णालय प्रशासनाला सवाल, पोलिसांतही करणार तक्रार

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लीलावती रुग्णालयात नवनीत राणा यांचा एमआरआय करतानाचा फोटो व्हायरल झाला होता. एमआरआयचे यंत्र अत्यंत संवेदनशील असल्याने त्या खोलीमध्ये कुणालाही कॅमेरे किंवा मोबाईलचा वापर करता येत नाही. असे असतानाही राणांच्या उपचारांची शुटिंग कशी काय झाली, असा सवाल शिवसेनेने लिलावती रुग्णालय प्रशासनाला केला आहे. शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर व आमदार मनीषा कायंदे यांनी आज लिलावती रुग्णालयात धडक देत रुग्णालय प्रशासनाला यासंबंधी जाब विचारला.

फोटो कुणी काढले?
नवनीत राणा यांचा एमआरआय करतानाचा फोटोच यावेळी मनीषा कायंदे यांनी लिलावती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना दाखवला. एमआरआय रुममध्ये कॅमेऱ्याला परवानगी नसताना त्यादिवशी रुमपर्यंत कॅमेरा गेलाच कसा, असा सवाल पेडणेकर आणि कायंदे यांनी लिलावतीच्या अधिकाऱ्यांना केला आहे. तसेच, तो फोटो कुणी काढला, याबाबतही खुलासा करावा, अशी ताकिद दिली आहे.

शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी MRI रुममधील नवनीत राणांचा व्हायरल फोटोच लिलावती रुग्णालय प्रशासनाला दाखवला.
शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी MRI रुममधील नवनीत राणांचा व्हायरल फोटोच लिलावती रुग्णालय प्रशासनाला दाखवला.

राणांना स्पॉंडिलायटीसचा त्रास, मग उशी कशी वापरली?
नवनीत राणा यांना सातत्याने जोरदार प्रत्युत्तर देणाऱ्या किशोरी पेडणेकर यांनी लिलावतींमधील राणांच्या व्हायरल फोटोवरून रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. नवनीत राणा यांनी आपल्याला स्पाँडिलायटीस म्हणजेच मणक्यासंबंधित आजार असल्याचे सांगितले होते. हा त्रास असताना रुग्ण उशी वापरू शकत नाही. मात्र, राणांच्या व्हायरल फोटोमध्ये त्या उशी वापरताना दिसत आहेत. राणांना स्पाँडिलायटीस होती तर त्यांना उशी वापरायला कशी दिली, असा सवाल करत पेडणेकर यांनी राणांच्या आजारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, एमआरआय करतानाही राणांचे डोके वर उचललेले दिसत होते. ते कसे काय, असा सवाल करत त्यांनी राणांचे एमआरआय करणाऱ्या चमुवर प्रश्नांची चांगलीच सरबत्ती केली.

राणांनी उपचारांचे नाटक केले, त्यांना रुग्णालयाचीही साथ होती का?
स्पाँडिलायटीस असताना उशी वापरणे, एमआरआय रुममध्ये कॅमेऱ्याचा यंत्रांना व रुग्णांना धोका असतानाही त्यांचा वापर करणे, या सर्व गोष्टींवरून नवनीत राणा यांनी उपचाराचे नाटक केले, असेच दिसते, अशी टीकाही यावेळी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली. तसेच, या नाट्यात रुग्णालय प्रशासनही सहभागी आहे का, असा बोचरा सवालही त्यांनी केला. या सर्व प्रश्नांवर रुग्णालय प्रशासन मात्र अनुत्तर झालेले दिसले.

घडलेला प्रकार गंभीर, म्हणून पोलिसांत तक्रार देणार
लिलावती रुग्णालय प्रशासनाशी सवाल-जवाब केल्यानंतर शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, एमआयआय रुमपर्यंत कॅमेरा जाणे घातक आहे. अशा प्रकारामुळे उद्या ईसीजी करतानाही कुणी शुटिंग करेल. हे रुग्णांसाठी धोकादायक व त्यांच्या हक्कांच्याही विरोधात आहे. लिलावती रुग्णालय हे खासगी रुग्णालय असले तरी राज्याच्या धर्मादाय संस्थेकडे रुग्णालयाची नोंद आहे. त्यामुळे रुग्णालय व त्यामधील रुग्णांची जबाबदारी सरकारवरही असते. नवनीत राणा यांनी जो प्रकार रुग्णालयात केला, त्याला परवानगी कशी देण्यात आली किंवा रुग्णालय प्रशासनावरच कुणाचा दबाव होता का, हे समोर येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे या प्रकाराबाबत मुंबई पोलिसांकडे तक्रार करणार आहोत, असे मनिषा कायंदे यांनी सांगितले. पुढे असे प्रकार घडू नये, म्हणून आताच अशा प्रकारांवर कारवाई करणे आवश्यक असल्याचेही कायंदे म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...