आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार संजय राऊतांचे आवाहन:शरद पवारांच्या पुढाकाराशिवाय मोदींना पर्याय निर्माण होऊ शकत नाही, विरोधकांच्या एकजुटीसाठी त्यांनीच प्रयत्न करावेत

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्षपद स्वीकारण्यास आपल्याला अजिबात रस नसल्याचे काल स्पष्ट केले होते. त्यावर आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शदर पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. आपण त्यांचा आदर करतो. मात्र, शरद पवारांच्या पुढाकाराशिवाय नरेंद्र मोदींविरोधात सक्षम पर्याय निर्माण होऊ शकत नाही. विरोधकांच्या एकजुटीसाठी त्यांनीच प्रयत्न करावेत, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.

शरद पवारांशिवाय विरोधकांच्या एकजुटीचे पाऊल पुढे जाणार नाही!
आज नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, शरद पवारसाहेब हे मोठे नेते आहेत. विरोधी पक्षांनी एकत्र यावे, यासाठी त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. देशात ममता बॅनर्जींसारखे मोठे नेतेही आहेत. मात्र, शरद पवारांच्या पुढाकाराशिवाय मोदींना सक्षम पर्याय निर्माण करू शकत नाही. विरोधकांच्या एकजुटीसाठी त्यांचे मार्गदर्शन आम्हाला हवे आहेत. शरद पवारांशिवाय विरोधी पक्षांची एकजूट होऊ शकत नाही. त्यामुळे यासाठी पवारांसारख्या नेत्यांनी एकत्र यावे, असे आमचे मत असल्याचे राऊत म्हणाले.

विरोधकांनी कितीही षडयंत्रे केली तरी मुंबई पालिकेवर आमचाच झेंडा
आगामी काही महिन्यांत मुबंई पालिकेसह, ठाणे, नाशिक व इतर महापालिकांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. यावरही संजय राऊत यांनी भाष्य केले. या निवडणुकांमध्ये शिवसेनेविरोधात कितीही असंतुष्ट एकत्र आले. त्यांनी कितीही कटकारस्थाने, षडयंत्रे केली तरी त्यांच्या छाताडावर पाय रोऊन मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकवू, असे संजय राऊत म्हणाले.

नितीन गडकरी- राज ठाकरेंच्या भेटीवर टोला
काल मनसेप्रमुख राज ठाकरे आणि भाजप नेते नितीन गडकरी यांची मुंबईत भेट झाली. त्यावरून मनसेही भाजपची बी टीम असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली जात आहे. त्यावर कोणाला कोणाची टीम बनायचे, हा त्यांचा प्रश्न असल्याचे संजय राऊत म्हणाले. तसेच, महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना मिरीटवर असल्यानेच शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यात असल्याचे राऊत म्हणाले. शिवसेनेला राजकारण कळत. महाराष्ट्राच्या जनतेचा शिवसेनेला पाठिंबा आहे. देशात चांगली कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे हे सलग तीनवेळा टॉप 5 मध्ये आहेत. ज्यांना हे कळत नसेल त्यांना राजकारणात 'ढ' म्हणावे लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

उत्तर प्रदेशसह 5 राज्यातील निवडणुकांची ईडी चौकशी करा, चंद्रकांत पाटलांना टोला
कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत मतदारांनी पैसे घेऊन मतदान केल्यास त्यांची ईडी चौकशी केली जाईल, असा इशारा काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. त्यावर या सुचनेचे आम्ही स्वागत करतो. पण आधी नुकत्याच झालेल्या गोवा, उत्तर प्रदेशसह 5 राज्यातील निवडणुकांची ईडी चौकशी करा. गोव्यातील साखळी येथे भाजपचे प्रमोद सावंत कसे जिंकले आणि पणजीमध्ये उत्पल पर्रिकर कसे पराभूत झाले, याची ईडी चौकशी करा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

बातम्या आणखी आहेत...