आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार निवडणूक निकालांवर शिवसेना:'बिहारमध्ये नितीश कुमारांना मुख्यमंत्री केले तर त्याचे श्रेय शिवसेनेला द्यावे', तसेच तेजस्वी यादवांवर उधळली स्तुती सुमने

9 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप व संयुक्त जनता दलाच्या आघाडीला बहुमत मिळाले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच समोर आले. यावर आता शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून भाष्य करण्यात आले आहे. 'नितीशकुमारांच्या पक्षास कमी जागा मिळाल्या तरी तेच मुख्यमंत्री होतील, असे अमित शहा यांना जाहीर करावे लागले. तसा शब्द तर 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेलाही दिला होता. तो शब्द पाळला गेला नाही व महाराष्ट्रात नवे राजकीय महाभारत घडले. आता कमी जागा मिळूनही नितीशकुमारांना दिलेला शब्द पाळला गेला तर त्याचे श्रेय शिवसेनेला द्यावे लागेल.' असे म्हणत शिवसेनेने भाजपला सुनावले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप व संयुक्त जनता दलाच्या आघाडीला बहुमत मिळाले आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला सत्ता मिळवण्यात अपयश आले असले तरी त्यांनी एनडीएला जोरदार लढत दिली. यावरुन शिवसेनेने तेजस्वी यादव यांच्यावर स्तुती सुमने उधळली आहेत. तसेच तेजस्वी यादव हरले हे मानण्यास आम्ही तयार नसल्याचेही शिवसेनेने म्हटले आहे.

अग्रलेखात नेमके काय?

 • बिहारची निवडणूक रंगतदार झाली. त्यात रंग भरण्याचे काम तेजस्वी यादवने केले. पंतप्रधान मोदी या बलदंड नेत्यासमोर व बिहारमधील सत्ताधाऱ्यांच्या झुंडशाहीसमोर तो थांबला नाही व अडखळला नाही. याची नोंद देशाच्या राजकीय इतिहासात राहील. बिहारची सूत्रे कुणाच्या हातात जायची ते जातील, पण बिहारच्या निवडणुकीने देशाच्या राजकारणाला तेजस्वी नावाचा मोहरा दिला आहे. त्याच्या लढय़ाचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच.
 • बिहारच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेच होते. मतदानानंतर जे ‘एक्झिट’ पोल वगैरे दाखवण्यात आले त्यानुसार अटीतटीची लढत होईल असे चित्र दिसले. साधारण निकाल तसेच आले आहेत. अटीतटीच्या लढतीत ‘एनडीए’ म्हणजे भाजप-नितीशकुमारांची आघाडी पुढे गेली आहे, पण मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या ‘जदयु’ची पीछेहाट झाली आहे. हेसुद्धा अपेक्षेप्रमाणेच घडले आहे.
 • बिहारवर पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राज्य आले आहे, पण नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील काय, हा प्रश्न अधांतरी आहे. नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलास पन्नास जागांचा टप्पा गाठता आला नाही व भाजपने सत्तरी पार केली. नितीशकुमारांच्या पक्षास कमी जागा मिळाल्या तरी तेच मुख्यमंत्री होतील, असे अमित शहा यांना जाहीर करावे लागले. तसा शब्द तर 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेलाही दिला होता. तो शब्द पाळला गेला नाही व महाराष्ट्रात नवे राजकीय महाभारत घडले. आता कमी जागा मिळूनही नितीशकुमारांना दिलेला शब्द पाळला गेला तर त्याचे श्रेय शिवसेनेला द्यावे लागेल.
 • बिहारात नेमके काय होईल? ते पुढच्या 72 तासांत स्पष्ट होईल. बिहारच्या निवडणुकीत ‘एनडीए’ने आघाडी घेतलीच आहे, पण तेथील राजकारणात नव्या तेजस्वी पर्वाची सुरुवात झाली. तेजस्वी यादव हा नवा तरुण दमाचा चेहरा उदयास आला. त्याने पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री नितीशकुमार, अमित शहा, नड्डा व संपूर्ण सत्तामंडळाशी एकहाती लढत दिली. तेजस्वी यादवने राष्ट्रीय लोकशाही आघाडीसमोर दमदार आव्हान उभे केले.
 • बिहार निवडणुकीत मोदी यांचा करिश्मा कामास आला असे ज्यांना वाटते ते तेजस्वी यादववर अन्याय करीत आहेत. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी लढत चुरशीची झाली ती फक्त तेजस्वी यादव यांनी निर्माण केलेल्या तुफानी प्रचार सभांमुळे. तेजस्वी यांनी एक महागठबंधन बनवले. त्यात काँग्रेससह डावे वगैरे पक्ष आले, पण काँग्रेस पक्षाची घसरगुंडी मोठ्या प्रमाणात झाल्याचा फटका तेजस्वी यादवांना बसला. डाव्या पक्षांनी कमी जागा लढवून चांगली कामगिरी पार पाडली. मात्र तसे काँग्रेसला जमले नाही.
 • बिहारचे राजकारण हे अनेक वर्षे लालू यादव किंवा नितीशकुमार यांच्याच भोवती फिरत राहिले. हे सत्य असले तरी सध्या लालू यादव तुरुंगात आहेत व गेल्या 15 वर्षांपासून सत्तेच्या बाहेर आहेत. राष्ट्रीय जनता दलाच्या पोस्टरवर लालू यादवांचे साधे चित्रही नव्हते. तेजस्वी यादव हाच महागठबंधनचा मुख्य चेहरा होता. तेजस्वीच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला व सभेत कमालीचा जिवंतपणा होता. त्यामुळे निकालात तेजस्वीच मुसंडी मारतील हा सगळय़ांचाच अंदाज होता.
 • मतदानानंतर भाजप व जदयुच्या गोटात एक प्रकारे सन्नाटा पसरला होता. लढाई हरत असल्याच्या खात्रीने आलेले हे नैराश्य होते, पण निकालानंतर निराश चेहरे उजळले आहेत. बिहारमधील निकाल हा लोकशाहीचा कौल आहे व तो मानावाच लागेल. तेजस्वी यादव पराभूत झाले असे मानायला आम्ही तयार नाही. निवडणूक हरणे हाच फक्त पराभव नसतो आणि जुगाड करून आकडा वाढवणे हा विजय नसतो.
 • तेजस्वीची लढाई म्हणजे मोठा संघर्ष होता. हा संघर्ष कुटुंबातला होता तसा समोरच्या बलाढय़ सत्ताधाऱ्यांशी होता. तेजस्वीची कोंडी करण्याची व बदनामी करण्याची एकही संधी दिल्ली व पाटण्याच्या सत्ताधाऱयांनी सोडली नाही. ‘जंगलराजचे युवराज’ अशी निर्भत्सना पंतप्रधानांनी करूनही तेजस्वीने संयम ढळू दिला नाही व लोकांत जाऊन ते प्रचार करीत राहिले.
 • नितीशकुमारांना पराभवाची चिंता एवढी वाटली की, ही माझी शेवटची निवडणूक असल्याच्या विनवण्या त्यांनी शेवटच्या टप्प्यात केल्या. तसे भावनिक आवाहन त्यांना करावे लागले. पंधरा वर्षे बिहारवर एकछत्री राज्य करणाऱया नितीशकुमारांवर ही वेळ तेजस्वी यादव यांनी आणली. कारण या तरुण मुलाने निवडणूक प्रचारात विकास, रोजगार, आरोग्य, शिक्षण हे मुद्दे आणले जे आधी साफ हरवले होते.
बातम्या आणखी आहेत...