आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला (सीबीएसई) विद्यार्थीविरोधी भूमिकेवरून दिल्ली हायकोर्टाने सोमवारी फटकारले. अनेक प्रकरणांत विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टात नेऊन त्यांच्यासोबत शत्रूसारखे वर्तन करत असल्याचे कोर्टाने म्हटले. पुनर्मूल्यांकनाच्या योजनेत गुण दुरुस्तीच्या अर्जांचा समावेश करण्याच्या मुद्द्यावर सुनावणी करताना न्यायालयाने ही टिप्पणी केली. मुख्य न्यायमूर्ती डी. एन. पटेल आणि न्या. प्रतीक जालान यांच्या पीठाने बोर्डाने एकल पीठाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना हे मत व्यक्त केले.
एकल पीठाने आदेशात म्हटले होते की, कोविड-१९ मुळे परीक्षा रद्द झाल्याने प्रभावित विद्यार्थ्यांसाठी सीबीएसईची पुनर्मूल्यांकन योजना गुण दुरुस्तीसाठी अर्ज करणाऱ्यांनाही लागू होईल. याला सीबीएसईने आव्हान दिले आहे. दोन न्यायमूर्तींच्या पीठाने सांगितले की, तुम्ही विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयात ओढत आहात. त्यांनी अभ्यास करावा की न्यायालयात यावे? आम्हाला सीबीएसईकडून खटल्याचा खर्च वसूल करणे सुरू करायला हवे. आम्हाला सीबीएसईची विद्यार्थीविरोधी भूमिका पसंत नाही. ते विद्यार्थ्यांशी शत्रूसारखे वागत आहेत, असेही न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने म्हटले की, ही योजना सर्व गुण दुरुस्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांवर लागू केल्यास यात नुकसान काय? तुम्ही न्यायालयात यावे असे काहीही घडले नव्हते. विद्यार्थ्यांना न्यायालयात खेचण्याऐवजी स्पष्टीकरणासाठी सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयात जायला हवे.
... तेही विद्यार्थी कोरोनामुळे प्रभावित झाले आहेत : हायकोर्ट
एकल पीठाने १४ ऑगस्टला दिलेल्या निर्णयात म्हटले होते की, कोविड-१९ मुळे रद्द सीबीएसई परीक्षेमुळे प्रभावित विद्यार्थ्यांसाठी मूल्यांकनाच्या ज्या योजनेस सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे ती गुण दुरुस्ती परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थांवरही लागू होईल. तेही महामारीने सारखेच त्रस्त आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.