आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांवर हल्ला:उत्तर प्रदेशातील परिस्थिती ‘जालियनवाला बाग’सारखी, भाजपला मोठी किंमत चुकवावी लागेल : शरद पवार

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखीमपूर खिरी घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी करून उत्तर प्रदेशातील हिंसाचाराची भाजपला मोठी किंमत चुकवावी लागेल, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केली. हा हिंसाचार शेतकऱ्यांवर हल्ला आहे. त्याची जबाबदारी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर आहे. जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असे ते म्हणाले.

मंगळवारी दिल्लीत बोलताना पवार यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. लखीमपूर खिरीची स्थिती जालियनवाला बागसारखी असून देशातील शेतकरी ही घटना कधीही विसरू शकणार नाहीत. या घटनेची चौकशी सुप्रीम कोर्टाच्या विद्यमान न्यायमूर्तींकडून केली पाहिजे. या घटनेमुळे केंद्र सरकारची नियत दिसून येत आहे. आज त्यांच्याकडे सत्ता आहे म्हणून शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत आहे, परंतु यात ते सफल होऊ शकणार नाहीत, या शब्दांत पवार यांनी भावना व्यक्त केल्या. शेतकऱ्यांच्या बळींना भाजपशासित उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकार जबाबदार असून त्याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे शांततामय आंदोलन सुरू आहे. २६ जानेवारी रोजी त्यांच्यावर हल्ला झाला त्याची देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटली. लखीमपूर येथेही आपल्या मागण्यांसाठी शेतकरी शांततामय मार्गानेच आंदोलन करीत होते. परंतु वाहनाखाली चिरडून त्यांचा मृत्यू झाला, असे सांगून पवार यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. शेतकऱ्यांच्या मृत्यूबद्दल सरकारने शोकही व्यक्त केला नाही. यावरूनच लखीमपूर घटनेच्या मुद्द्यावर सरकार अत्यंत असंवेदनशील असल्याचे दिसून येते. ही लोकशाहीची हत्याच आहे, अशी टीका पवार यांनी केली.

जालियनवाला बाग हत्याकांड
१३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसरच्या जालियनवाला बागेत ब्रिटिश जनरल रेजिनाल्ड डायरच्या हुकमावरून ‘बैसाखी’ साजरी करण्यासाठी जमलेल्या शेकडो नागरिकांवर बेछूट गोळीबार करण्यात आला होता. या नृशंस हत्याकांडात एक हजारावर नागरिक मृत्युमुखी पडले होते.

बातम्या आणखी आहेत...