आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावडिलांच्या निधनानंतर मुलींना नातेवाइकांनी पालन करण्याची हमी देऊन घरी नेले आणि चार लाख रुपयांमध्ये राजस्थान येथे परस्पर विक्री केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या प्रकरणी वाशीम पोलिसांनी मुलींची विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा छडा लावला. याप्रकरणी सर्व आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
शहरातील वाल्मीकीनगर येथील कल्पना अशोक पवार यांनी वाशीम शहर पोलिस ठाण्यात १२ एप्रिल रोजी तक्रार दिली होती. या फिर्यादीत बहिणीच्या पतीच्या निधनानंतर तिच्या ११ व ८ वर्षांच्या दोन मुली नातेवाईक असलेल्या घनश्याम रामकिशन पवार (रा. हदगाव, जि. नांदेड) व जयंत पवार (रा. बोरी अरब, जि. यवतमाळ) यांनी दोन्ही मुलींना आपल्या सोबत नेले आणि फिरण्याच्या बहाण्याने मुंबईत नेले. त्यानंतर मोठ्या मुलीला राजस्थान येथे चार लाख रुपयांत तिला विकले आणि मुलगी न सांगता पळून गेल्याची थाप मारली, असे फिर्यादीत नमूद केले. पीडित मुलीला राजस्थानातील डागरा येथे विकल्यानंतर संदीप हनुमान सिंग बांगडवा या आरोपीसोबत तिचे लग्न लावून देण्यात आले. आरोपी संदीप बांगडवा याने अल्पवयीन पीडित मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले. तसेच मदन हनुमान सिंग बांगडवा, राकेश हनुमान सिंग बांगडवा यांनी मुलीचा शारीरिक व मानसिक छळ केला. दरम्यान, याप्रकरणी पोलिस आरोपींची कसून चौकशी करत आहेत. यातून आणखी काही धागेदारे लागण्याची शक्यता आहे.
राजस्थानातून पळून मुलगी गुजरातच्या पोलिस ठाण्यात
या जाचाला कंटाळून पीडित मुलीने तेथून पळ काढून गुजरात गाठले. या घटनेची माहिती पीडित मुलीने बारडोली पोलिसांना दिली. बारडोली पोलिसांनी वाशीम पोलिसांना कळवल्यानंतर या माहितीच्या आधारे वाशीमच्या गुन्हे शोध पथकाने आरोपी घनश्याम पवार व राजेंद्र पवार यांना अटक केली. त्यानंतर एक पथक गुजरातमध्ये पाठवून पीडित मुलीला ताब्यात घेतले. त्यानंतर सुभाष पवारला पालघर जिल्ह्यातून अटक केली. पीडित मुलीला वाशीम येथे आणल्यानंतर तिने घनश्याम रामकिशन पवार, जयेंद्र रामकिशन पवार व सुभाष श्यामराव पवार यांनी चार लाख रुपयात मदन बांगडवा, राकेश बांगडवा व संदीप बांगडवा यांना विकल्याची माहिती दिली. वाशीम शहर पोलिसांनी लगेच राजस्थान गाठून या तिन्ही आरोपींना राजस्थानातून अटक केल्यानंतर या प्रकरणामध्ये घनश्याम पवार व राजेंद्र पवार यांच्यासह मुलीला विकण्यास मदत करणाऱ्या इस्लाम खान दौलत खान (रा. दिग्रस) यालाही अटक केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.