आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राऊतांविरोधात सोमय्या आक्रमक:मुलुंड पोलिस ठाण्यात अब्रूनुकसानीची तक्रार, घोटाळे दडपण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मुलुंड पोलिस ठाण्यात अब्रूनुकसानीची तक्रार दिली आहे. आज सकाळी 11 वाजता संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी किरीट सोमय्या आपली पत्नी मेधा सोमय्या आणि पुत्र नील सोमय्यांसह मुलुंड पोलिस ठाण्यात गेले होते. ठाण्याबाहेर आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधत त्यांनी या तक्रारीबाबत माहिती दिली.

महाविकास आघाडीच्या नेत्यांचे घोटाळे दडपण्यासाठी दबाव!
गेल्या काही दिवसांपासून टॉयलेट घोटाळाप्रकरणी संजय राऊत सातत्याने किरीट सोमय्या यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत. त्यावर आता सोमय्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मी सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांचे घोटाळे बाहेर काढत आहे. महाविकास आघाडीचे अर्धे मंत्री भ्रष्टाचारात बुडाले आहेत. त्यामुळेच हे घोटाळे दडपण्यासाठी माझ्या कुटुंबावर दबाव टाकला जात आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

मी महाविकास आघाडीच्या आणखी काही नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार आहे. त्यामुळेच टॉयलेट घोटाळाप्रकरणी माझ्या पत्नीची बदनामी केली जात आहे. याप्रकरणी खोटे आरोप करून कुटुंबाची मानहानी केल्याप्रकरणी मी संजय राऊतांविरोधात तक्रार दिली आहे, असे सोमय्या यांनी सांगितले.

मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करावा!
मुंबई पोलिसांनी संजय राऊतांविरोधात केवळ तक्रार दाखल केली आहे. मात्र, अब्रुनुकसानीप्रकरणी संजय राऊतांविरोधात कलम 503, 506 व 509 अंतर्गत गुन्हा दाखल करावा. मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी आपण तक्रारीची दखल घेणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आता नौटंकी बंद करून संजय राऊतांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, असे किरीट सोमय्या म्हणाले.

गुन्हा दाखल न केल्यास उच्च न्यायालयात जाणार
मुलुंड पोलिसांनी 7 दिवसांत याप्रकरणी कारवाई न केल्यास मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार, असा इशारादेखील किरीट सोमय्या यांनी दिला आहे. कल्याण-डोंबिवलीच्या टॉयलेट योजनेत किरीट सोमय्यांच्या कुटुंबीयांनी मोठा घोटाळा केला, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मात्र, संजय राऊत यांनी या घोटाळ्याशी संबंधित अद्याप एकही कागदपत्र समोर आणलेला नाही. ते निव्वळ खोटे आरोप करून कुटुंबाची बदनामी करत असल्याचे सोमय्या म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...