आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bengal | Bihar | Mamata | Stone Pelted | Sasaram | Nalanda | Howrah | Sambhaji Nagar

शांतता:बंगाल, बिहारमध्ये तणावपूर्ण शांतता, ममतांनी तपास CID कडे सोपवला; नालंदात पोलिसांचा मार्च, शहांचा सासाराम दौरा रद्द

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पश्चिम बंगालच्या हावडा व बिहारच्या नालंदात शुक्रवारी हिंसाचार झाला होता.  - Divya Marathi
पश्चिम बंगालच्या हावडा व बिहारच्या नालंदात शुक्रवारी हिंसाचार झाला होता. 

पश्चिम बंगाल, बिहार, महाराष्ट्रात 2 दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारानंतर तणावपूर्ण स्थिती आहे. या राज्यांतील हिंसाग्रस्त भागात पोलिस तैनात करण्यात आलेत. बंगाल-बिहारच्या अनेक जिल्ह्यांत कलम 144 लागू करण्यात आले आहे. बंगालच्या हावड्यातील घटनेचा तपास CID कडे सोपवण्यात आला आहे. पण या प्रकरणी NIA चौकशीची मागणी केली जात आहे.

दुसरीकडे, बिहारमधील नालंदा येथे 27, तर सासाराम येथील 18 जणांना अटक करण्यात आली आहे. सासाराममध्ये सध्या इंटरनेट बंद आहे. गृहमंत्री अमित शहा येथील दौऱ्यावर येणार होते. पण आता तो रद्द करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरात बुधवारी रात्री झालेल्या दंगलीप्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आली आहे.

तिन्ही राज्यांत 80 हून अधिक जण ताब्यात

रामनवमीच्या दिवशी विविध राज्यांत मध्ये हिंसाचार व जाळपोळ झाली. बंगाल व बिहारसह महाराष्ट्रात शुक्रवारीही हिंसाचार झाला. आतापर्यंत या 3 राज्यांतून 80 हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात गुजरातमधील 24, महाराष्ट्रातील 20 व बंगालमधील 36 जणांचा समावेश आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी बंगालच्या राज्यपालांकडून घटनेचा आढावा घेतला आहे.

1. पश्चिम बंगाल: हावड्याच्या शिबपूरमध्ये शांतता

पश्चिम बंगालमधील हावडा व उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात गुरुवारी मिरवणुकीवेळी हिंसाचार झाला. त्यानंतर शुक्रवारी 24 तासांतच शिबपूरमध्ये पुन्हा दगडफेक झाली. येथे एका गटाने मंदिरांची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात फ्लॅग मार्च काढला. विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी व ममता यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी या प्रकरणाची एनआयए चौकशी करण्याची मागणी न्यायालयाकडे केली. सध्या शिबपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. येथे लोक आपापल्या कामावर परतलेत.

हावड्यातील शिबपूरमध्ये आता स्थिती सामान्य आहे. येथील रस्त्यांवर अजूनही पोलिस तैनात आहेत.
हावड्यातील शिबपूरमध्ये आता स्थिती सामान्य आहे. येथील रस्त्यांवर अजूनही पोलिस तैनात आहेत.

ममता म्हणाल्या - मिरवणुकीचा मार्ग का बदलला?

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनांसाठी थेट भाजपला जबाबदार धरले आहे. ममता भाजपा नामोल्लेख टाळत म्हणाल्या - 'ते जातीय दंगलींसाठी राज्याबाहेरून गुंड बोलावतात. त्यांच्या मिरवणुकीला कुणीही रोखले नाही. त्यांना तलवारी व बुलडोझर घेऊन मार्च करण्याचा कोणताही अधिकार नाही. हावड्यात असे करण्याची त्यांची हिंमत कशी झाली?'

ममता म्हणाल्या - ‘त्यांनी मार्ग का बदलला? विशेषतः एका समुदायाला टार्गेट करण्यासाठी व हल्ला करण्यासाठी अनधिकृत मार्ग का निवडला? भाजपने नेहमीच हावडा, पार्क सर्कस व इस्लामपूरला टार्गेट का केले.'

ममता बॅनर्जी गत 2 दिवसांपासून केंद्राविरोधात कोलकात्यात निदर्शने करत आहेत. काल हावड्यातील हिंसाचारामुळे त्यांचे धरणे संपुष्टात आले.
ममता बॅनर्जी गत 2 दिवसांपासून केंद्राविरोधात कोलकात्यात निदर्शने करत आहेत. काल हावड्यातील हिंसाचारामुळे त्यांचे धरणे संपुष्टात आले.

2. बिहार: सासाराममध्ये इंटरनेट बंद, नालंदात 27 जणांना बेड्या

बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील बिहारशरीफमध्ये 6 जणांना गोळ्या लागल्या, तर 9 जण दगडफेकीत जखमी झाले. सध्या नालंदामध्ये परिस्थिती सामान्य आहे. येथे कलम 144 अर्थात संचारबंदी लागू आहे. दगडफेकीनंतर जमावाने दुकानांची लुटपाट केली. एसपी अशोक मिश्रा यांनी सांगितले की, पोलिस या भागात गस्त घालत आहेत व सतर्क आहेत. आतापर्यंत 27 जणांना अटक करण्यात आली आहे.

सासाराम येथील रामनवमीच्या मिरवणुकीवेळी झालेल्या वादाला शुक्रवारी हिंसक वळण लागले. दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक झाली. घरांवर बॉम्बफेक करण्यात आली. काही घरे पेटवून देण्यात आली आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवाई गोळीबार करावा लागला. येथील इंटरनेटही बंद करण्यात आले आहे. या प्रकरणी 18 जणांना अटक करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शहा रविवारी सासारामला भेट देणार होते. पण हिंसाचारामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे.

नालंदातील स्थिती सामान्य आहे. येथील जनजीवन आता पूर्वपदावर येत आहे.
नालंदातील स्थिती सामान्य आहे. येथील जनजीवन आता पूर्वपदावर येत आहे.
नालंदात मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आलेत. येथील स्थिती नियंत्रणात आहे.
नालंदात मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आलेत. येथील स्थिती नियंत्रणात आहे.

3. महाराष्ट्र: छत्रपती संभाजीनगरात 10 जणांना बेड्या

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरातील किराडपुऱ्यात बुधवारी रात्री दंगल झाली. या प्रकरणी आतापर्यंत 10 जणांना अटक व 21 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

बुधवारी मध्यरात्री 2 गटांत हिंसाचार झाला. त्यात दगडफेक व जाळपोळ झाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. त्यात 10 पोलिसांसह 12 जण जखमी झालेत. हा हिंसाचार रात्री 11.30 पासून पहाटे 3.30 वाजेपर्यंत सुरू होता. संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले की, येथे मद्यपींच्या 2 गटांत वाद झाला. त्यांनीच दगडफेक केली. राम मंदिराचे कोणतेही नुकसान झाले नाही. मंदिरात कुणीही शिरले नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

छत्रपती संभाजीनगरमध्ये आता शांतता आहे. येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आता शांतता आहे. येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
बुधवारी रात्री जमावाने पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ केली होती.
बुधवारी रात्री जमावाने पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ केली होती.